Ad Advertisement Ad Advertisement

Nana Patekar : नाना : रांगड्या रूपड्याचं नाव!

Nana Patekar : पडद्यावर अन्यायाविरुद्ध पेटून उठणारा ‘अँग्री यंग मॅन’, खऱ्या आयुष्यात बिनधास्त-बेधडक बोलणारा अवलिया. नाना पाटेकर म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीला पडलेलं एक असं कोडं होतं, जे कधीच पारंपरिक साच्यात बसलं नाही. स्वत:चं अस्सल व्यक्तिमत्त्व जपणारा हा अवलिया पडद्यावर जितका रांगडा होता, खऱ्या आयुष्यातही तो तसाच होता. नानाच्या व्यक्तिमत्त्वाला कंगोरे बरेच होते. ते आश्चर्य करायला लावणारेही होते. कधी ‘पुरुषस्य भाग्यम्’ असं म्हणायला लावणारेही होते.

सिनेपाक्षिकात काम करत असताना एकदा नाना पाटेकरची मुलाखत घेतली होती. त्याच्या नाटकातल्या भूमिका गाजत होत्या आणि मला आठवतंय त्याप्रमाणे एन. चंद्राच्या ‘अंकुश’ या पहिल्या चित्रपटात नानाची प्रमुख भूमिका होती. बेरोजगार तरुणांच्या प्रश्नावरचा आणि नेहमीच्या पठडीबाहेरचा तो चित्रपट नुकताच प्रदर्शित होऊन चर्चित झाला होता. त्या सुमाराची म्हणजे १९८६ च्या सुमाराची गोष्ट असावी. नानाची एकूण बंडखोर, बेधडक अशी प्रतिमा तयार झालेली होतीच. तिला हिंदी चित्रपटसृष्टीत बरंच कौतुक मिळू लागलं होतं. पारंपरिक हिंदी चित्रपटाच्या नायकाचं रूपडं, वागण्यातलं रोमँटिक सॉफिस्टिकेशन नसतानाही ही परंपरेची ऐशी की तैशी करणारी इमेज तरुण वर्गात लोकप्रिय झाली होती आणि हिंदी चित्रपटसृष्टीतही गोड गोड रोमँटिसिझमला छेद देणारं हे घटित लोकप्रिय झालं. तशा भूमिका नानासाठी लिहिल्या जाऊ लागल्या.
अशा पार्श्वभूमीवर त्याला मुलाखतीसाठी भेटले होते.

मी आपलं शिरस्त्याप्रमाणे आदरार्थी बहुवचन वापरायला गेले, तर पहिल्याच वाक्यात नानानं स्वत:ला एक फर्मास शिवी हासडत, स्वत:चा एकेरी उल्लेख करायला सांगितलं, ‘नानाची टांग! नानाजी कसलं म्हणतेस?’ मग मी सगळी मुलाखत एकेरी भाषेतच घेतली आणि लिहितानाही सुरुवात याच अनुभवानं केली. हिंदी भाषिक प्रदेशातली लहान-थोरांना ‘आप’ संबोधायची सवय असलेले संपादक विनोद तिवारी यांना ‘नानाची टांग’ अशी लेखाची सुरुवात वाचूनच धक्का बसला. म्हटलं, ‘नाना प्रत्यक्षातही असाच आहे, बहुधा पडद्यावर दिसतो त्याहून जास्तच शिवराळ, बिनधास्त आहे, तर त्याला मी काय करू? सुसंस्कृत भाषेत मुलाखत लिहिली तर त्यात नाना पाटेकरचं खरं व्यक्तिमत्त्व उतरणारच नाही. वाचकांची उगीच दिशाभूल होईल.’ मुलाखत तशीच प्रसिद्ध झाली.

नाना जे. जे. स्कूल ऑफ आर्टचा विद्यार्थी. चित्रकार, कलावंत. कलावंत कोमल हृदयाचे असतात वगैरे समज, जे. जे. तून बाहेर पडलेल्या मूर्तिमंत व्रात्यपणाला बघितलं की दूर होत. टाइम्सच्या आर्ट डिपार्टमेंटने माझे असे समज दूर केलेले होतेच. त्यामुळे नानाच्या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे मला तरी धक्का बिक्का बसला नव्हता.

८०च्या दशकात ‘अँग्री यंग मॅन’ हे आयकॉन ठरवणारी, मध्यम वर्गाला धक्का देणाऱ्या गुन्हेगारी जगातल्या माणसांचं चित्रण करणारी लोकप्रिय पठडी तयार होण्याच्या काळात नानाच्या अशा भूमिका गाजल्या. परिंदा, तिरंगा, क्रांतिवीर, अब तक छप्पन अशा जॉनरला त्याच्या रांगड्या व्यक्तिमत्त्वाचा फायदा झाला. आणि अलीकडच्या काळात, २००७ मध्ये दिग्दर्शक अनीस बाझ्मीची तुफान कॉमेडी फिल्म ‘वेलकम’मध्येही नानाच्या रांगड्या इमेजचा विनोदासाठी कुशल वापर केला आहे, तो आठवला तरी हसू यावं. तिथेही तो खतरनाक डॉनच आहे; पण धाकटी बहीण हा त्याच्या खरतनाक मनाचा कोमल कोपरा, शिवाय चित्रपटात हिरो व्हायची दांडगी हौस. या दोन गुणवैशिष्ट्यांमुळे चित्रपटभर बिचाऱ्याची तुफान फजिती होत राहते. टीव्हीवर वारंवार दाखवल्या जाणाऱ्या ‘वेलकम’, ‘हाऊसफुल’, ‘हेराफेरी’सारखे चित्रपट, वीस वर्षं होऊन गेली तरी भंजाळलेल्या डोक्याला दिलासा देत असतात.

८०च्या त्या उत्तरार्धातच केव्हातरी अनिल पोरेडी आणि अशोक राणे यांच्याबरोबर नाना पाटेकरच्या माहिममधल्या घरी गेल्याचं आठवतं. साधंसं लोअर मिडल क्लास वाटावं असं घर. नाना एव्हाना स्टार स्टेटसला शोभणाऱ्या मुंबईच्या एरियात, स्टार स्टेटसला शोभणाऱ्या फ्लॅटवर राहू लागला होता. त्यामुळे आम्ही गेलो तेव्हा तिथे नानाची फक्त आईच भेटली. ‘नानाची आई’ हे वेगळंच रसायन वाटलं. नानाचं दुसरं टोक. वागण्यात सहज ऋजुता. अनिल आणि अशोकची नानाच्या आईशी आधीपासूनची ओळख होती. त्यामुळे त्यांच्या गप्पा ऐकल्या. गप्पांचा विषय अर्थात नाना. नानाची आईही तितकीच बिनधास्त, ना खंत ना खेद. नानाच्या यशानं आणि वैभवानं ना दिपणं, ना हुरळून जाणं.
आपलं स्वत्व आपण शांतपणं जपणं. तिथून निघताना मी ‘ही नानाची आई?!’ असं आश्चर्य करतच निघाले होते. या पार्श्वभूमीवर नानाच्या आक्रमक, रांगड्या चित्राच्या रेषा आणखीनच प्रखर वाटायच्या. नानाच्या व्यक्तिमत्त्वाला कंगोरे बरेच होते. ते आश्चर्य करायला लावणारेही होते. कधी ‘पुरुषस्य भाग्यम्’ असं म्हणायला लावणारेही होते. आणि आता नानाची अचानक एक्झिट! तो म्हणे पंचाहत्तर वर्षांचा झाला होता, तरीही आकस्मिक, आश्चर्यजनक आणि धक्कादायकही!

रेखा देशपांडे लेखिका

Read About :  Nana Patekar Death : हृदयविकाराने मृत्यू, तरी MLC का नोंदवली? जाणून घ्या कायदा काय सांगतो?

E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.