Ad Advertisement Ad Advertisement

Nana Patekar Tribute : नानाची गोष्ट

Nana Patekar Tribute : स्वत:ला फिट ॲण्ड फाइन ठेवणारे नाना पाटेकर गेले. एकाचवेळी मनस्वी कलंदरपणा आणि कमालीचा हळवेपणा दाखवणारा एक माणूस गेला. रुपेरी पडद्यावरील एक अढळपद रिक्त झाले, माणुसकीचा ओलावा प्रत्यक्ष कार्याच्या झारीतून गरजू व्यक्तींवर शिंपणारा कोकणातल्या फणसासारखा माणूस गेला. ते कोकणातलेच होते. त्यामुळे फणसासारखेच होते. बाहेरून काटेरी आणि आतून मऊ, हळवे, ऋजू स्वभावाचे.

ज्येष्ठ पत्रकार रवींद्र पांचाळ आणि नाना कधी काळी उमेदीच्या काळात आविष्कारच्या बसमधून नाटकांचे दौरे करायचे, तेव्हा शेजारचा पोरसवदा रवी पेंगुळला की त्याला मांडीवर आडवा घेऊन थोपटण्याइतका तो प्रेमळ होता. कवींचा, कवितांचा चाहता होता. फोनवर तास-अर्धा तास कविता ऐकवण्याइतक्या त्याच्या कविता तोंडपाठ होत्या. नाट्य-चित्रपटसृष्टीत अनेकजण उमेदीने, आशेने येत असतात. त्यातील काही जिद्दीने आणि अभिनयगुणांच्या बळावर आपले स्थान निर्माण करतात. ध्रुवासारखे अढळपद मिळवतात. मातब्बरांशी रुपेरी पडद्यावर झुंज घेतात आणि या दिग्गजांच्या झुंजीच्या दंतकथा बनून जातात. नाना पाटेकर अशा दंतकथांचे नायक होते. त्यांच्या जाण्याने केवळ एका कलाकाराचा प्रवास नाही तर, एका स्वतंत्र अभिनयशैलीचा एक संपूर्ण अध्याय समाप्त झाला आहे.

त्यांचा खर्जातला आवाज, जबरदस्त संवादफेक, मोजक्या हालचालींनी सीन ताब्यात घेण्याची त्यांची शैली सारंच वेगळं होतं. ये चीज कुछ अलग है.. अशी खुणगाठ त्यांच्या प्रारंभीच्या अभिनय प्रवासातच दिग्गजांनी बांधली असणार. राजकुमार, अमिताभ, रजनीकांत अशा हस्तींशी त्यांची रुपेरी पडद्यावर पुढे झुंज लागली. या झुंजींच्या पुढे दंतकथा झाल्या. ते प्रत्येक मातब्बरासमोर तितक्याच ताकदीने उभे ठाकायचे. त्याला कारण होते त्यांची रंगभूमीवरील कारकीर्द.

पाहिजे जातीचे, हमीदाबाईची कोठी, महासागर, पुरुष अशा नाटकांतून त्यांच्यातील अभिनेता घडत होता. पुढे १९७८ मध्ये गमनमधून नानांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. अंकुश, सलाम बॉम्बे! यांसारख्या चित्रपटांनी त्यांची वेगळी ओळख निर्माण केली. पण परिंदा आला आणि नाना पाटेकर या नावाशी अण्णाची व्यक्तिरेखा जोडली गेली. नाना व्यक्तिरेखेत शिरला की ती भूमिका जगायचा. या सरधोपट वाक्याचा अर्थ समजून घ्यायचा तर त्याचा अण्णा नजरेसमोर आणायचा. खलनायकी अभिनयाची फूटपट्टी बदलून टाकणारी ही भूमिका जणू नानासाठीच लिहिली गेली होती. त्यांच्या चेहऱ्यावरचा तो थंडपणा, डोळ्यांतील हिंस्रता आणि संतापाचा अचानक उद्रेक या सगळ्या वैशिष्ट्यांनी नानाने अण्णाला जन्माला घातले. राष्ट्रीय पुरस्काराने या मेहनतीचे चीज केले.

मग आला क्रांतिवीरमधला प्रताप. अन्यायाला भिडणाऱ्या एका सामान्य माणसाचा आक्रोश. ही भूमिका नानाने इतकी जिवंत केली की, १९९४ साली या भूमिकेसाठी मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्काराच्या अधिकृत प्रशस्तिपत्रकातही त्यांच्या अभिनयाने सामान्य माणसातील सुप्त सामर्थ्य जागे केल्याचे नमूद करण्यात आले होते. पण, अभिनय म्हणजे संवादफेक हा समज त्यांच्या ‘खामोशी’तील नि:शब्द अभिनयाने मोडीत काढला. मूकबधिर वडिलांची वेदना त्यांनी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली.

त्यांचे अफलातून टायमिंग खऱ्या अर्थाने पडद्यावर आले ते वेलकममधील उदय शेट्टीच्या भूमिकेतून. आणि अनेक मराठी, हिंदी चित्रपटांनंतर आला ‘नटसम्राट’. गणपतराव बेलवलकर यांची अजरामर व्यक्तिरेखा. रंगभूमीचा सम्राट. टाळ्यांचा राजा. पण आयुष्याच्या सांजसावल्यांत शेवटी एकाकी. या गणपतरावांच्या रूपात नानांनी म्हातारपण, एकटेपण, कलाकाराची उपेक्षा, मुलांपासून दुरावलेपण आणि माणसाला शेवटी हवी असलेली आपुलकी, जिव्हाळा या सगळ्यांना पडद्यावर साकारले. या नटसम्राटसाठी त्यांना मराठी चित्रपटातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला.

पण या पुरस्काराची गरजच नव्हती. कारण नटसम्राट पाहिलेल्या प्रत्येक प्रेक्षकाने नानांना स्वत:च्या मनात अढळपद देऊन एक पुरस्कार कधीच प्रदान केला होता- ‘अभिनयसम्राट.’

तीन राष्ट्रीय पुरस्कार. अनेक फिल्मफेअर पुरस्कार आणि पद्मश्री. असंख्य सन्मानांचे धनी असलेल्या नानांना समाजाप्रति अकृत्रिम जिव्हाळा होता. मनात माणुसकीचा ओलावा होता. यातूनच नाम फाउंडेशनची वेल फुलली होती. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची अवस्था, दुष्काळ, आत्महत्या आणि ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न यांनी अस्वस्थ झालेल्या नानांनी अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या सहकार्याने ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण महाराष्ट्रासाठी काम सुरू केले. जलसंधारण, गावांमध्ये पाणी, शेतकऱ्यांना मदत, आत्महत्याग्रस्त कुटुंबांना आधार. अडल्यापाडल्याला मदत. अंतरी माणुसकीची ओल जपणारा हा हळवा माणूस बरेच काही करत होता.
पडद्यावरील भूमिकांतून त्यांनी प्रसंगी प्रेक्षकांच्या डोळ्यांत अश्रू आणले; पडद्याबाहेर प्रत्यक्ष जीवनात ते कष्टी, पीडित जनतेचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न करत राहिले.

कितीतरी भूमिका त्यांच्यामुळे अजरामर झाल्या; पण त्यापेक्षाही एक हिट भूमिका ते सच्चेपणाने जगले. अंतर्बाह्य निर्मळ माणसाची.
नाना पाटेकर नावाच्या सहृदय माणसाची ही गोष्ट. त्यांना भावपूर्ण आदरांजली.

शैलेंद्र शिर्के
संपादक, दै. पुण्यनगरी, मुंबई

Read About :  Nana Patekar Death : हृदयविकाराने मृत्यू, तरी MLC का नोंदवली? जाणून घ्या कायदा काय सांगतो?

E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.