जुन्या शहरातील ३१ रस्ते मोकळे करणार : सभापतींचे निर्देश
छत्रपती संभाजीनगर : Old City 31 Roads Encroachment Removal Warning : जुन्या शहरातील ३१ रस्त्यावरील अतिक्रमणे काढून हे रस्ते मोकळे करण्यासाठी मनपा स्थायी समिती सभापतींनी प्रशासनाला आदेश दिले होते. त्यानुसार महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने नियोजन केले असून, बुधवारी (दि.१८) गुलमंडी, संभाजीपेठ, रंगारगल्ली, सिटीचौक आदी रस्त्यावर अनाऊन्समेंट (भोंगा वाजवून) करून अतिक्रमण स्वत:हून काढून घेण्याचे तसेच कारवाईत होणारे नुकसान टाळण्याचे आवाहन केले.
जुन्या शहरातील रस्ते वाहतूकीसाठी अरुंद ठरत आहेत. या भागात मुख्य बाजारपेठ असल्याने सणवार असो किंवा शनिवार, रविवार असे सुटीचे दिवस असोत. या दिवसांमध्ये जुन्या शहरात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढते. मुख्य बाजारपेठ असल्याने या भागातील रस्त्यालगत लहानमोठी दुकाने थाटण्यात येतात. परिणामी वाहतूक कोंडी, पार्किंग आदी समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागते. ही कोंडी फोडण्यासाठी जुन्या शहरातील रस्ते रुंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र दिवाळी सण असल्याने, अतिक्रमण हटाव कारवाईला स्थगिती देण्याचे आदेश सभापती अनिल मकरिये यांनी दिले होते. दिवाळी संपल्यानंतर सभापतींनी प्रशासनाला कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार मनपा प्रशासनाने मोहिम हाती घेतली असून, दिवाण देवडी, रंगार गल्ली, सिटी चौक, गुलमंडी, संभाजीपेठ आदी भागातील रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्याची कारवाई हाती घेण्यात आली आहे.
या रस्त्यावर फिरले पथक
अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय सुरडकर यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण हटाव विभागाच्या पथकाने बुधवारी पैठण गेट ते गुलमंडी, गुलमंडी ते सिटी चौक, गुलमंडी ते संभाजीपेठ आदी रस्त्यावर भोंगा वाजवून अतिक्रमण स्वत:हून काढून घेण्याचे आवाहन केले.
नागरीकांच्या प्रत्यक्ष भेटी घेणार : वाहुळे
जुन्या शहरातील रस्ते विकास आराखड्यानुसार रुंद करण्यासाठी मोहिम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी बुधवारी या भागात आमच्या पथकाकडून ध्वनिक्षेपकाद्वारे अनाऊन्समेंट करून बाधित मालमत्ताधारक व अतिक्रमणधारकांना त्यांनी केलेले अतिक्रमण काढून घेण्याची सूचना देण्यात आली आहे. आता आमचे कर्मचारी मालमत्ताधारक नागरिकांच्या आणि व्यावसायिकांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना आवाहन करतील. त्यानंतर नगररचना विभागाने दिलेल्या मार्किंगनुसार पुढील कारवाई केली जाईल. : संतोष वाहुळे, संनियंत्रण अधिकारी, अतिक्रमण विभाग, मनपा.
Read About : Harsul Waste Processing Plant Fire – हर्सूल प्रक्रिया प्रकल्पातील सुका कचरा पेटला
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.