तालिबानचा पाकिस्तानवर गंभीर आरोप; अंतर्गत वाद लपवण्यासाठी आणि ‘मक्का करारा’तून पळ काढण्यासाठी निवासी भागांवर बॉम्बफेक
काबुल : Pakistan Air strike अफगाणिस्तानच्या कुनार आणि हेलमंद प्रांतांमध्ये पाकिस्तानी सैन्याने केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये महिला आणि मुलांसह किमान ९ नागरिकांचा मृत्यू झाला असून ११ जण जखमी झाले आहेत. तालिबानचा प्रवक्ता जबीहुल्लाह मुजाहिद याने गुरुवारी या हल्ल्याची माहिती देताना सांगितले की, या हल्ल्यांमध्ये थेट सर्वसामान्य नागरिकांच्या घरांना लक्ष्य करण्यात आले.
मुजाहिद याने या कारवाईचा तीव्र शब्दांत निषेध करत ही पाकिस्तानची ‘आक्रमक कारवाई’ असल्याचे म्हटले आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला बुधवारी रात्री कुनारच्या शुल्तान जिल्ह्यातील चुगाम भागात आणि हेलमंदच्या गर्मसेर जिल्ह्यातील सफर भागात करण्यात आला. या हल्ल्यात नागरिक मारले गेले असून तीन घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत.
तालिबानचा प्रवक्ता जबीहुल्लाह मुजाहिद याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर पोस्ट करत लिहिले, “काल रात्री पाकिस्तानी विमानांनी कुनारच्या शुल्तान जिल्ह्यातील चुगाम आणि हेलमंदच्या गरमसेर जिल्ह्यातील सफर भागात सर्वसामान्य लोकांच्या घरांवर बॉम्बफेक केली. यात महिला आणि मुलांसह नऊ अफगाण नागरिक मारले गेले, ११ जखमी झाले आणि तीन घरे उद्ध्वस्त झाली. सर्व आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करणाऱ्या या आक्रमक कारवाईचा आणि गुन्ह्याचा आम्ही तीव्र निषेध करतो.
गेल्या काही दिवसांतील हल्ल्यांची मालिका
अफगाणिस्तानच्या विविध प्रांतांना लक्ष्य करून पाकिस्तानकडून हवाई हल्ले केले जात असल्याच्या आरोपांदरम्यान ही ताजी घटना समोर आली आहे.
२४ सप्टेंबर: कंधार, पक्तिया आणि खोस्तमध्ये झालेल्या पाकिस्तानी हल्ल्यात चार नागरिकांचा मृत्यू झाला होता.
२१ सप्टेंबर: कुनार आणि पक्तिका प्रांतात झालेल्या हल्ल्यात तीन लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.
मक्का करारावरून लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न
गेल्या आठवड्यात मुजाहिद याने पाकिस्तानवर आरोप केला होता की, पाकिस्तान आपल्या देशांतर्गत समस्यांवरून लोकांचे लक्ष भरकटवण्यासाठी आणि ‘मक्का करारा’अंतर्गत असणाऱ्या जबाबदाऱ्या टाळण्यासाठी अफगाणिस्तानवर हल्ले करत आहे.
कंधारमधील एका धार्मिक मदरशात बोलताना मुजाहिद म्हणाला, “इस्लामाबाद (पाकिस्तान) अफगाणिस्तानवर हल्ले करून पाकिस्तानमधील वाढत्या राजकीय आणि आर्थिक समस्या तसेच तेथे सुरू असणाऱ्या आंदोलनांवरून जनतेचे लक्ष वळवू पाहत आहे.”
सऊदी अरब, पाकीस्तान आणि तुर्की यांनी ७ ऑगस्ट रोजी मक्का येथे एका संरक्षण करारावर स्वाक्षरी केली होती. या कराराचा मुख्य उद्देश कोणत्याही बाह्य आक्रमणाविरोधात एकत्र येऊन प्रत्युत्तर देण्याची क्षमता मजबूत करणे हा आहे. या करारांतर्गत तिन्ही देशांपैकी कोणत्याही एका देशावर झालेला सशस्त्र हल्ला हा तिन्ही देशांवर झालेला हल्ला मानला जाईल.
मुजाहिदने पुढे म्हटले की, “अफगाणिस्तानवर पाकिस्तानने केलेल्या या ताज्या हल्ल्यांचा उद्देश सौदी अरबसोबत झालेल्या मक्का करारापासून पळ काढणे हा आहे. पाकिस्तान अफगाणिस्तानमध्ये युद्ध लढत असल्याचे दाखवून परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे.”
Read About : Longest Tunnels in the World : जगातील सर्वाधिक 24.5 किमी लांबीचे बोगदे
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.