चंद्रभागेच्या पात्रात बोटीत बसून फेरफटका मारत सोयीसुविधांची घेतली माहिती
पंढरपूर : Pandharpur Wari – कार्तिकी एकादशी यात्रेसाठी पंढरपुरात येणाऱ्या लाखो वारकऱ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि उत्तम सुविधा मिळाव्यात, यासाठी राज्य सरकार आणि पंढरपूर नगरपालिकेच्या माध्यमातून व्यापक नियोजन करण्यात आले आहे. यात्रेच्या संपूर्ण व्यवस्थापनासाठी नगरपालिकेला पाच कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून, स्वच्छता, आरोग्य, पिण्याचे पाणी, रस्ते आणि निवास व्यवस्थेसाठी आवश्यक मनुष्यबळासह आधुनिक यंत्रणा तैनात करण्यात आली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे आधी मोटार सायकलवर स्वार होऊन, तर चंद्रभागेच्या पात्रात बोटीत बसून फेरफटका मारत, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी वारकऱ्यांसाठी केलेल्या विविध सोयीसुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली.
मिनरल वॉटरची व्यवस्था
यात्रेसाठी मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता लक्षात घेऊन रस्त्यांची दुरुस्ती, स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यांना प्राधान्य देण्यात आले आहे. वारकऱ्यांना शुद्ध मिनरल वॉटर उपलब्ध करून देण्यासाठीही विशेष व्यवस्था करण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
आरोग्य शिबिरांचे नियोजन
यात्रा काळात विविध ठिकाणी आरोग्य शिबिरे उभारण्यात आली आहेत. रुग्णालयातील अतिदक्षता विभागाचीही शिंदे यांनी पाहणी केली. भाविकांच्या सुविधांसाठी स्वच्छता कर्मचारी, यंत्रसामग्री आणि अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. शौचालये आणि स्नानगृहांची दिवसातून चार ते पाच वेळा स्वच्छता करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शिंदे यांनी चंद्रभागेच्या पात्रात उभारण्यात आलेल्या स्वच्छतागृहांची स्वतः पाहणी केली.
नवे घाट विकसित
वारकऱ्यांना स्नानासाठी स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळावे यासाठी ठिकठिकाणी वॉटर प्युरिफायर यंत्रणा बसवण्यात आली आहे. चंद्रभागा परिसरात चेंजिंग रूम, शौचालये, स्नानगृहे आणि घाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. नव्याने विकसित केलेल्या घाटांमुळे भाविकांची गर्दी विभागली जाण्यास मदत होणार आहे. रेल्वे परिसरातील सुमारे 65 एकर जागेचाही नियोजनासाठी उपयोग करण्यात येत आहे.
रांगेतील भाविकांसाठी सोयीसुविधा
दर्शन रांगेत भाविकांना तासनतास उभे राहावे लागू नये, यासाठी पंखे, कुलर आणि बसण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. यात्रेच्या काळात कोणत्याही वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये, हा प्रशासनाचा प्रयत्न आहे. नियोजनादरम्यान काही त्रुटी आढळल्यास त्या तातडीने दूर करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, अशी ग्वाहीही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
शिंदेंकडून चंद्रभागेच्या पायऱ्यांची स्वच्छता
पंढरपूर येथे वारकऱ्यांसाठी केलेल्या सोयीसुविधांचा आढावा घेताना मुख्यमंत्री शिंदे हे चंद्रभागेच्या तीरावर पोहोचले. यावेळी प्रशासनाकडून पायऱ्यांची पाइपद्वारे पाणी मारून स्वच्छता सुरू असल्याचे त्यांनी पाहिले. क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी कर्मचाऱ्यांच्या हातातील पाइप आपल्या हातात घेऊन पायऱ्यांची स्वच्छता सुरू केली. त्यानंतर त्यांनी चंद्रभागेच्या पात्रात बोटीद्वारे फेरफटका मारून आजूबाजूच्या तीरावर वारकऱ्यांसाठी केलेल्या वेगवेगळ्या सोयी सुविधांचा आढावा घेतला.
Read About : Drought in Maharashtra – राज्यात आता 310 तालुके दुष्काळी; हातकणंगले आणि गडहिंग्लजचा नव्याने समावेश
E-paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.