Ad Advertisement Ad Advertisement

Physical AI and Humanoid Robots : यंत्रमानवाचे युग अवतरणार

Physical AI and Humanoid Robots : एआयची सामान्यांच्या आयुष्यात एंट्री झाली ती चॅटजीपीटीमुळे. चॅटजीपीटी आलं आणि अचानक लोकांना अलिबाबाची गुहा सापडल्यासारखं वाटलं. असाच एक दुसरा महत्त्वाचा बदल आपल्या आयुष्यात होत आहे, एनविडिया कंपनीचे प्रमुख जेनसन वुआंग यांनी या क्षणाचे वर्णन – फिजिकल एआयचा चॅटजीपीटी क्षण असे केले आहे. फिजिकल एआय म्हणजे आहे तरी काय आणि तंत्रज्ञानाविषयक जग या नव्या प्रगतीमुळे इतके उत्साहात का आहे हे बघणे फार रोचक आहे.

एआयबद्दल विचार करताना इंग्रजी चित्रपटांत दाखवतात त्याप्रमाणे महाकाय खोल्यांमधले महाकाय संगणक डोळ्यांसमोर येतात. एखादा तरुण चष्मिष कीपॅडवर जोरजोरात काहीतरी बडवत हॅकर्सना शोधून काढतो आणि जगाला वाचवतो. एआयचा जन्म संगणकीयच आहे, त्यामुळे यातले बरेचसे चित्र खरेच आहे… म्हणजे जग वाचवणे वगैरे जाऊ देत, पण मोठे संगणक, त्यावर काम करणारे मोजके लोक आणि मानवी क्षमतेच्या कितीतरी जास्त प्रमाणात होणारे व्यवहार. हे सगळे चित्र खरेखुरेच आहे, पण एआय आता संगणकात बंदिस्त नाही. अलीकडच्या काळात चौथ्या औद्योगिक क्रांतीने एक महत्त्वाचे पाऊल जोमात उचलले आहे. एआय आता संगणकाच्या स्क्रीनमधून बाहेर पडून आपल्या आजूबाजूला वावरत आहे. या एआयला फिजिकल एआय असे म्हणतात.

फिजिकल एआय काय करतात? माणूस आपल्या आसपासच्या परिसराला समजून घेताना पंचेंद्रियांचा वापर करतो. जे त्याला समजते त्याला अनुसरून निर्णय घेतो आणि निर्णयांवर आधारित कृती करतो. फिजिकल एआय अशीच आहे. आसपासच्या जगाचा प्रत्यक्ष अंदाज घेत ते विचार आणि मग कृती करतात. थोडक्यात, फिजिकल एआय म्हणजे एआयचा वापर करून बनवण्यात आलेले यंत्रमानव.

आता कारखाने, रुग्णालये, पायाभूत सुविधा असलेल्या इतर ठिकाणी जगभरात ह्युमनॉईड रोबो (मानवासारखे दिसणारे यंत्रमानव) वापरायला सुरुवात होत आहे. अमेरिका आणि चीन यात अग्रेसर आहेत. उर्जा प्रकल्प, कारखाने, रुग्णालये, अन्न निर्मिती उद्योग या क्षेत्रांबरोबरच कोणकोणत्या क्षेत्रांत फिजिकल एआय उपयोगी पडेल का याबद्दल संशोधन सुरू आहे. अमेरिका आणि चीनसारख्या तगड्या उत्पादकांबरोबरच संयुक्त अरब अमिरातीसारखे श्रीमंत खेळाडूही यंत्रमानव निर्मिती क्षेत्रात रस घेत आहेत.

एआयच्या उगमानंतर अनेक वर्ष जनरेटिव एआय आणि लार्ज लँग्वेज मॉडेलसारख्या प्रणालींचा बोलबाला होता. २०२५-२६ मध्ये एआय स्क्रीनबाहेर पडायला सुरुवात झाली. २०२६ साली वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने एक अहवाल प्रकाशित केला, त्यात २०२६ मधल्या दहा प्रमुख तंत्रज्ञानांचा समावेश होता. या १० पैकी ८ गोष्टी फिजिकल एआयशी संबंधित आहेत. यावरून जग झपाट्याने यंत्रमानवांना मदतीला घेण्यासाठी उत्सुक आहे हे लक्षात येते. रोबॉटिक्सचे क्षेत्र, अर्थात यंत्रमानवांचे क्षेत्र. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी या क्षेत्रातील गुंतवणूक दुप्पट आहे. रोबोनिर्मितीत झपाट्याने उत्पादन होत आहे. चिनी कंपन्या ॲगिबोट, अबटेक, युनिट्री वगैरे रात्रंदिवस काम करून रोबो निर्मिती करत आहेत. अर्थात, यातल्या अनेक गोष्टी अजून प्राथमिक पातळीवर आहेत.

अनेकवेळा रोबोच्या टेस्ट रन्समध्ये गडबड होते. अनेकवेळा रोबो गमतशीर वागतात. हा सुरुवातीचा काळ आहे. सध्या रोबोजवर ज्या चाचण्या सुरू आहेत, त्यात ते अजून कुशल कसे होतील याचबरोबर ते मानवासाठी सुरक्षित आहेत ना, या मुद्द्यांकडे लक्ष पुरवण्यात येत आहे. तरीही येणारे जग यंत्रमानवांचे असेल असे अनेक तंत्रज्ञान तज्ज्ञांना वाटते.

यंत्रमानवांची निर्मिती हा एआयच्या प्रगतीत नैसर्गिक टप्पा आहे. जसे संगणक माणसाला न जमणारी मोठमोठी आकडेमोड क्षणार्धात करून देतो तसेच यंत्रमानवांचे आहे. अशी कामे जी माणसाला करणे शक्य नाही किंवा त्यासाठी शेकडोंनी माणसे लागणार असतील, अशी कामे रोबो कमी वेळात आणि कमी कष्टांत करून देतो. अगदी साधे उदाहरण द्यायचे झाले तर रोबोटिक सर्जरी ही आज सामान्य बाब झाली आहे. त्याला एआयची जोड ही त्या तंत्रज्ञानाची क्षमता वाढवणारी आहे.

या तंत्रज्ञानांमध्ये सोय आहे, ही उद्योगांची क्षमता वाढवणारी आहे. पण, यामुळे हजारो लोक नोकरी गमावू शकतील. इतक्या कमी काळातच अनेकांनी नोकरी गमावली आहे. ज्या क्षेत्रांतल्या नोकऱ्यांवर गदा येईल अशी अनेक क्षेत्रे जगभरात हजारो, लाखो लोकांना नोकरी देतात. वस्तू निर्मिती उद्योगांमध्ये माणसांची जागा रोबो घेत आहेत, ॲमेझॉनसारख्या मोठ्या कंपन्यांच्या गोदामांमध्ये वस्तूंचे नियोजन करायला मोठ्या प्रमाणात माणसांची गरज असते. या कंपन्यांनी माणसांची काटछाट सुरू केली आहे आणि त्यांच्या गोदामांतली अनेक कामे आता रोबो सांभाळत आहेत. या नोकऱ्यांमध्ये काम करणारा वर्ग गरीब आहे, कमी शिक्षित आहे, त्यामुळे त्यांना ही शारीरिक श्रमांचीच कामे जास्त प्रमाणात मिळतात.

रोबोजच्या आक्रमणाचा सर्वात जास्त फटका या गरीब वर्गाला पडणार आहे. पण, एका प्रकारच्या नोकऱ्या जातात तेव्हाच दुसऱ्या प्रकारच्या नोकऱ्यांची निर्मिती होते हा आजवरचा इतिहास आहे. त्यांचे स्वरूप वेगळे असते आणि बऱ्याचदा ज्या वर्गाच्या नोकऱ्या जातात, त्यांना नव्या बदलांना स्वीकारणे जरा अवघड होते. आताही नव्या प्रकारच्या रोजगारांची निर्मिती होत आहे. रोबोजवर लक्ष ठेवायला, मॅनेजमेंट सांभाळायला माणसांची गरज आहे. अर्थात, यासाठी त्यांची कार्यपद्धती समजून घेणे आवश्यक आहे. तुम्ही नव्या तंत्रज्ञानाची माहिती जितक्या लवकर कराल, तितक्या सहजतेने तुम्हाला नव्या युगाचा सामना करणे सोपे जाईल.

भक्ती चपळगावकर
bhalwankarb@gmail.com

Read ABout : AI-resistant jobs in India – एआयमुळे नोकऱ्या जाणार की मिळणार नव्या संधी?
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.