तब्बल 10767 किमीचा केला प्रवास : औसा तालुक्यात मुक्काम करून जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात दाखल
लातूर Rare Indian Vulture in Latur : लातूर जिल्ह्यात दुर्मिळ भारतीय गिधाडाचे दर्शन झाले आहे. गिधाडाचे पुनर्वसन आणि संवर्धन Bombay Natural History Society (BNHS) या संस्थेच्या सहकार्याने करण्यात आले आहे. त्याच्या पाठीवर विशेष ट्रॅकींग डिव्हाईसबसविण्यात आले असून, या उपकरणाच्या माध्यमातून संबंधित संस्था त्याच्या हालचाली आणि स्थलांतराच्या प्रवासावर लक्ष ठेवले जात आहे.
लातूर जिल्ह्यात 10 हजार किलोमीटरचा प्रवास करून आलेल्या दुर्मिळ भारतीय गिधाडाने लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात मुक्काम केल्याबाबत माहिती अभिजित रसाळ यांनी लातूर येथील वन्यजीवप्रेमी धनंजय गुट्टे यांना दिली, त्यानंतर दिनांक 18 नोव्हेंबर 2026 रोजी रात्री या गिधाडाच्या लातूर जिल्ह्यातील आगमनाची माहिती मिळाल्यानंतर 19 नोव्हेंबर रोजी पहाटे लातूर सामाजिक वनीकरण विभागाचे उपवनसंरक्षक (DFO) अमितराज जाधव, वन्यजीव छायाचित्रकार व अभ्यासक धनंजय गुट्टे आणि डॉ. दत्ता आंबेकर यांनी गुरुवारी पहाटे साडेपाच वाजता या दुर्मिळ पक्ष्याच्या निरीक्षणासाठी विशेष मोहीम आखली.
गिधाडाचे निरीक्षण करण्यासाठी पहाटे तेथे दिलेल्या मुक्कामाचे ठिकाणी जाऊन काही वेळ निरीक्षण केल्यानंतर त्यांना भारतीय गिधाड एका झाडावर बसलेले दिसले. त्याच्या डाव्या पायात पिवळ्या रंगाच्या रिंगवर F14 आणि उजव्या पायात निळ्या रंगाच्या रिंगवर M99 असे टॅग केलेले दिसून आले. त्याबाबत अधिक माहिती घेतली असता ते मेळघाट येथून अधिवासात मुक्त केल्याची माहिती धनंजय गुट्टे यांना मिळाली. त्या गिधाडाचे फोटो आणि व्हिडिओ चित्रीकरण वन्यजीवप्रेमी यांनी केले व ते सुदृढ असून निसर्गात योग्य रीतीने वावरण्यास सक्षम असल्याचे निरीक्षण नोंदवले.
त्यानंतर त्या गिधाडाने सकाळी 8:40 मिनिटांनी उड्डाण घेऊन पुढे प्रस्थान करून त्याने ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे मुक्काम केल्याची माहिती मिळाली. भविष्यात लातूर जिल्हा अशा गिधाडांसाठी एक चांगले अधिवास क्षेत्र असेल अशी अपेक्षा आहे. गिधाडांच्या अभ्यास व संवर्धन उपक्रमात लातूर येथील वन्यजीवप्रेमी यांनी निरीक्षण नोंदवून महत्वाची भूमिका बजावली आहे.
भारतीय गिधाडाबाबत अधिक माहिती
पिंजराबंद अधिवास जन्मल्यानंतर मेळघाट व्याघ्रप्रकल्पातून निसर्गमुक्त करण्यात आलेल्या गिधाडाने तब्बल १० हजार ७६७ किलोमीटरचा प्रवास केला असून, लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात मुक्काम करून सध्या ते ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात दाखल झाले आहे. (F14 indian vulture) एफ १४/एम ९९ या क्रमांकाच्या सात वर्षीय मादी भारतीय गिधाड प्रजातीच्या गिधाडाने महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि कर्नाटकातील विविध भूप्रदेश पालथे घातले आहेत. विशेष म्हणजे, या गिधाडाने जंगलातील गिधाडांच्या समूहात मिसळून स्वतंत्रपणे खाद्य शोधण्याची क्षमताही सिद्ध केली आहे.
पिंजोर येथे गिधाड प्रजनन केंद्र
‘बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’कडून (बीएनएचएस) हरियाणातील पिंजोर येथे गिधाड प्रजनन केंद्र उभारले आहे. या केंद्रात प्रजनन करण्यात आलेली गिधाडे महाराष्ट्रात आणून सोडण्यात आलेली आहेत. मेळघाट व्याघ्रप्रकल्पातील सोमठाणा वनपरिक्षेत्रात १५ भारतीय गिधाडांसह या सात वर्षीय मादी गिधाडाला निसर्गमुक्त करण्यात आले होते. २८ मे २०२६ रोजी त्याने उड्डाणाला सुरुवात केली. महाराष्ट्राची सीमा ओलांडून ते मध्य प्रदेशात दाखल झाले. या प्रवासात गिधाडांच्या नैसर्गिक अधिवासासाठी अनुकूल असलेल्या अनेक भूप्रदेशांचा त्याने वापर केला. २८ मे ते २० नोव्हेंबर या कालावधीत या गिधाडाने एकूण १० हजार ७६७ किलोमीटरचे अंतर पार केले आहे.
कर्नाटकातून महाराष्ट्रात प्रवेश
१३ नोव्हेंबर रोजी ते पुन्हा महाराष्ट्रात दाखल झाले. अकोट आणि मलकापूरमार्गे नाशिक, ठाणे आणि पुणे परिसरातून प्रवास करत ते दक्षिणेकडे कर्नाटकातील विजयपुरा परिसरात पोहोचले. त्यानंतर १८ नोव्हेंबर रोजी कर्नाटकातून महाराष्ट्रात प्रवेश करत लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात मुक्काम केला. पुढे प्रवास करत १९ नोव्हेंबर रोजी सकाळी लातूर जिल्ह्यातून पुढे ते ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात पोहोचल्याची माहिती बीएनएचएस चे अभिजित दास यांचेकडून मिळाली.
स्वतंत्रपणे खाद्य शोधले
या गिधाडाबाबत १८ सप्टेंबर २०२६ रोजी मध्य प्रदेशातील हलाली धरण परिसरात एक महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदविण्यात आले. येथे हे गिधाड रानटी गिधाडांच्या समूहासोबत मुक्काम करताना आढळले. विशेष म्हणजे, त्यावेळी त्याच्या पोटातील अन्नसाठा (क्रॉप) भरलेला होता. यावरून या गिधाडाने स्वतःहून खाद्य मिळवले असून, ते रानटी गिधाडांच्या समूहात मिसळण्यात यशस्वी झाल्याचे स्पष्ट झाले. निसर्गमुक्त केलेली गिधाडे स्वतंत्रपणे खाद्य शोधू शकतात आणि नैसर्गिक गिधाडांच्या समूहात सामावून जाऊ शकतात, याचा हा महत्त्वपूर्ण पुरावा मानला जात आहे.
पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा पक्षी
भारतीय गिधाड हा पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा पक्षी आहे. मृत प्राण्यांचे मांस खाणारा हा पक्षी नैसर्गिक स्वच्छतादूत म्हणून ओळखला जातो. मृत प्राण्यांच्या अवशेषांची विल्हेवाट लावण्यात आणि पर्यावरणातील संभाव्य रोगप्रसार कमी करण्यास त्याची महत्त्वपूर्ण भूमिका असते. त्याचे शास्त्रीय नाव Gyps indicus असून, IUCN Red List नुसार या प्रजातीचा समावेश ‘Critically Endangered’ म्हणजेच अतिगंभीर संकटग्रस्त श्रेणीत करण्यात आला आहे.
गिधाडांचे संवर्धन आवश्यक
भारतामध्ये गिधाडांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होण्यामागे पशुवैद्यकीय उपचारांमध्ये वापरल्या जाणाऱ्या Diclofenac या औषधाचा मोठा वाटा असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. या औषधाचे अवशेष असलेले मृत जनावरांचे मांस खाल्ल्याने गिधाडांच्या मूत्रपिंडांवर गंभीर परिणाम होऊन त्यांचा मृत्यू होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर गिधाडांचे संवर्धन, सुरक्षित अधिवास, औषधांचा नियंत्रित वापर आणि वैज्ञानिक पद्धतीने त्यांच्या हालचालींचे निरीक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे.
Read About: Cyber Movie 2026 – नोकरीच्या शोधात गेले अन सायबर गुन्ह्यांच्या जाळ्यात अडकले
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.