आरबीआयच्या UDGAM पोर्टलवरून दहा वर्षांपासून दावा न केलेल्या ठेवींची माहिती मिळणार; खातेदारांसह वारसांनाही लाभ
छत्रपती संभाजीनगर : RBI UDGAM Portal बँकेत आपली काही रक्कम जमा आहे, मात्र ती किती आहे, कोणत्या बँकेत आहे किंवा तिच्यावर दावा कसा करायचा, याची माहिती नाही… अशा खातेदारांसाठी आता दिलासादायक सुविधा उपलब्ध झाली आहे. देशातील विविध बँकांमध्ये दहा वर्षांपासून दावा न केलेल्या ठेवींचा शोध घेण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) UDGAM हे ऑनलाइन पोर्टल उपलब्ध करून दिले आहे. या सुविधेची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आरबीआयकडून जनजागृती मोहीमही सुरू आहे. त्याअंतर्गत बँक खातेधारक आणि पॅनकार्डधारकांना मोबाईलवर संदेश पाठवून या पोर्टलची माहिती दिली जात आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे विस्मरणात गेलेल्या ठेवींचा शोध घेण्याचा मार्ग नागरिकांसाठी खुला झाला आहे.
अनेकदा नोकरी, व्यवसाय किंवा अन्य कारणांमुळे नागरिकांकडून जुन्या बँक खात्यांतील ठेवींकडे दुर्लक्ष होते. काही खातेदारांना आपल्या खात्यात किती रक्कम जमा होती, याचीही माहिती राहत नाही. तर काही प्रकरणांमध्ये खातेदाराच्या निधनानंतर त्यांच्या वारसांना बँकेत जमा असलेल्या रकमेची माहिती नसते. परिणामी, अशा ठेवी दीर्घकाळ दावा न होता बँकांमध्ये पडून राहतात. अशा ठेवींची माहिती मिळविण्यासाठी UDGAM पोर्टल उपयुक्त ठरणार आहे.
एका पोर्टलवर अनेक बँकांतील ठेवींचा शोध
आरबीआयच्या UDGAM (Unclaimed Deposits – Gateway to Access inforMation) पोर्टलच्या माध्यमातून देशातील सहभागी बँकांमधील दहा वर्षांपासून दावा न केलेल्या ठेवींची माहिती शोधता येते. यासाठी https://udgam.rbi.org.in या संकेतस्थळाला भेट देऊन नोंदणी करावी लागते. त्यानंतर लॉगिन करून खातेदाराचे नाव आणि उपलब्ध तपशीलांच्या आधारे शोध घेता येतो. पॅन कार्ड, जन्मतारीख यांसारख्या ओळखविषयक माहितीचा उपयोग करून संबंधित ठेवींची माहिती मिळविता येते. त्यामुळे खाते क्रमांक किंवा जमा असलेल्या रकमेची अचूक माहिती नसली तरी शोध घेण्याची संधी उपलब्ध होते.
ठेवीची माहिती मिळाल्यानंतर पुढे काय?
UDGAM पोर्टलवर संबंधित बँकेतील ठेव आढळल्यानंतर प्रत्यक्ष रक्कम मिळविण्यासाठी त्या बँकेच्या शाखेशी संपर्क साधावा लागतो. खातेदाराने आवश्यक कागदपत्रे आणि केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. खातेदाराचे निधन झाले असल्यास वारसांना संबंधित बँकेच्या नियमानुसार वारसाहक्काची कागदपत्रे सादर करावी लागतात. त्यानंतर बँकेच्या पडताळणीनुसार संबंधित रकमेवर दावा करता येतो. लागू असलेल्या नियमानुसार व्याजासह रक्कम मिळू शकते. विशेष म्हणजे, UDGAM पोर्टल हे केवळ ठेवींची माहिती शोधण्याचे माध्यम असून प्रत्यक्ष पैसे मिळविण्याची प्रक्रिया संबंधित बँकेमार्फतच पूर्ण करावी लागते.
जुन्या ठेवी तपासण्याचे आवाहन
अनेक वर्षांपूर्वी बँकेत जमा केलेली रक्कम विस्मरणात गेली असेल किंवा कुटुंबातील दिवंगत सदस्यांच्या नावावर ठेवी असण्याची शक्यता असेल, तर नागरिकांनी त्यांची माहिती तपासून घ्यावी. या सुविधेमुळे खातेदारांना तसेच त्यांच्या वारसांना आपली हक्काची रक्कम शोधण्याची संधी मिळणार आहे. अधिक माहितीसाठी आरबीआयच्या https://rbikehtahai.rbi.org.in/marathi/rbi-udgam-portal.html या संकेतस्थळाला भेट देता येईल.
बँक ग्राहकांसाठी उपयुक्त सुविधा
“अनेक ग्राहकांनी वर्षानुवर्षांपूर्वी बँकेत ठेवी ठेवल्या असतात; मात्र कालांतराने त्यांची माहिती विस्मरणात जाते. काही वेळा खातेदारांच्या वारसांनाही अशा ठेवींबाबत माहिती नसते. अशा परिस्थितीत आरबीआयचे UDGAM पोर्टल अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. एका पोर्टलच्या माध्यमातून विविध बँकांमधील दावा न केलेल्या ठेवींची माहिती शोधता येणे ही ग्राहकांसाठी मोठी सुविधा आहे. नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या आणि कुटुंबातील सदस्यांच्या जुन्या ठेवींची माहिती तपासावी.”
– दत्ता शिंदे, डेप्युटी सीईओ, देवगिरी बँक
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.