विद्यार्थ्यांनी मांडलेल्या प्रत्येक प्रस्तावाचा सखोल आढावा घेऊन भरती परीक्षा प्रक्रियेत आवश्यक सुधारणा करण्यावर भर
छत्रपती संभाजीनगर : Recruitment Exam Task Force : राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय भरती परीक्षा टास्क फोर्सने छत्रपती संभाजीनगर विभागातील २४७ विद्यार्थ्यांशी स्मार्ट सिटी कार्यालयात थेट संवाद साधला. यावेळी परीक्षा वेळापत्रक, प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका तपासणी, पदसंख्या, परीक्षा केंद्रे, निकाल, नियुक्ती, प्रतीक्षा यादी व तक्रार निवारण यासह विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी शेडको सूचना मांडल्या. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक प्रस्तावावर सखोल आढावा घेणार असल्याचे टास्क फोर्सच्या अध्यक्ष व्ही.राधा यांनी सांगितले.
टास्क फोर्सच्या अध्यक्ष तथा सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव (सेवा) व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस समितीचे सदस्य तथा पोलीस महासंचालक सदानंद दाते, सदस्य सचिव तथा पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डॉ. एन. रामास्वामी, सदस्य तथा नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम उपस्थित होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे समितीचे सदस्य तथा संघ लोकसेवा आयोगाचे माजी सदस्य एअर मार्शल अजित शंकरराव भोसले आणि सदस्य तथा आयआयटी मुंबईचे प्राध्यापक श्यामप्रसाद करगड्डे सहभागी झाले. या संवाद कार्यक्रमात सातही जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी कार्यालयांतून विद्यार्थी ऑनलाइन सहभागी झाले होते. सकाळपासून विद्यार्थ्यांनी विविध गटात भेटी देत अनेक सूचना केल्या. टास्क फोर्स सदस्यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या सूचनाला गांभीर्याने ऐकून घेतले.
विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी प्रास्ताविकात सांगितले की, ९ ते १८ सप्टेंबरदरम्यान भरती परीक्षा सुधारणांसंदर्भात ३ हजार ६९४ निवेदने व ९ हजार ६९४ ई-मेल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी सुमारे ३ हजार ४३२ ई-मेलला प्रशासनाकडून उत्तरे देण्यात आली आहेत. प्राप्त सूचना व निवेदनांचे ६० विषयांमध्ये वर्गीकरण करण्यात आले असून, त्याआधारे सादरीकरण तयार करण्यात आले आहे. स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी, नुकतेच उत्तीर्ण झालेले उमेदवार व नवनियुक्त कर्मचाऱ्यांकडूनही सूचना घेण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीला विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी., सह आयुक्त मंजुषा मिसकर आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते.
परीक्षांचे वार्षिक वेळापत्रक निश्चित असावे
परीक्षांचे वार्षिक वेळापत्रक निश्चित करून त्याचे पालन करावे, परीक्षा पद्धती व अभ्यासक्रमात वारंवार बदल करू नयेत आणि बदल आवश्यक असल्यास पुरेशी पूर्वसूचना द्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. विविध संवर्गांतील रिक्त पदांची संख्या वेळेत जाहीर करून उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, जलसंपदा, वैद्यकीय व दंत वैद्यकीय अधिकारी यांसह अन्य पदांची नियमित भरती करावी, अशी सूचनाही करण्यात आली.
तंत्रज्ञानाचा वापर करावा
प्रश्नपत्रिका निर्मितीपासून छपाई, वाहतूक व वितरणापर्यंतची प्रक्रिया अधिक सुरक्षित करावी, प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या व्यक्तीलाही परीक्षेचे स्वरूप व प्रश्नपत्रिकेची माहिती मिळणार नाही, अशी व्यवस्था विकसित करावी आणि प्रश्नपत्रिका फुटीला पूर्णपणे आळा घालण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा, अशी सूचना विद्यार्थ्यांनी केली. प्रश्नपत्रिकांतील चुका व भाषांतरातील त्रुटी टाळण्यासाठी विषयतज्ज्ञांची मदत घ्यावी.
मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची ठेवावी
राज्यसेवा मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची ठेवावी, प्रश्नांची काठिण्याची पातळी विद्यापीठीय अभ्यासक्रमाशी सुसंगत असावी आणि गट-ब व गट-क परीक्षांतील भाषा विषय पात्रता स्वरूपाचे ठेवावेत, अशा सूचनाही मांडण्यात आल्या. एकाच उमेदवाराची अनेक पदांवर निवड झाल्यास पदनिवड व पदाचा त्याग (ऑप्टिंग आऊट) याबाबत स्पष्ट धोरण असावे. तसेच रिक्त पदांवर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
गुणांकनासाठी समान निकष
उत्तरपत्रिका तपासणी व गुणांकनासाठी समान निकष निश्चित करून परीक्षकांची गुणवत्ता व पात्रता तपासावी, अशी मागणी करण्यात आली. उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेची कार्बन प्रत, प्राथमिक व अंतिम उत्तरतालिका तसेच आदर्श उत्तरे उपलब्ध करून द्यावीत आणि आवश्यकतेनुसार फेरतपासणीची सुविधा द्यावी, अशी सूचना करण्यात आली. कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२३ व राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ मधील उत्तरपत्रिका तपासणी, गुणदान व गुणांतील फरकाबाबत विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदविले. चुकीचे प्रश्न व परीक्षा प्रक्रियेतील त्रुटी पुराव्यासह लेखी स्वरूपात सादर करण्याचे आवाहन व्ही. राधा यांनी केले.
ऑनलाइन परीक्षा एकाच सत्रात घ्यावी
ऑनलाइन परीक्षांबाबतही विद्यार्थ्यांनी विविध सूचना केल्या. संगणकाधारित परीक्षा घ्यायची असल्यास ती एकाच सत्रात घ्यावी, विविध सत्रांतील गुणांचे समायोजन टाळावे आणि सीसीटीव्ही चित्रीकरण व जैवमितीय पडताळणीसह प्रभावी नियंत्रण व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली. सुरक्षित यंत्रणा उपलब्ध होईपर्यंत ऑफलाइन, ओएमआर पद्धतीने परीक्षा घेण्याची सूचनाही करण्यात आली. पुढील एक वर्ष ऑनलाइन परीक्षा न घेता ओएमआर पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतल्याचे व्ही. राधा यांनी स्पष्ट केले. ओएमआर परीक्षांसाठी प्रमाणित नियमावली तयार करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
परीक्षा केंद्रावर सुविधा ठेवाव्या
परीक्षा केंद्रांवर स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी व योग्य बैठक व्यवस्था असावी, उमेदवारांनी अर्ज केलेल्या जिल्ह्यातच, शक्य असल्यास, परीक्षा केंद्र द्यावे आणि केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे चित्रीकरण करावे, अशी मागणी करण्यात आली. उमेदवारांच्या तक्रारी व हरकतींसाठी केंद्रीकृत ऑनलाइन व्यवस्था सुरू करून त्यांचे वेळेत निराकरण करावे, अशी सूचना करण्यात आली.
Read About : SSC HSC Exam 2027: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.