Ad Advertisement Ad Advertisement

Red Sprites – स्पेनमध्ये आकाशामधून पडणारे प्रकाशाचे अवाढव्य खांब कॅमेऱ्यात कैद

दुर्मिळ ‘रेड स्प्राइट्स’ची अद्भुत झलक, काही मिलीसेकंदांत दिसते नयनरम्य दृश्य

नवी दिल्ली : Red Sprites : भूमध्य समुद्रावर आलेल्या तीव्र वादळादरम्यान आकाशातून खाली कोसळल्यासारखे भासणारे लाल रंगाचे प्रकाशाचे अवाढव्य खांब एका छायाचित्रकाराने आपल्या कॅमेऱ्यात टिपले आहेत. पृथ्वीच्या वातावरणात घडणारी ही एक अत्यंत दुर्मिळ आणि गुढ विद्युत घटना आहे.
फ्रेंच छायाचित्रकार फ्लोरिअन रिओ यांनी स्पेनच्या किनाऱ्याजवळील वादळांच्या हालचालींचा अभ्यास करून कॉर्सिका बेटावरील काल्वी गावाजवळून हा अद्भुत नजारा आपल्या कॅमेऱ्यात टिपला आहे. या फोटोमध्ये दूरवर असलेल्या ढगांच्या वर लाल रंगाचे खांबासारखे चमकणारे प्रकाशझोत स्पष्ट दिसत आहेत, जे अंतराळातून खाली उतरत असल्याचा भास निर्माण करतात.

‘रेड स्प्राइट्स’ म्हणजे नेमके काय?

रेड स्प्राइट्स हे ढग आणि जमिनीदरम्यान चमकणाऱ्या साध्या विजांसारखे नसून, ते वादळी ढगांच्या खूप वर, साधारणपणे ५० ते ९० किलोमीटर उंचीवर (मेसोस्फियरच्या दिशेने) वातावरणाच्या वरच्या भागात तयार होतात. खाली होणाऱ्या जोरदार विजांच्या कडकडाटामुळे निर्माण झालेले विजेचे क्षेत्र वातावरणातील रेणूंना उत्तेजित करते, ज्यामुळे ते प्रकाश बाहेर सोडतात. यात नायट्रोजन रेणूंच्या उत्सर्जनामुळे हे प्रकाशझोत प्रामुख्याने लाल रंगाचे दिसतात. यांचा आकार उभ्या खांबांसारखा, फांद्यांसारख्या धाग्यांसारखा किंवा जेलीफिशसारखा असू शकतो. अवाढव्य आकार असूनही हे प्रकाशझोत केवळ काही मिलीसेकंदांसाठी टिकतात. त्यामुळे ते अत्यंत नयनरम्य असले तरी पाहण्यास आणि कॅमेऱ्यात टिपण्यास अत्यंत कठीण असतात.

हे फोटो टिपणे का कठीण असते?

जमिनीवरून पाहताना हे ‘रेड स्प्राइट्स’ सहसा वादळाच्या ढगांमुळे लपले जातात. शिवाय, ते केवळ काही मिलिसेकंदांसाठीच चमकत असल्याने छायाचित्रकारांना दूरवरच्या वादळांवर योग्य वेळी आणि अनुकूल वातावरणात लक्ष ठेवावे लागते. १९८९ मध्ये शास्त्रज्ञांना या घटनांचे पहिले पुरावे मिळाले होते, ज्यामुळे ही केवळ कोणतीही नजरचुक नसून एक खरीखुरी वातावरणीय घटना असल्याचे सिद्ध झाले होते.

Read About : Antarctic polynya formation – अंटार्क्टिकामध्ये भगदाड कसे पडले?
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.