Ad Advertisement Ad Advertisement

Sindhu River : सिंघे खब्बाब सांगत्स्पो अर्थात सिंधू

Sindhu River : सिंधूच्या तीरी किती प्रकारच्या वंशांच्या वैविध्यांनी धर्म, भाषा, संस्कृतींनी तिची माया अनुभवली याची कल्पना येईल. हिंदू, बौद्ध, शीख, जैन, मुस्लिम तसंच पारशी धर्म इथे नुसते रुजले नाहीत, तर समृद्ध झाले.

लहानपणी सुट्टीत भूगोलाचा नकाशा खेळण्याचा छंद जडला होता. जगाच्या नकाशापासून ते जिल्ह्याचा नकाशा खेळत असताना त्यातील ज्ञात अज्ञात ठिकाणे शोधणे म्हणजे अवघड काम असायचे, पण मजा यायची. आमचे वडील पण या खेळात सहभागी व्हायचे. एकदा त्यांनी जगाच्या नकाशात विविध नद्या कुठे आहेत, त्या उगम कुठे पावतात, समुद्राशी त्यांचे मिलन कोणत्या जागी होते हे शोधायला लावले. सहावीच्या पुस्तकात प्रथमच मोहेंजेदारो-हडप्पा या सिंधू संस्कृतीतील उत्खननाविषयीचा धडा अभ्यासाला होता. त्यात प्राचीन सिंधू नदीविषयी प्रथमच माहिती मिळाली होती. उत्सुकतेपोटी नकाशात सिंधू नदी नेमकी कुठे आहे, याविषयी वडिलांना विचारले. मग त्यांनी नकाशा आडवा धरून सिंधूचा तिबेटच्या पठारावरील उगम ते पाकिस्तानमधील कराची जवळ सागराशी होणारे मिलन दाखवले. भारतात ही नदी कुठे प्रवेश करते ते दाखवले. वडिलांनी शिकवलेल्या या खेळातून जगभरातील सरितांचे अंतरंग जाणून घेण्याची शिकवण मिळाली. बालमनात सिंधू सरितेने नकळत घर केले, ते आजही टिकून आहे.

साधारण तीन वर्षांपूर्वी लडाखला जावून आलो. उपशी गावाजवळ सिंधूचे दर्शन घेतले. पुढे लेह जवळ सिंधू घाट आहे, तेथे थंडगार पाण्यात स्नान केले. सोबतच्या भाचे मंडळींनापण स्नान घालून पुण्य पदरात पाडले. झंस्कर-सिंधू संगमाला भेट दिली. परतल्यावर मित्रांना अनुभव सांगत होतो. एका शिक्षक मित्राने विचारले, सिंधू कुठे भारतात आहे…? मी डोक्याला हात लावला व गुगल-बाबाला विचार, तो सांगेल असे सुचवले. असो. जिच्या नावानं आपला देश आणि धर्म ओळखला जातो ते हिंदुस्थान आणि हिंदू धर्म हे शब्द, सिंधू शब्दातूनच आलेले आहेत. जगातील प्राचीन संस्कृतींपैकी एक सुस्थापित समाजव्यवस्था, नगररचना याच नदीच्या किनारी होती. तशीच सरस्वती नदीच्या दुआबातही नगरं वसलेली होती. सरस्वती नदीच्या वाळवंटात नष्ट होण्यानंतर इथली बरीचशी वस्ती गंगा-यमुनेच्या खोऱ्यात राहायला गेली. तिथे त्यांनी समृद्ध जीवनसंस्कृती निर्माण केली.

इ.स.पू. तीन हजार वर्षांपूर्वी वसलेल्या मोहेंजोदारो आणि हडप्पा संस्कृतीचा विकास, प्रसार लोथल-सौराष्ट्र, कालिबंगन-राजस्थानपर्यंत होता. आधुनिक नगररचनाकारांनी आश्चर्यानं तोंडात बोट घालावं अशी रेखीव नगरांची निर्मिती त्याकाळच्या लोकांनी केली होती. सिंधूच्या तीरी किती प्रकारच्या वंशांच्या वैविध्यांनी धर्म, भाषा, संस्कृतींनी तिची माया अनुभवली याची कल्पना येईल. हिंदू, बौद्ध, शीख, जैन, मुस्लिम तसंच पारशी धर्म इथे नुसते रुजले नाहीत, तर समृद्ध झाले. आज तेथे इस्लामचा प्रभाव दिसत असला तरी या सर्व धर्मांची पवित्रस्थानं हिच्या किनारी आहेत. ती ज्या देशांतून वाहते, ज्या असंख्य उपनद्यांनी तिचं रूप विशाल होतं, तसंच ज्या वैविध्यपूर्ण भौगोलिक परिसरातून ती प्रवास करते; त्यामुळे तिचं सौंदर्य शतगुणित आणि अनोखं झालं आहे. सिंधू नदीचा ३२०० किलोमीटरचा हा प्रवास हिमालयाच्या पर्वतराजींतून, तिबेटमधून सुरू होऊन पाकिस्तानातील कराची इथे अरबी समुद्रात तिचा विलय होतो. चीन, पाकिस्तान, भारत असा तिचा भौगोलिक प्रवास आहे. गेली पाच हजार वर्ष ती आपल्या अनेक प्रवाहांनी मनुष्य नि प्राणिजीवन प्राणवान ठेवत आली आहे. भारतीय संस्कृतीचा पाळणा जिच्या किनाऱ्यावर हलला ती ही नदी.

अलीकडेच सिंधूदर्शन यात्रा सुरू झाली आहे, जी काश्मीरमधून वाहणाऱ्या सिंधू नदी तीरांवरील गावी आणि इतर (खीर भवानी, अभिवनगुप्त समाधीस्थळ इ.) तीर्थस्थानी जाते. लेह-लडाखच्या निसर्गरम्य प्रदेशातून सिंधू वाहते, त्या अलौकिक निसर्गाचेही दर्शन लोकांना घेता येते. झेलम आणि सिंधू संगमावर गंदरबल जिल्ह्यात ७५ वर्षांनंतर १४ जून २०१६ रोजी कुंभमेळा झाला, जिथे हजारो लोक सिंधू नदीवर स्नानासाठी जमले होते. सिंधू नदीची महती लिखित स्वरूपात मिळते ती ऋग्वेदात. या नदीच्या जलाला ते गाईच्या दुधासारखे वर्णतात. जिचं वेगवान जल हे स्तन्य भरलेल्या कासे असलेल्या गाईंच्या दुधासारखं ओसंडून वाहत असतं. ते जल जणू मध आणि घृत यांचं मिश्रणच असतं. जगातील प्राचीनतम नद्यांत तिची गणना होते. गंगेहूनही तिचा प्रवाह जुना आहे. सिंधूच्या दोन्ही काठांवर, सूफी संतांचे मजार, पीर, कबरी आहेत.

गेल्या अकराशे वर्षांत अगणित साधू, संत, फकीर या भागात होऊन गेले आहेत. फक्त थट्टा शहराच्या आसपास सव्वा लाख फकिरांच्या कबरी आहेत. सिंधूकाठी बौद्ध वज्रयान पंथाचे प्रचारक पद्मसंभव यांना आजही मानाचे स्थान आहे. पाकिस्तानने अनेक वर्षे ही गोष्ट जगापासून लपवून ठेवली होती की सिंधू नदीचे जल हे खारट होत आहे. आता मात्र ही बाब हाताबाहेर जाऊ लागल्याचे जाणवल्याने त्याबद्दल चारचौघांत आणि तज्ज्ञांच्या वर्तुळात चर्चा होऊ लागली आहे. सिंधू नदी समुद्राला जिथे मिळते, तेथील अशा १७ खाड्या कोरड्या पडल्या आहेत. एकेकाळी हा डेल्टा १३० मैल लांबीचा, १६ चौ. मैलाचा जगातील पाचव्या क्रमांकाचा होता. आपल्याकडील सुंदरबनसारखा जैवविविधतेने सजलेला प्रदेश होता. आता जलचर, पाणवनस्पती यांपैकी फक्त १% शिल्लक राहिले आहे. कारण नदीच्या वरच्या अंगाला धरणे झाल्याने नदी जो गाळ वाहून आणायची नि किनाऱ्यावर पसरायची तो बंद झालाय.

सिंधूला प्रदेशनिहाय अनेक नावे आहेत. पकिस्तानात दर्या ए सिंध, पश्तो भाषेत अबासिन म्हणजे नद्यांचा पिता, तिबेटी भाषेत सेंगे झाबो- सिंहासमान नदी, पर्शियन भाषेत रुद ए सिंध, अरबीत नहर अल सिंध, तुर्कीत निलाभ, चिनी भाषेत यिंद या नावांनी ओळखलं जातं. अरबी समुद्राचे मूळ नाव सिंधू सागर असे आहे, म्हणूनच शिवाजी महाराजांनी आपल्या लाडक्या जलदुर्गाला सिंधुदुर्ग हे नाव दिले व अठरा टोपकरांचे उरावर शिवलंका सिंधुदुर्ग ही अजिंक्य जागा निर्माण केली. सिंधूचे अंतरंग जाणून घ्यायचे असतील, तर संजीवनी खेर यांचे जलसुक्त व सिंधुतील साम्राज्ये ही पुस्तके अवश्य वाचावीत.

विजय सांबरे
vijaysambare@gmail.com

Read About : India Poverty Reduction : गरिबी कमी झाली; जीवनमान बदलले का?
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.