Ad Advertisement Ad Advertisement

SKY-001 AI Model : भारतीय उद्योजकाने तयार केला चॅटजीपीटीपेक्षा भारी एआय! GPT-6 Astra पेक्षा १५० पट स्वस्त

सॅम पसुपालक यांच्या Skyfall AI कंपनीचा दावा; इंजिनिअरिंग डिझाइनमध्ये वेग आणि कमी खर्च, मात्र चाचण्यांची स्वतंत्र पडताळणी नाही.

नवी दिल्ली : SKY-001 AI Model भारतीय उद्योजक सॅम पसुपालक यांनी इंजिनिअरिंग क्षेत्रातील गुंतागुंतीची कामे करण्यासाठी ‘स्काय-००१’ हे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) मॉडेल विकसित केले आहे. हे मॉडेल आघाडीच्या एआय प्रणालींपेक्षा अधिक वेगवान आणि स्वस्त असल्याचा दावा त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे, कंपनीच्या चाचण्यांनुसार, संगणकाच्या मदतीने डिझाइन तयार करण्याच्या (कॅड) विशिष्ट कामासाठी ‘स्काय-००१’ चा खर्च ‘जीपीटी-६ ॲस्ट्रा’च्या तुलनेत १५० पट कमी आहे.
‘स्कायफॉल एआय’ या कंपनीचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सॅम पसुपालक यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर या मॉडेलची माहिती आणि चाचण्यांचे निष्कर्ष प्रसिद्ध केले. सुमारे १८ महिन्यांच्या संशोधनातून हे मॉडेल विकसित करण्यात आले आहे. कॅड आणि ‘बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग’ (बीआयएम) या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून इंजिनिअरिंग डिझाइन तयार करणे, हा त्याचा प्रमुख उद्देश आहे.

डिझाइनचे छोटे भाग करून काम

गुंतागुंतीच्या उत्पादनाचे डिझाइन करताना ‘स्काय-००१’ प्रथम त्याचे विविध भाग आणि जवळवणी निश्चित करते. त्यानंतर प्रत्येक घटक कसा तयार करायचा, यासाठी आरेखन (स्केच), दृश्यरचना आणि बांधकामाच्या टप्प्यांचे नियोजन केले जाते. इमारतींच्या डिझाइनमध्येही हीच पद्धत वापरता येते. बीआयएम प्रक्रियेत इमारतीची रूपरेषा स्वतंत्र युनिट आणि खोल्यांमध्ये विभागली जाते.
कंपनीच्या मते, या पद्धतीमुळे शेकडो किंवा हजारो टप्पे असलेली कामे हाताळताना प्रत्येक घटकाची संपूर्ण डिझाइनशी सुसंगतता राखण्यास मदत होते.

खर्चात मोठी तफावत; अचूकतेत किरकोळ फरक

पसुपालक यांच्या दाव्यानुसार, ‘स्काय-००१’ चाचणीतील आघाडीच्या मॉडेल्सपेक्षा ५१ ते १२५ पट वेगवान आणि तुलनेत १५० ते २१० पट स्वस्त ठरले. कॅड चाचणीत ‘स्काय-००१’ साठी प्रत्येक नमुन्याचा खर्च ०.००५ डॉलर, तर जीपीटी-६ ॲस्ट्रासाठी ०.७५ डॉलर असल्याचे सांगण्यात आले.

‘अचूकतेच्या इंटरसेक्शन ओव्हर युनियन’ (आयओयू) मापनात ‘स्काय-००१’ ला ७९.७ टक्के, तर जीपीटी-६ ॲस्ट्राला ७९.१ टक्के गुण मिळाले. आयओयू हे तयार डिझाइन संदर्भ डिझाइनशी किती जुळते, हे मोजते. मात्र, हे निष्कर्ष स्कायफॉल एआयच्या स्वत:च्या चाचण्यांवर आधारित असून त्यांची स्वतंत्र पडताळणी झालेली नाही.

कोण आहेत सॅम पसुपालक?

ओडिशातील भुवनेश्वर येथे जन्मलेले पसुपालक सध्या अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे कार्यरत आहेत. त्यांनी २०११ मध्ये कॅनडातील वॉटर्लू विद्यापीठातून गणित आणि संगणकशास्त्रातील पदवी घेतली. २०१९ मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून राज्यशास्त्राचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. २०२५ मध्ये ‘स्कायफॉल एआय’ सुरू करण्यापूर्वी त्यांनी २०११ मध्ये ‘मलुबा’ या एआय संशोधन स्टार्टअपची सहस्थापना केली होती. मायक्रोसॉफ्टने २०१७ मध्ये या कंपनीचे अधिग्रहण केले होते.

Read About: टेस्लाची उडती कार केवळ स्वप्न? 2028 पूर्वी उत्पादन सुरू होण्याची शक्यता कमी

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.