नियम मोडणाऱ्या कंपन्यांचे एसएमएस हेडर ब्लॉक, एआय प्रणालीने १९.९ अब्ज संशयित स्पॅम कॉल आणि मेसेज ओळखले
नवी दिल्ली : Spam Calls and Messages नको असलेले जाहिरातींचे कॉल आणि मेसेज (स्पॅम) पाठवून ग्राहकांना त्रास देणाऱ्यांविरोधात केंद्र सरकारने कठोर पावले उचलली आहेत. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) आर्थिक वर्ष २०२७ च्या दुसऱ्या तिमाहीत, म्हणजेच जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांच्या काळात १.२४ लाखांहून अधिक मोबाईल नंबर आणि टेलिकॉम संसाधनांवर मोठी कारवाई केली आहे. तसेच, वारंवार नियम मोडणाऱ्या ३७४ कंपन्यांना (सेंडर्सना) कायमचे ब्लॅकलिस्ट केले आहे. केंद्रीय संचार मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत निवेदनातून ही माहिती दिली आहे.
कठोर कारवाईचे स्वरूप
स्पॅम कॉल आणि मेसेजचा सुळसुळाट रोखण्यासाठी ट्रायने या तीन महिन्यांत अनेक कडक उपाययोजना राबवल्या. यामध्ये नियम मोडणाऱ्यांचे आउटगोइंग कॉल तात्काळ बंद करणे आणि अनेक नंबर दीर्घकाळासाठी कायमचे खंडित करणे या कारवाईचा समावेश आहे. एवढेच नाही, तर सर्वच टेलिकॉम कंपन्यांच्या पातळीवर दोषी सेंडर्सना ब्लॅकलिस्ट करण्यात आले आहे. वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांचे एसएमएस हेडर देखील ब्लॉक केले गेले आहेत, जेणेकरून ते पुन्हा ग्राहकांना त्रास देऊ शकणार नाहीत.
ग्राहकांचा मोठा सहभाग आणि आकडेवारी
मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, जुलै ते सप्टेंबर या काळात देशभरातील टेलिकॉम नेटवर्कवरून एकूण ७१४.०१ अब्ज (७१,४०१ कोटी) फोन कॉल झाले. या तुलनेत विनापरवाना पाठवल्या जाणाऱ्या व्यावसायिक मेसेजच्या १५.२९ लाख तक्रारी नोंदवल्या गेल्या. याचाच अर्थ प्रत्येक १० लाख कॉल्समागे सुमारे २.१४ तक्रारी आल्या आहेत. विशेष म्हणजे, टेलिकॉम कंपन्यांना मिळालेल्या एकूण तक्रारींपैकी तब्बल ९२.९ टक्के तक्रारी सामान्य नागरिकांनी ट्राय डीएनडी या मोबाईल ॲपचा वापर करून दाखल केल्या आहेत. या ॲपमुळे ग्राहकांना जाहिरातींचे मेसेज थांबवणे आणि तक्रार करणे अत्यंत सोपे झाले आहे.
एआय तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर
स्पॅम रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचीही मोठी मदत घेतली जात आहे. एआय आधारित स्पॅम शोधणाऱ्या प्रणालीने तब्बल १९.९ अब्ज (१,९९० कोटी) संशयित स्पॅम कॉल आणि मेसेजची ओळख पटवली. यामुळे ग्राहकांना असे कॉल किंवा मेसेज दुर्लक्षित करणे किंवा सावधगिरीने स्वीकारणे शक्य झाले. तसेच, नियम मोडणाऱ्या संशयित सेंडर्सना ४५.९ लाखांहून अधिक इशाऱ्याच्या सूचना पाठवण्यात आल्या आहेत.
व्यापक जनजागृती मोहीम
ग्राहकांमध्ये ट्राय डीएनडी ॲपबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी सरकारने देशभरात मोठी मोहीम राबवली. यासाठी १३२ एफएम चॅनेल्स, १५ आकाशवाणी एफएम चॅनेल्स, २३ खासगी टीव्ही चॅनेल्स, २ दूरदर्शन चॅनेल्स आणि ९७ वर्तमानपत्रांतून जाहिराती देण्यात आल्या. याशिवाय, जून ते ऑगस्ट दरम्यान मायजीओव्ही पोर्टलवर ट्राय डीएनडी रील चॅलेंज ही स्पर्धा आयोजित केली होती. सोशल मीडियावरील जनजागृती मोहिमेलाही २४.८ दशलक्षाहून अधिक लोकांचा प्रतिसाद मिळाल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
Read About : Microsoft Global Outage – तंत्रज्ञान जगतात खळबळ
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.