मुलीचा पाठलाग करण्याच्या कारणावरून झाली मारहाण, सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Tuljapur college student death तुळजापूर : मुलीचा पाठलाग करून त्रास देत असल्याच्या कारणावरून निर्माण झालेल्या वादातून एका १८ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याला बेदम मारहाण करण्यात आल्याने यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना तुळजापूर येथे घडली आहे. ही घटना मंगळवारी (दि.३) सायंकाळी ते बुधवारी पहाटे २ वाजेदरम्यान घडली आहे. यामध्ये समीर जब्बार पटेल (वय १८, रा. वेताळनगर, तुळजापूर) याचा मृत्यू झाला असून या घटनेत अरबाज अफसर सय्यद हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.
याप्रकरणी मयत समीर पटेलची आई अन्सर जब्बार पटेल यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, समीर हा तुळजाभवानी महाविद्यालयात बी.कॉम प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. सुमारे तीन महिन्यांपूर्वी एका मुलीचा पाठलाग करून तिला त्रास देत असल्याच्या कारणावरून समीर व त्याच्या आई-वडिलांना घरी बोलावून समज देण्यात आली होती. दरम्यान, ३ नोव्हेंबर रोजी समीर बी.कॉम प्रथम वर्षाच्या परीक्षेसाठी महाविद्यालयात गेला होता. परीक्षा देऊन घरी परतल्यानंतर रात्री तो काकांना आणण्यासाठी घाटशिळ पार्किंग परिसरात गेला. यावेळी जुन्या वादातून त्याला मारहाण करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. यानंतर समीरला धमकावत काही जणांनी बाहेर नेले. यावेळी त्याचा मोबाईल हिसकावून घेण्यात आला. तसेच समीरच्या आई-वडिलांना घरातच थांबवून बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली.
आईचाही मोबाईल काढून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. रात्री उशिरा समीरच्या नातेवाइकांनी त्याचा शोध सुरू केला. यावेळी अरबाज अफसर सय्यद हा घरी आढळून आला. त्याच्या पाठीवर, पोटावर, मांड्यांवर, पायांवर आणि गालावर काठी, पट्टा तसेच अन्य हत्याराने मारहाण केल्याच्या गंभीर जखमा होत्या. त्याने मस्के, प्रणव देवकते व त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तींनी मारहाण केल्याचे सांगितले. तसेच समीरलाही मारहाण करून भारतीबुवा मठाशेजारील पार्किंग परिसरात टाकल्याची माहिती दिली.
शरीरावर ठिकठिकाणी मारहाणीच्या खुणा
नातेवाइकांनी भारतीबुवा मठाशेजारील पार्किंग परिसरात शोध घेतला असता समीर एका वॉचमनच्या लहान खोलीजवळ आडोशाला पडलेला आढळून आला. त्याच्या शरीरावर ठिकठिकाणी मारहाणीच्या खुणा होत्या. त्याला तातडीने टेम्पोतून तुळजापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
तुळजापूर शहरात मोठी खळबळ
या घटनेप्रकरणी ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ ते ४ नोव्हेंबर पहाटे १.३० वाजेपर्यंतच्या कालावधीत समीर व अरबाज यांना मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. त्यानुसार संतोष कदम, संजय जाधव, प्रणव देवकते, मस्के व अन्य तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेमुळे तुळजापूर शहरात मोठी खळबळ उडाली असून, प्रकरणाचा पुढील तपास तुळजापूर पोलीस करीत आहेत.
महत्त्वाचे मुद्दे
Read About : ST Employees Diwali Bonus – दिवाळी तोंडावर, एसटीच्या 88 हजार कर्मचाऱ्यांचे वेतन-बोनस रखडले!
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.