टॅलिन : एस्टोनियाच्या नव्या राष्ट्राध्यक्षपदी Ulle Madise यांची निवड झाली आहे. देशाच्या संसदेत (Riigikogu) झालेल्या गुप्त मतदानात मॅडिसे यांना 71 खासदारांनी समर्थन दिले, तर सात खासदारांनी त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला नाही. त्यांचा राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाळ पाच वर्षांचा असेल. या निवडणुकीत Ulle Madise या एकमेव उमेदवार होत्या. एस्टोनियाचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष Alar Karis यांनी वैयक्तिक कारणांमुळे दुसऱ्या कार्यकाळासाठी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. एस्टोनियामध्ये राष्ट्राध्यक्षांची निवड संसदेकडून गुप्त मतदानाद्वारे केली जाते. राष्ट्राध्यक्षपदासाठी उमेदवार एस्टोनियाचा जन्मतः नागरिक आणि किमान 40 वर्षांचा असणे आवश्यक आहे. निवडून येण्यासाठी संसदेत दोन-तृतीयांश म्हणजे किमान 68 मतांची आवश्यकता असते.
कायदा क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव
51 वर्षीय Ulle Madise या कायदेतज्ज्ञ असून त्यांनी कायद्यात डॉक्टरेट मिळवली आहे. त्यांनी न्याय मंत्रालय आणि संसद समितीत काम केले असून, राष्ट्राध्यक्षांच्या कायदेशीर सल्लागार म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. 2015 पासून त्या Chancellor of Justice या स्वतंत्र घटनात्मक पदावर कार्यरत आहेत. या पदावरून त्या विधिमंडळ आणि कार्यकारी शाखेच्या कायदेशीरतेवर देखरेख करतात.
दरम्यान, Conservative People’s Party of Estonia च्या प्रतिनिधींनी त्यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीच्या पात्रतेवर आक्षेप घेतला होता. Chancellor of Justice हे पद सांभाळत असताना राष्ट्राध्यक्षपदासाठी उमेदवारी करणे हे सत्ताविभाजनाच्या तत्त्वाशी विसंगत असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, एस्टोनियाच्या सर्वोच्च न्यायालयाने हा आक्षेप फेटाळला. माजी राष्ट्राध्यक्ष Alar Karis यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे Ulle Madise यांचे राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले. लवकरच राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविणार असल्याचेही Karis यांनी म्हटले आहे.
