चंद्राच्या ध्रुवीय विवरांमध्ये सुमारे १ अब्ज टन पाण्याचा अंदाज, लाखोंच्या वसाहतींसाठी पुनर्वापराचे अत्याधुनिक तंत्रज्ञान आवश्यक
वॉशिंग्टन : Moon Colony Research चंद्रावर मोठ्या वसाहती आणि शहरे वसवण्याची माणसाची महत्त्वाकांक्षा सध्या तरी प्रत्यक्षात उतरणे कठीण आहे. चंद्रावर पुरेसा सूर्यप्रकाश आणि ऊर्जा असली, तरी तेथील पाण्याचे साठे मानवी शहरांसाठी अत्यंत अपुरे आहेत. त्यामुळे चंद्रावर वस्ती करणे तूर्त तरी मानवी आवाक्याबाहेर आहे, असे नुकत्याच झालेल्या एका महत्त्वपूर्ण संशोधनातून समोर आले आहे.
‘फ्रंटियर्स इन स्पेस टेक्नॉलॉजीज’ या वैज्ञानिक नियतकालिकात मार्टिन एल्विस आणि जोनाथन सी. मॅकडॉवेल या खगोलशास्त्रज्ञांचा शोधनिबंध नुकताच (१४ सप्टेंबर २०२६ रोजी) प्रसिद्ध झाला आहे. या संशोधनानुसार, चंद्राच्या ध्रुवीय भागातील कायम अंधारात असणाऱ्या विवरांमध्ये सुमारे १ अब्ज टन पाणी बर्फाच्या रूपात असल्याचा अंदाज आहे. ऐकायला हा साठा मोठा वाटत असला, तरी १० लाख लोकसंख्येचे शहर वसवल्यास तो अत्यंत वेगाने संपेल.
या अभ्यासात नमूद केले आहे की, उंच सोलर पॅनेल आणि अणुभट्ट्या वापरून चंद्रावर विजेची मोठी गरज सहज भागवता येऊ शकते. मात्र, पाण्याचा प्रश्न सोडवणे खूप कठीण आहे. जोपर्यंत आपण पाण्याचा पुनर्वापर ९९.७५% पेक्षा जास्त करत नाही किंवा चंद्राच्या खोल जमिनीत पाण्याचे मोठे साठे सापडत नाहीत, तोपर्यंत इलॉन मस्क किंवा जेफ बेझोस यांनी पाहिलेले ‘चंद्रावरील शहरांचे’ स्वप्न पूर्ण होणे शक्य नाही.
छोटी संशोधन केंद्रे शक्य
सध्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाण्याचा ९८% पुनर्वापर केला जातो. हेच प्रगत तंत्रज्ञान चंद्रावरील शहरात वापरले, तरीही हे १ अब्ज टन पाणी अवघ्या १०० वर्षांत पूर्णपणे संपून जाईल. जर पाण्याचा पुनर्वापर केलाच नाही, तर हे पाणी काही वर्षांतच नष्ट होईल. सध्याच्या परिस्थितीत चंद्रावर काही हजारांची लोकसंख्या असलेली छोटी संशोधन केंद्रे उभारणे शक्य आहे, पण लाखोंची शहरे वसवणे हे सध्याच्या विज्ञानाच्या मयार्देपलीकडचे आव्हान आहे.
Read About : ISRO: इस्रो आणि संरक्षण क्षेत्र अबाधित ठेवा
E-Paper: Punyanagari E-Paper

You need an account to post comments.