Sambhajinagar Pani Puri Vendor Attack छत्रपती संभाजीनगर : १४० रुपयांची पाणीपुरी खाऊन ‘फेक ऑनलाइन पेमेंट’ करणाऱ्या चौघांनी पैसे मागितल्याच्या रागातून पाणीपुरी विक्रेत्यावर थेट चाकूहल्ला केला. आम्ही फुकट खाणारे दिसलो का? म्हणत विक्रेत्याचा गळा आणि कानावर वार करण्यात आले. यात पाणीपुरी विक्रेता अक्षरश: रक्तबंबाळ झाला. अन्य व्यावसायिकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. १२ ऑक्टोबरला रात्री साडेनऊ वाजता सेंट्रल नाका येथील स्मशानभूमीसमोर हा राडा झाला. या प्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जितेंद्र जयराम कुशवाह (वय २७, रा. अल्तमश कॉलनी) असे गंभीर जखमी झालेल्या पाणीपुरी विक्रेत्याचे नाव आहे. जितेंद्र हा सेंट्रल नाका येथील स्मशानभूमीच्या बाजूला पाणीपुरीची हातगाडी लावून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. सोमवारी रात्री ९ ते ९.३० वाजेच्या सुमारास दुचाकीवरून चौघे तेथे आले. सर्वांनी मिळून १४० रुपयांची पाणीपुरी खाल्ली आणि ऑनलाइन पेमेंट केल्याचा बहाणा केला. मात्र, पैसे जमा झाल्याचा मेसेज न आल्याने जितेंद्रने त्यांना पैसे आले नसल्याचे सांगितले. त्याचा राग आल्याने आरोपींनी जितेंद्रला शिवीगाळ सुरु केली. बघता-बघता त्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाणही केली. जितेंद्र स्वत:चा बचाव करत असतानाच, एका हल्लेखोराने जिवे मारण्याच्या उद्देशाने चाकू काढून त्याच्या गळ्यावर आणि कानाजवळ वार केले.
तो रक्तबंबाळ होताच चौघेही हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. शेजारीच कपड्याची हातगाडी लावणारे शेख रियाजोद्दीन यांनी तातडीने धाव घेत जखमी जितेंद्रला एमजीएम रुग्णालयात दाखल केले. जिन्सी पोलिसांनी रुग्णालयात जाऊन जितेंद्रचा जबाब नोंदविला. त्यावरून जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
परप्रांतीय आरोपी हल्ला करून गायब
परप्रांतीय पाणीपुरी विक्रेता जितेंद्र कुशवाह याच्यावर हल्ला करणाऱ्यांचा शोध जिन्सी ठाण्याचे निरीक्षक गणेश ताठे, सहायक पोलीस निरीक्षक सर्जेराव सानप, उपनिरीक्षक मुकुंद मुंडे यांच्या पथकाने घेतला. त्यातून चारपैकी दोघांची नावे निष्पन्न करण्यात आली आहेत. त्यात आरोपीदेखील परप्रांतीय असल्याचे समोर आले असून ते गायब असल्याचे स्पष्ट झाले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक मुकुंद मुंडे करीत आहेत.
महत्त्वाचे मुद्दे
Read About: Rajkummar Rao Shahid – 13 वर्षांनंतर राजकुमार रावचा ‘शाहिद’ अखेर प्राइम व्हिडिओवर
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.