गुजरातच्या टेक्नोफेस्ट ग्लोबलचा दावा; अन्नधान्य आणि साखरेऐवजी मानवी केसांपासून बायो-इथेनॉल निर्मितीचे पेटंटप्राप्त तंत्रज्ञान विकसित.
गुजरात : Human Hair Bioethanol सौंदर्य म्हटले की, त्यात डोक्यावरील सुंदर केसांचा वाटा महत्त्वाचा असतोच. ते सौंदर्याला एक वेगळे परिमाण देण्याचे काम करतात. याशिवाय त्यांचे महत्त्व म्हणजे गळालेल्या केसांपासून गंगावणे, विग बनवण्याचा उद्योगही जोरदार चालतो. एकूणच केस किती महत्त्वाची भूमिका बजावतात हे स्पष्ट होते. आता तर केसांपासून चक्क आपली वाहनेही चालू शकतील अशी शक्यता निर्माण झाली आहे.
अन्नधान्य, साखर आणि कृषी कचऱ्याचा वापर न करता थेट मानवी केसांपासून बायो-इथेनॉल तयार करण्याचे स्वदेशी व पेटंटप्राप्त तंत्रज्ञान गुजरातमधील ‘टेकोफेस्ट ग्लोबल’ या भारतीय स्टार्टअपने विकसित केले आहे. बायो-इथेनॉल निर्मितीतील या नव्या टप्प्याला ‘५जी बायो-इथेनॉल’ म्हटले जात आहे.
या तंत्रज्ञानामुळे इंधननिर्मितीसाठी होणारा अन्नधान्य व साखरेचा वापर टळणार असून, इंधन की अन्न? हा जगभरातील वाद कमी होण्यास मदत होईल. चाचण्यांनंतर हे इथेनॉल सध्या वापरल्या जाणाऱ्या पेट्रोलच्या मिश्रणात (इ-२०, इ-२७) वापरले जाऊ शकते.
अभिनव तंत्रज्ञान आणि वैशिष्ट्ये
Human Hair Bioethanol टेकोफेस्ट ग्लोबलचे संस्थापक आणि सीईओ डॉ. रवी यांच्या नेतृत्वाखाली कचऱ्याचे पुनर्नवीनीकरण करून त्यापासून मौल्यवान उत्पादने तयार करण्यावर भर दिला जात आहे. चेन्नईच्या ‘बायोमेकर्स’ कंपनीचे डॉ. नवनीत आणि डॉ. काबिलन यांच्या बायोकेमिकल तंत्रज्ञानाच्या मदतीने हे संशोधन शक्य झाले आहे.
तीन महत्त्वाचे तंत्रज्ञान
कंपनीने १०० लिटर क्षमतेच्या प्रायोगिक प्रकल्पात तीन महत्त्वाचे तंत्रज्ञान विकसित केले आहेत. मानवी केसांपासून ५जी इथेनॉल निर्मिती, वापरलेल्या खाद्यतेलापासून (यूसीओ) इथेनॉल निर्मिती, वापरलेल्या सॅनिटरी नॅपकिन्सपासून समृद्ध बायो-मिथेनॉल निर्मिती, यांचा त्यात समावेश होतो.
२जी इथेनॉलपेक्षा कसे वेगळे आणि फायदेशीर?
सध्याचे २जी इथेनॉल तंत्रज्ञान अत्यंत खर्चिक असून त्यासाठी मोठा भांडवली आणि प्रक्रिया खर्च लागतो. टेकोफेस्ट ग्लोबलच्या ‘५ जी सेफ’ या पेटंट तंत्रज्ञानामुळे अन्नधान्य किंवा जनावरांच्या चाऱ्याची गरज भासत नाही, कमी खर्चात ‘सिंगल-स्टेज’ प्रक्रियेद्वारे इथेनॉल तयार होते. यामध्ये ८५% ते ९०% पर्यंत बायो-कॅटॅलिस्ट पुन्हा मिळवता येतात. बायो-मिथेन निर्मितीची प्रक्रिया जलद होते.
स्वावलंबी भारताच्या दिशेने पाऊल
इस्रो आणि डीआरडीईमधील माजी वरिष्ठ शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन सुरू आहे. कंपनीच्या सह-संस्थापक भूमिका आणि रोनक यांच्या माहितीनुसार, या तंत्रज्ञानाच्या व्यावसायिक उत्पादन आणि जागतिक बाजारातील प्रवेशाच्या चाचण्या सध्या अंतिम टप्प्यात आहेत. स्वावलंबी आणि विकसित भारत २०४७ च्या स्वप्नाला बळ देणारा हा एक क्रांतिकारी उपक्रम ठरेल.
Read About : DNA Typewriter Technology : एका पेशीतून संपूर्ण शरीर कसे तयार होते? शास्त्रज्ञांनी उलगडले रहस्य
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.