Naza Documentary : नॅझा ही डॉक्युमेंटरी गाजते आहे, इस्रायलमध्ये या माहितीपटानं धमाल उडवलीय. युवाल अब्राहम आणि रेचल सोर या इस्रायली तरुणांनी हा माहितीपट केलाय. या पटाला व्हेनिस महोत्सवात ज्युरींचं विशेष पारितोषिक मिळालं, प्रेक्षकांनी वीस मिनिटं टाळ्यांंचा कडकडाट केला. तेल अविवमध्ये चित्रपटाच्या दिग्दर्शकांच्या घरासमोर निदर्शनं झाली. नेतान्याहू या मुलांचं नागरिकत्व काढून घेणार म्हणतातेत. कोण म्हणतात मुलांना फाशी द्या, कोण म्हणतात जन्मठेप द्या; असं काय आहे त्या माहितीपटात?
इस्रायलनं गाझात माणसं कशी मारली याची माहिती या माहितीपटात आहे. इस्रायलच्या लष्करातल्या २४ अधिकाऱ्यांच्या मुलाखती पटात आहेत. तेल अविवमध्ये एका घराच्या गच्चीवर या मुलाखती घेतल्या आहेत. मुलाखत देणाऱ्यांचे चेहरे लपवले आहेत, त्यांचा आवाज बदलण्यात आला आहे. मुलाखत देणारा अधिकारी सर्वस्वी गुप्त राहतो. मुलाखत पाहताना चारही बाजूला रात्रीचं लकलकतं शहर दिसतं. मुलाखत स्टुडिओत झालेली नाही, आसपास माणसांचा वावर आहे, वास्तवाच्या नेपथ्यावर मुलाखत झालीय हे कळतं, एक सूक्ष्म थरार त्यात लपलेला असतो.
नॅझा हा शब्द दोन हिब्रू शब्दांची संक्षिप्त रूपं एकत्र करून तयार केलेला आहे. इस्रायलच्या लष्करात हा शब्द वापरला जातो. त्याचा अर्थ कोलॅटरल डॅमेज. निरपराध माणसं मारली जाणं. हमासचा कार्यकर्ता, नेता हेरलेला असतो. तो आपल्या कुटुंबासमवेत असतो. ऑफिसात असतो, कॅफेमध्ये असतो, हॉस्पिटलात असतो. किती तरी माणसं सभोवताली असतात. बॉम्ब किंवा तोफेचा गोळा हमासवर आदळतो तेव्हा आसपासची माणसंही मरतात. त्यांचा युद्धाशी, हमासशी संबंध नसतो. हमास कार्यकर्ता मारायचा म्हटलं की हे ‘सोबत मृत्यू’ अटळ असतात. आसपासच्या माणसांना वाचवायचं असेल तर हमासच्या कार्यकर्त्याला मारता येत नाही असा लष्कराचा पेच.
निष्पाप माणसं मरू नयेत, कमीत कमी मरावेत असा प्रयत्न अपेक्षित असतो. (हिरोशिमात किती निष्पाप मारले?) इस्रायलनं ठरवलंय की एका हमासीमागे २० निष्पाप मारायला हरकत नाही. ही माहिती एक अधिकारी देत होता. मुलाखतकारानं त्याला थांबवलं; विचारलं, ‘एका सामान्य हमासीला मारण्यासाठी २० निष्पाप नागरिक मारायचे म्हणता, जर हजारो हमासी कार्यकर्ते असतील तर?’ कारण इस्रायली सैन्यानं केलेल्या अभ्यासानुसार हमासच्या कार्यकर्त्यांची संख्या सात हजार होती. अधिकाऱ्यानं उत्तर दिलं, ‘तर पूर्ण गाझा मारून टाकायचं.’ गाझात एक लाखापेक्षा जास्त माणसं कशी मेली या प्रश्नाचं उत्तर वरील अधिकाऱ्याच्या उत्तरात मिळतं. इस्रायली लष्कर आणि सरकारची लाजच व्हेनिस चित्रपट महोत्सवात गेली, साऱ्या जगाला सारा मामला कळला. माणसं किती निष्ठूर, क्रूर होऊ शकतात ते या माहितीपटातून जगाच्या लक्षात आलं.
इस्रायल सॅटेलाईटचा वापर करतं. माणसं, इमारती अचूक हेरतं. माणसांच्या हालचाली नोंदतं, माणसांचे चेहरेही सॅटेलाईट नोंदवतं. लोकांचे टेलिफोन, सेलफोन, कॉम्प्युटर, लॅपटॉप इत्यादी टॅप केले जातात. संभाषणं आणि ईमेल, व्हॉट्सॲपवरचे मेसेजेस हॅक केले जातात. या साठी पेगॅसस हे अमोध तंत्रज्ञान वापरलं जातं. इमारतींची माहिती ‘गॉस्पेल’ हा प्रोग्राम वापरतं. माणसांची माहिती ‘लवेंडर’ वापरतो. हमासचा तळातला, मध्यम पातळीवरचा, पहिल्या थरातला आणि मुख्य म्होरक्या नेमका ठरतो. गॉस्पेल आणि लवेंडरवरची माहिती एका कार्यक्रमात टाकली जाते. अल्गोरिदम दिला जातो. झालं काम. एक कमांड द्यायची, एकच बटण दाबायचं. बॉम्ब, गोळी, तोफेचा गोळा लक्ष्याच्या दिशेनं झेपावतो. वैमानिक, तोफेचा चालक, रणगाडा चालकानं विचार करण्याचा प्रश्नच येत नाही.
एक इमारत उडवून झाली की रणगाडा विचारायचा आता काय करू, कोणाला उडवू. हा प्रश्न अधिकाऱ्याकडं नव्हे कॉम्प्युटरकडं पोचत असे. उत्तर तयार. निघाला रणगाडा नव्या इमारतीकडं.
खरं म्हणजे माहितीपटात जे सांगितलंय ते नवं नाही. इस्रायलमधले पेपर आणि अमेरिकेतले पेपर यामध्ये ही माहिती अनेक वेळा प्रसिद्ध झाली आहे. माणसं मारण्यासाठी लष्कराच्या कोणत्या युनिटनं वरील संहारक कार्यक्रम सिद्ध केला आहे, त्याची नावानिशी माहिती न्यूयॉर्क टाईम्स आणि वॉशिंग्टन पोस्टनं प्रसिद्ध केली आहे. इस्रायलवर युद्ध गुन्हेगारीचा आरोप आंतरराष्ट्रीय न्यायालयानं ठेवला. जे पुरावे हाताशी लागले त्या नुसार इस्रायल सरकारला आणि नेतान्याहू यांना युद्ध गुन्हेगार ठरवण्यात आलं. इस्रायल सरकारनं आंतरराष्ट्रीय कोर्टच आपण मानत नाही असं जाहीर करून टाकलं. ट्रम्प यांनी तर सिक्सरच ठोकली. त्यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशांनाच क्रिमिनल ठरवलं आणि त्यांना अमेरिकेत यायची बंदी घातली. अमेरिकेत आलात तर अटक होईल, तुरुंगात जावं लागेल असं ट्रम्पनी जाहीर केलं.
नॅझा माहितीपटाला एवढी पार्श्वभूमी आहे. युवाल अब्राहम आणि रेचल सोर यांनी इस्रायल सरकारला उघडं पाडलं, इस्रायली सैन्याला उघडं पाडलं. सरकारला उघडं पाडणं हा गुन्हा आहे का? खरं म्हणजे हे प्रश्न इस्रायलच्या लोकसभेत विरोधी पक्षानं उपस्थित करायला हवेत. गाझा युद्ध हे इस्रायलच्या सुखासाठी नसून नेतान्याहूंची सत्तेत राहण्याची धडपड आहे हे इस्रायलला समजलं आहे. परंतु, ७ ऑक्टोबर २०२३ ला हमासनं इस्रायलवर केलेला हल्लाही अमानुष असल्यानं हमासच्या विरोधात काहीही केलं तरी चालेल असा समज नेतान्याहंूनी पसरवला आहे, त्यामुळेच विरोधी पक्षही गप्प राहतात. विरोधी पक्षांनी आणि जागरूक मतदारांनी जे करायला हवं ते तरुणांनी करून दाखवलंय. अमेरिकेनं व्हिएतनाममध्ये केलेले अनन्वित अत्याचार माध्यमांनी उघड केले तेव्हा त्यांच्यावर अमेरिकेत देशद्रोहाचा आरोप झाला होता. युवाल आणि सोर यांनी या आधी ‘नो अदर लँड’ नावाचा माहितीपट केला आहे. त्यात इस्रायलनं वेस्ट बँकमध्ये चालवलेली अमानुष दादागिरी चित्रीत केली आहे. नो अदर लँड या माहिती पटाला ऑस्कर मिळालं होतं.
नेतान्याहू खवळणं स्वाभाविक आहे.
निळू दामले
damlenilkanth@gmail.com
Read About : Financial Freedom : आर्थिक स्वातंत्र्याची वाटचाल
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.