Ad Advertisement Ad Advertisement

Gorakhpur Rabies Scare : गोरखपूरमध्ये गायीच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ; दूध आणि चहा प्यायलेल्या 500 जणांना रेबीजची लस

स्थानिक आरोग्य केंद्रात ५०० गावकऱ्यांना अँटी-रेबीज लसीचा पहिला डोस, लसीचा दुसरा डोस एका आठवड्यानंतर दिला जाणार

गोरखपूर (उत्तर प्रदेश): Gorakhpur Rabies Scare गोरखपूर जिल्ह्यातील दादी गोविंदपूर गावात रेबीजच्या संशयास्पद लक्षणामुळे गायीचा मृत्यू झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. या गायीचे दूध प्यायलेल्या आणि त्यापासून बनवलेले पदार्थ खाल्लेल्या सुमारे ५०० लोकांना सावधगिरीचा उपाय म्हणून प्रशासनाने अँटी-रेबीज लस (प्रतिबंधक लस) टोचली आहे.

स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, ही गाय गेल्या महिनाभरापासून आजारी होती. सुरुवातीला तिच्यावर खाजगी डॉक्टरांकडून उपचार सुरू होते; परंतु १९ ऑक्टोबर रोजी तिची तब्येत जास्त बिघडल्याने सरकारी पशुवैद्याला बोलावण्यात आले. गायीचे विचित्र वर्तन पाहून डॉक्टरांनी तिला रेबीज झाल्याचा संशय व्यक्त केला. एखाद्या पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने चावा घेतल्यामुळे गायीला हा संसर्ग झाला असावा, असा अंदाज वर्तवण्यात आला. त्यानंतर अवघ्या एका दिवसात, म्हणजेच २० ऑक्टोबर रोजी या गायीचा मृत्यू झाला.

गावातील घबराट वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे, नवरात्रीच्या पूजेदरम्यान दादी गोविंदपूर गावात याच गायीच्या दुधापासून पंचामृत (प्रसाद) तयार करण्यात आले होते. धक्कादायक बाब म्हणजे, पंचामृतासाठी वापरलेले हे दूध उकळले गेले नव्हते. याशिवाय, गावात भरलेल्या जत्रेमध्ये एका स्टॉलवर याच दुधाचा वापर करून चहा विकला गेला होता. हा चहा आणि प्रसाद गावातील तसेच परिसरातील सिधारी, गंगवाल आणि ररवापार या शेजारच्या गावातील अनेक नागरिकांनी प्राशन केला होता.

संशय समोर येताच लोकांमध्ये भीतीचे वातावरण

गायीला रेबीज असल्याचा संशय समोर येताच लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. यावर तातडीने उपाययोजना करत आरोग्य विभागाने गावातच विशेष लसीकरण शिबिर आयोजित केले. या शिबिरात आणि स्थानिक आरोग्य केंद्रात मिळून एकूण ५०० गावकऱ्यांना अँटी-रेबीज लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. लसीचा दुसरा डोस एका आठवड्यानंतर दिला जाणार आहे.

वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, रेबीज हा विषाणू बाधित प्राण्याच्या लाळेतून (चावल्यामुळे किंवा जखमेवर लाळ लागल्याने) पसरतो, दूध प्यायल्याने रेबीज होण्याचा थेट धोका नसतो. तसेच दूध नीट उकळल्यास हे विषाणू नष्ट होतात. तरीही, सुरक्षेचा उपाय म्हणून संशयास्पद प्राण्यांचे कच्चे दूध किंवा मांस खाणे टाळले पाहिजे, असे आवाहन आरोग्य अधिकाऱ्यांनी केले आहे.

Read About : Social Media Ban for Children : मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी नको? तज्ज्ञांनी सुचवले पर्याय

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.