जर्मनीतील संशोधकांचे महत्त्वपूर्ण यश; नेपच्यून आणि युरेनससारख्या ग्रहांच्या अंतर्गत परिस्थितीची प्रयोगशाळेत निर्मिती करून प्लास्टिकपासून ३ नॅनोमीटर आकाराचे तयार केले हिरे
ड्रेस्डेन (जर्मनी) : Nanodiamonds from Plastic शास्त्रज्ञांनी शक्तिशाली लेझर किरणांचा वापर करून अंतराळातील इतर ग्रहांसारखी अत्यंत कठीण परिस्थिती प्रयोगशाळेत निर्माण केली आहे. या प्रयोगाद्वारे त्यांनी सामान्य प्लास्टिकचे रूपांतर अब्जावधी सूक्ष्म हिऱ्यांमध्ये करण्यात यश मिळवले आहे. हेल्महोल्ट्झ-झेनट्रम ड्रेस्डेन-रॉसेंडॉर्फ आणि युनिव्हर्सिटी ऑफ रोस्टॉक च्या संशोधकांनी हे हिरे सुरक्षितपणे गोळा केले आहेत.
ग्रह-ताऱ्यांमधील वातावरणाचा सराव
नेपच्यून आणि युरेनस या ग्रहांच्या अंतर्गत भागात हजारो अंश सेल्सिअस तापमान आणि पृथ्वीपेक्षा लाखो पट जास्त दाब असतो. या ग्रहांवर प्लास्टिक घटकांमधून हिऱ्यांचा पाऊस पडतो, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. हाच निकष वापरून संशोधकांनी जेव्हा प्लास्टिकच्या पातळ फिल्मवर हाय-पावर लेझरचा मारा केला, तेव्हा अतिशय वेगाने नॅनो-हिरे तयार झाले.
उल्कापातासारखा वेग आणि सॉफ्ट लँडिंग
लेझरचा मारा केल्यावर हे सूक्ष्म हिरे प्रतिसेकंद १० किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने (ताशी २२,००० मैल) म्हणजेच एखाद्या उल्केसारखे बाहेर फेकले जातात. एवढ्या प्रचंड वेगाने आदळल्यामुळे हिरे नष्ट होऊ नयेत, म्हणून शास्त्रज्ञांनी व्हॅक्यूममध्ये काम करणारे एक विशेष मऊ आयोनिक जेल वापरले. या जेलमुळे हिरे सुरक्षित राहिले. ते नंतर वेगळे करून शुद्ध करण्यात आले.
अणूंच्या आकाराचे हिरे
इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपखाली तपासणी केली असता, या नॅनो-हिऱ्यांचा आकार अवघा ३ नॅनोमीटर (मीटरचा अब्जावा भाग) असून प्रत्येक हिऱ्यामध्ये साधारण ३,००० कार्बनचे अणू आहेत असे आढळले. पारंपारिक स्फोटक पद्धतींपेक्षा लेझर तंत्रज्ञानाने बनवलेले हे हिरे अत्यंत शुद्ध आणि एकाच आकाराचे आहेत.
वैद्यकीय क्षेत्रात मोठा फायदा
हे सूक्ष्म हिरे अत्यंत कडक आणि उष्णतारोधक आहेत. प्लास्टिकपासून हिरे बनवताना त्यात इतर घटक मिसळणे सोपे जाते. या वैशिष्ट्यामुळे भविष्यात वैद्यकीय क्षेत्रातील एमआरआय स्कॅनिंग आणि अंतर्गत शारीरिक तपासणीसाठी कॉन्ट्रास्ट एजंट म्हणून तसेच अचूक क्वांटम सेन्सर्स बनवण्यासाठी यांचा मोठा वापर होऊ शकतो. याशिवाय सौर ऊर्जेच्या मदतीने कार्बन डायऑक्साइड चे विघटन करण्याच्या प्रक्रियेतही हे हिरे उत्प्रेरक म्हणून गती वाढवू शकतात. पुढील टप्प्यात शास्त्रज्ञ या लेझर दाबाचा वापर करून निसर्गात न आढळणारा बीसी-८ नावाच्या हिऱ्यापेक्षाही दाट आणि कठीण कार्बनचा प्रकार तयार करण्याचा प्रयत्न करणार आहेत.
Read About : AI Impact on Indian Students- एआयमुळे गती वाढली मात्र सखोल ज्ञानाचा अभाव!
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.