२५ पैशांत दिवस; ८ किलोमीटर पायपीट, झेब्रा क्रॉसिंग रंगवण्यापासून गृहपाठ करून देण्यापर्यंत केली विविध कामे
मुंबई : Nana Patekar Struggle Story ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या आयुष्यातील संघर्षाची कहाणी पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. कौन बनेगा करोडपती (केबीसी) या लोकप्रिय कार्यक्रमातील त्यांचा एक जुना व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नाना पाटेकरांनी अत्यंत कठीण आर्थिक परिस्थितीत दिवस कसे काढले, याबद्दल मनमोकळेपणाने सांगितले होते.
नाना पाटेकरांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्टसमधून कमर्शिअल आर्टचे शिक्षण घेतले. त्यानंतर जाहिरात कंपनीत नोकरी केली. मात्र नोकरी आणि नाटक यापैकी एकाची निवड करण्याची वेळ आल्यानंतर त्यांनी नोकरी सोडून रंगभूमीला प्राधान्य दिले.
त्या काळात आर्थिक अडचणी होत्या. जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे तत्कालीन डीन हनुमंते यांनी काही सरकारी कामे मिळवून दिली. त्यातून त्यांना पैसे मिळत. झेब्रा क्रॉसिंग रंगवण्याच्या कामासाठी १५ रुपये मिळायचे. मिळेल ते काम करण्याची तयारी होती; मात्र कोणापुढे हात पसरला नाही, असे त्यांनी सांगितले.
चार आणे पॉकेटमनी अन् वर्तमानपत्रातील चपाती!
नाना पाटेकरांनी आपल्या त्या दिवसांचे वर्णन करताना सांगितले की, त्यांचा पॉकेटमनी केवळ चार आणे होता. ते चपाती वर्तमानपत्रात गुंडाळून घेऊन जायचे. १५ पैशांत उसळ मिळायची, तर ५ किंवा १० पैशांत दोन केळी मिळायची. अशा प्रकारे २५ पैशांत दिवसाचा उदरनिर्वाह होत असे.
काही मुलांना गृहपाठ करून दिल्याच्या बदल्यात भजी किंवा कॉफी मिळायची. चित्रपट पाहण्याची इच्छा असलेल्या मुलींचा होमवर्क करून त्याबदल्यात खाणे मिळत असल्याची आठवणही त्यांनी सांगितली.
वडिलांचा व्यवसाय बंद पडला अन् संघर्ष सुरू झाला
नाना नववीत असतानाच त्यांच्या वडिलांचा व्यवसाय बंद पडला. त्यामुळे शिक्षणासोबतच काम करण्याची वेळ आली. शाळा सुटल्यानंतर ते दररोज ८ किलोमीटर चालत कामाच्या ठिकाणी जायचे आणि पुन्हा ८ किलोमीटर पायी परतायचे.
सिनेमाचे पोस्टर्स रंगवण्याच्या कामातून त्यांना महिन्याला ३५ रुपये आणि एकवेळचे जेवण मिळायचे. मात्र जेवताना घरच्यांनी जेवले असेल का, याची चिंता मनात असायची. नाना पाटेकरांच्या या आठवणी केबीसीच्या व्हिडीओला पुन्हा चर्चेत आणत असून, संघर्षातून उभे राहण्याची त्यांची जिद्द नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
Read About : Kareena Kapoor King Movie – ‘किंग’ मध्ये करीना कपूरची खास एन्ट्री
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.