Ad Advertisement Ad Advertisement

Nashik Conch Shell Blowing World Record – कुंभनगरीत सिंहस्थाचा विश्वविक्रमी शंखनाद!

भारताने अमेरिकेचा विक्रम मोडत घडविला इतिहास

Nashik conch shell blowing world record : नाशिक : गोदावरीच्या पवित्र तीरावर घुमणारा शंखनाद, चंद्रप्रकाशात न्हाऊन निघणारे नदीचे पात्र आणि आसमंतात दरवळणारा भक्तिभाव… अशा मंगलमय वातावरणात रविवारी (२५) कोजागरी पौर्णिमेच्या पावन पर्वावर नाशिकमध्ये ५१४ शंखांचा निनाद घुमला. आगामी सिंहस्थ कुंभमेळयाच्या धर्मध्वजारोहणाची नांदी ठरणाऱ्या या अनोख्या उपक्रमातून भारतीय संस्कृतीचा प्राचीन वारसा जागविण्यासोबतच सामूहिक शंखनादाचा विश्वविक्रम प्रस्थापित करण्यात आला.

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये अमेरिकेच्या नावावर असलेला ३०३ लोकांनी केलेल्या शंखनादाचाही विक्रम नाशिक कुंभनगरीने मोडीत काढत भारताची मान उंचावली आहे. कोजागरी पौर्णिमेच्या मुहूर्तावर गोदातीरी देवमामलेदार पटांगणाजवळ पार पडलेल्या या विश्वविक्रमी शंखनादाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या निकषांनुसार पडताळणी केली गेली. धार्मिक श्रद्धा, सांस्कृतिक परंपरा आणि विश्वविक्रमाची आकांक्षा यांचा त्रिवेणी संगम या उपक्रमातून अनुभवायला मिळाला.

शंखध्वनीतून मंगलकार्याची नांदी

१. भारतीय संस्कृतीमध्ये शंखाला केवळ वाद्याचे स्थान नाही, तर तो मांगल्य, पावित्र्य, सकारात्मकता आणि विजयाचे प्रतीक मानला जातो. मंदिरातील आरतीपासून धार्मिक अनुष्ठानांपर्यंत आणि विविध शुभकार्यांच्या प्रारंभापासून उत्सवांच्या मंगलक्षणापर्यंत शंखनादाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शंखाचा निनाद म्हणजे जणू वातावरणात चैतन्याची लहर निर्माण करणारा आणि मनाला भक्तिभावाने भारून टाकणारा ध्वनी ठरला.

२. गोदावरीच्या तीरावर एकाच वेळी ५०१ हून अधिक शंखांचा निनाद घुमल्यावर या प्राचीन परंपरेचे सामूहिक सामर्थ्य अनुभवायला मिळाले. शंखांच्या ध्वनिलहरींनी गोदातीर दुमदुमल्याने सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आगमनाची आध्यात्मिक चाहूल यातून मिळाली आहे. नाशिकच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविण्याबरोबरच नव्या पिढीला भारतीय संस्कृतीतील शंखनादाचे महत्त्व समजावून देण्याचाही या उपक्रमामागील उद्देश आहे.

३. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण आणि गुणगौरव न्यास संचालित अनंतविजय शंखनाद पथक यांच्या पुढाकारातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या सामूहिक शंखनादानंतर येत्या ३१ ऑक्टोबरला होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यातही याच समूहातील २५१ शंखवादक ध्वजारोहणाच्या नेमक्या क्षणी शंखनाद करणार आहेत.

Reab About: Karnika Movie 2027 – माँ करणी मातेची गाथा आता रुपेरी पडद्यावर

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.