Ad Advertisement Ad Advertisement

Maharashtra farmers foreign study tour amid drought – दुष्काळ असतानाही कृषी खात्याचा शेतकऱ्यांसाठी परदेश दौरा

४ कोटींचा होणार चुराडा; ९ कृषी अधिकारीही दौऱ्यावर जाणार

Maharashtra farmers foreign study tour amid drought :मुंबई : राज्यातील दुष्काळाच्या वणव्यात शेतकरी होरपळत असताना राज्याच्या कृषी खात्याने शेतकऱ्याच्या परदेश दौऱ्याला प्रशासकीय मान्यता दिली आहे. राज्यातील १८० शेतकऱ्यांना परदेशात जाऊन शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान शिकण्याची संधी देण्यात येणार आहे. त्यांच्यासोबत कृषी खात्याचे ९ अधिकारीही दौऱ्यात सहभागी होणार आहेत. यासाठी ४ कोटी रुपयांच्या निधीलाही प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना विविध प्रगत देशांतील विकसित व आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी तसेच शेतमालाची निर्यात व कृषी बाजारपेठांची मागणी, कृषिमाल प्रक्रिया यासोबत कृषी क्षेत्रात शेतकऱ्याचे ज्ञान उंचावण्यासाठी राज्यातील ‘शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे’ आयोजित करण्यात येतात. यावर्षात असे दौरे आयोजित करण्यासाठी कृषी विभागाने या दौऱ्यांना दोन दिवसांपूर्वीच नुकतीच मान्यता दिली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील ५ याप्रमाणे ३४ जिल्ह्यांतून एकूण १७० शेतकऱ्यांची निवड करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच प्रत्येक २० शेतकऱ्याच्या मागे १ अधिकारी याप्रमाणे ९ अधिकाऱ्यांची निवड करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मात्र, या दौऱ्याची तारीख अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही.

दुष्काळी स्थितीमुळे निधीकपातीची शक्यता

राज्यातील शेतकऱ्यांना प्रगतशेती तंत्राची ओळख करून देण्यासाठी असे दौरे आयोजित केले जातात. इस्रायलमधील शेती तसेच युरोपमधील बाजारपेठांची ओळख करून देण्यासाठी असे दौरे होतात. कृषी विभागाकडून राज्यातील शेतकऱ्यांसाठी देशाबाहेर अभ्यास दौरे करण्याची योजना २००४-२००५ पासून राबवण्यात येत आहे. अमेरिका व इराण युद्धाच्या काळात विदेशी चलनाची बचत करण्यासाठी सरकारने सर्व परदेश दौऱ्यांवर निर्बंध घातले होते.

तेव्हा शेतकऱ्यांसाठी विदेश दौरा नियोजित होता, पण त्या काळात हा दौरा पुढे ढकलण्यात आला, पण हळूहळू सर्व निर्बंध शिथिल होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे आता या दौऱ्याला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. ही फक्त मान्यता आहे. दौरा अंतिम झालेला नाही. ४ कोटी रुपयांच्या खर्चालाही मान्यता दिली असली, तरी सध्याच्या दुष्काळी स्थितीमुळे वित्त खात्यातून या निधीत कपात केली जाण्याची शक्यता कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

बळीराजा संकटात असताना कशाला परदेश दौरा – अंबादास दानवे

राज्यात दुष्काळी स्थिती असताना शेतीच्या अभ्यासासाठी परदेश दौरा करण्यापेक्षा सदर निधी शेतकऱ्यांना दिला, तर अधिक चांगले होईल. शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान आणि नव्या पद्धतींचा अभ्यास करणे आवश्यक आहे. त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन माहिती घेण्यास विरोध करण्याचे कारण नाही. मात्र, राज्यातील शेतकरी दुष्काळाच्या संकटाला सामोरे जात असताना अशा दौऱ्यांवर खर्च करण्याऐवजी तोच निधी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरावा, जेणेकरून शेतकऱ्यांना दुष्काळात आर्थिक आधार मिळेल, असे शिवसेना (ठाकरे) पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.

परदेश दौरे करण्याऐवजी आधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या – विजय वडेट्टीवार

सरकारने परदेश दौऱ्यांच्या प्रसिद्धीपेक्षा शेतकऱ्यांच्या जगण्याला प्राधान्य द्यावे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरीव आर्थिक मदत द्यावी. राज्यात दुष्काळाचे भीषण संकट असताना सरकारला शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू दिसत नाहीत का? शेतकऱ्यांच्या हातात पैसा नाही, पिके संकटात आहेत, कर्जाचा डोंगर वाढत आहे; अशा परिस्थितीत सरकारने सर्वप्रथम शेतकऱ्यांना भरीव मदत करावी. लाखो शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून केवळ परदेशातील शेतीचे अभ्यास दौरे आयोजित करू नयेत, असे काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

 Read About : Maharashtra Drought Crisis – संधी नव्हे, संकटाचे आव्हान!

Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.