Lawrence Bishnoi gang and Indian underworld : पूर्वी एक गाणं नेहमी कानी पडायचं, ‘साबरमती के संत तुने कर दिया कमाल.’ साबरमतीचे संत म्हणजे महात्मा गांधी होते, पण कायम अहिंसेचा पुरस्कार करणाऱ्या महात्मा गांधींचा आश्रम असलेल्या साबरमतीतून अनेक हिंदी चित्रपट कलावंतांना धमक्या येत आहेत. मुंबईत एका हिंदी कलावंताच्या वाहनावर सहा-सात गोळ्या झाडण्यात आल्या. तो बचावला, पण दोघं गोळीबारात जखमी झाले. साबरमती तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिष्णोई या डॉनमार्फत वा त्याच्या नावाने टायगर श्रॉफ या अभिनेत्यावरील गोळीबारामुळे मुंबईच नव्हे, तर संपूर्ण चित्रपटसृष्टी हादरली आहे.
कोण, कुठला लॉरेन्स बिष्णोई सामान्यांना फारसा माहीत नाही. बिष्णोई म्हणजे विष्णुचा भक्त. वैष्णव संप्रदायातील लोक शाकाहारी असतात, त्यांचा अहिंसेवर अजिबात विश्वास नसतो. ते इतरांचं दु:ख समजून त्यांना मदत करतात असं म्हटलं जातं. ‘वैष्णव जन तो तेणे कहिये ये जे पीड पराई जाणे रे’ असं संत नरसी मेहता यांचं भजनही प्रसिद्ध आहे. पण, लॉरेन्स बिष्णोई मात्र इतरांच्या जीवावरच उठला आहे.
टायगर श्रॉफचे अंडरवर्ल्डचे संबंध असल्याचं कधी कोणी ना ऐकलं ना वाचलं, ना तो कोणत्या वादात सापडला. तरीही त्याच्यावर हल्ला झाला. त्यानंतर लगेचच कोणी तरी अनिल पंडित नावाचा लॉरेन्स बिष्णोई गँगचा माणूस तो गोळीबार आमच्या गँगने केल्याचं जाहीर करतो. गोळीबार करणाऱ्यांना दुसऱ्या राज्यात अटक झाली, पण, ज्याची स्कॉटलंड यार्ड पोलिसांशी तुलना केली जाते, त्या मुंबई पोलिसांच्या गुप्तचर विभागाला किंवा गुजरात पोलिसांना असा काही कट रचला जात आहे हे आधी कळू शकत नाही?
ज्या गँगचा म्होरक्या तुरुंगात आहे, त्याच्याकडून काही सूचना जातात का? तसं असेल तर हे शक्य कसं होतं? तो तुरुंगात बसून असे कट रचत असेल, सूचना देत असेल, तर कायदा व सुव्यवस्थेबरोबरच तुरुंग प्रशासनाविषयीही प्रश्न उपस्थित होतात. त्याहून आणखी एक गंभीर बाब म्हणजे मुंबईतील आरे कॉलनीत दोघा हल्लेखोरांनी गोळीबाराचा सराव केला होता ही बातमी; गुप्तचर यंत्रणा कमी पडली असा याचा अर्थ.
या गँगने आधी सलमान खानला अनेकदा धमक्या दिल्या होत्या. सलमान खानने २८ वर्षांपूर्वी राजस्थानात शूटिंगला गेला असताना काळ्या हरणाची म्हणजे काळविटाची शिकार केली होती, त्यामुळे तेथील बिष्णोई समाज दुखावला होता. त्या प्रकरणी सलमान खानला कोर्टाने शिक्षा सुनावली असली तरी त्या विरोधातील त्याच्या अर्जावर सुनावणी सुरू आहे. शिकार प्रकरणामुळे फक्त ३३ वर्षांचा लॉरेन्स बिष्णोई हा सलमान खानच्या विरोधात असावा? त्यावेळी तो फक्त ५ वर्षांचा असणार.
कदाचित ते कारण पुढे करून तो सलमान खान व चित्रपटसृष्टीवर सतत दबाव आणत असावा. त्यामागे खरं कारणं खंडणी हेच असू शकतं. टायगर श्रॉफवर गोळीबाराच्या आधी बिष्णोई गँगने म्हणे अक्षय कुमार, रणबीर कपूर, सलमान खान यांच्या घरावरही पाळत ठेवली होती असं सांगण्यात येतं. याच गँगने कॉमेडी शो करणाऱ्या कपिल शर्मा याच्या परदेशातील रेस्टॉरंटवर दोनदा गोळीबार केला होता. टायगर श्रॉफ, अक्षय कुमार, रणबीर कपूर वा कपिल शर्मा यांचा सलमान खानशी संबंध असलाच तर फक्त बॉलीवूडचा भाग म्हणून.
याचं गँगने २०२४ साली राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईतील नेते बाबा सिद्दीकी यांना गोळ्या घालून ठार मारलं होतं. बाबा सिद्दीकीचे सलमान खानशी संबंध असल्याने त्यांना धडा शिकवला हे कारण दिलं गेलं. कपिल शर्माच्या शोमध्ये सलमानचा पैसा असल्यानं त्याच्या रेस्टॉरंटवर गोळीबार केला. टायगर श्रॉफ व सलमान यांची जवळीक आहे, असाही यांचा आरोप. पण, २९ वर्षीय पंजाबी गायक व रॅपर सिद्धू मुसावाला याचीही बिष्णोई गँगने २०२२ साली हत्या केली होती. त्याचा सलमान खानशी संबंधही नव्हता. त्यावेळी या गँगच्या गोल्डी ब्रारचं नावं समोर आलं होतं. याच गोल्डी ब्रारने कॅनडामध्ये हरदीपसिंग निज्जर या शीख नेत्याची हत्या केली होती.
त्या देशातील मोस्ट वाँटेड १० गुन्हेगारांत हा गोल्डी ब्रार आहे. लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोई हा गेली दोन वर्ष दिल्लीतील तिहार तुरुंगात आहे. म्हणजे या गँगचे दोन मुख्य सूत्रधार तुरुंगात आहेत आणि गोल्डी हा परदेशात लपून आहे. तरीही गँगच्या कारवाया उघडपणे सुरू आहेत. आतापर्यंत मुंबई पोलिसांनी लॉरेन्स व अनमोल बिष्णोई यांचा ताबा मिळवून गँगच्या कारवायांची कट कारस्थानं उघड करणं आणि उधळणं आवश्यक होतं.
आता वा याआधी वेगवेगळ्या गोळीबार किंवा धमक्यांच्या प्रकरणात पकडलेले हे सारे भाड्याचे लोक आहेत. कधी पुणे, मराठवाडा तर कधी राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश, हरयाणातून रोजगार नसलेल्या तरुणांचा वापर ही गँग सतत करत आली आहे. म्होरके तुरुंगात असताना हे प्रकार घडतात याचा अर्थ या गँगला, कारवायांना कोणाचा तरी आशीर्वाद असू शकेल ते उघड व्हायला हवं. अन्यथा बॉलीवूडमध्ये दाऊद इब्राहिमप्रमाणे यांची दहशत वाढेल. दाऊदप्रमाणे या गँगचं नेटवर्क मुंबईत वाढलं तर बॉलीवूड आणि व्यावसायिक, उद्योजक, राजकारणी यांचं जगणं अवघड होऊन बसेल. बिष्णोईचा दाऊद होऊ देता कामा नये. ही जबाबदारी सत्ताधारी आणि पोलीस व प्रशासन यांची आहे. कोट्यवधींची खंडणी उकळण्यासाठी चाललेल्या अंडरवर्ल्डला पुन्हा एकवार संपवायला हवं.
संजीव साबडे
संपर्क : ८८८८८४३३७१
Read About : Hungry Ghost Festival : भुकेल्या भुतांचा उत्सव
E-Paper : Punyanagari E-Paperस्पेशल फीचर


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.