Nana Patekar Tribute : नाना पाटेकर यांची असंख्य रूपं होती. ते उत्तम अभिनेते. उत्तम संघटक होते. शेतीविषयीची तितकीच उत्तम जाण असलेले ते शेतकरी होते. माणसांचा कळवळा, संवेदनशीलता असलेले एक समाजसेवक होते. त्यांना समाजसेवक शब्द कधीच मान्य नव्हता. त्यांची अलीकडेच घेतलेली मी मुलाखत दुर्दैवाने शेवटची ठरेल, अशी सुतराम कल्पना नव्हती. त्या मुलाखतीत अनेक विषयांवर ते मनमोकळेपणाने बोलले. त्यांच्या भूमिकांबद्दल, त्यांच्या तयारीबद्दल, त्यांच्यावर झालेले संस्कार, बालपणाबद्दल. अतिशय खडतर बालपण होते त्यांचे. वडील माळकरी होते. त्यांचा व्यवसाय होता; पण त्यांना काही लोकांनी फसवले, याची त्यांना कायम खंत होती. त्यामुळे ते चांगले बालपण, सगळ्या सुखवस्तू पुरवू शकले नाहीत. पण, नाना वडिलांना सांगायचे, ‘तुमची एक फॅक्टरी जळली असेल पण तुमच्या हातात मी आणि माझा मोठा भाऊ या दोन फॅक्टऱ्या तुमच्याकडे आहेत.’ वयाच्या १३ व्या वर्षांपासून कुटुंबाचे पालनपोषण करत ३५ रुपये पगाराची नोकरी त्यांनी पत्करली. त्यानंतर पडेल ती कामे केली. अगदी साइन बोर्ड रंगवण्यापासून ते झेब्रा क्रॉसिंग रंगवण्यापर्यंत. आयुष्यात ज्या भूमिका परमेश्वराने दिल्या त्या त्यांनी समरसून निभावल्या. चित्रकलेची अतिशय आवड त्यांना होती. चित्र आणि रंग यांची भाषा कळणारा हा वेगळाच कलावंत. साहित्याची त्यांना गोडी होती.
पुण्याजवळ असलेल्या डोंजेच्या घरात अनेकवेळा जाणं व्हायचं. पुस्तकांची अनेक कपाटे भरली होती. मी गमतीने विचारले, अनेकांच्या घरी पुस्तकांची कपाटे शोभेची असतात, तुमच्याही घरी शोभेचीच आहेत का? ते म्हणाले, ‘कपाटतलं कुठलंही पुस्तक काढ. तुला खुणा दिसतील, त्याच्या बाजूला लावलेल्या टाचण्या दिसतील.’ अनेकदा रात्री झोपताना एखादे पुस्तक वाचले की,पहाटे उठून त्यांच्या मनात आदल्या रात्री पुस्तक वाचून काय विचार आले ते लिहायचे. एखाद्या गोष्टीची अभ्यास करण्याची सवय त्यांच्याकडे उपजत होती. त्याचेच रूपांतर एकप्रकारे अभिनयाच्या अभ्यासात झाले, मग सुलभा आणि अरविंद देशपांडे आणि विजया मेहता यांनी कच्च्या हिऱ्याला पैलू पाडले आणि एक लखलखता हिरा महाराष्ट्राच्या अभिनय क्षेत्राला मिळाला. नुसता मिळाला नाही तर तळपलासुद्धा.
मी त्यांचे ‘हमीदाबाईची कोठी’ हे पहिले नाटक पाहिले तेव्हापासून आमची मैत्री झाली. त्यानंतर त्यांची सर्व नाटकं, सर्व चित्रपट आम्ही पाहिले. त्यातल्या अभिनयातील बऱ्या-वाईट गोष्टींबद्दल आम्ही चर्चा केली. इतर अनेक कोणाची चांगली नाटके पाहिली, कादंबरी वाचली तर त्यावर आमची चर्चा व्हायची. मला वाचनाची आवड असल्याने त्यांना विलक्षण आदर होता. ‘तू एक दुर्मीळ वाचणारा संपादक आहेस’, असे ते म्हणायचे. अनेक विषयांवर मनमोकळेपणाने चर्चा करावी. मार्गदर्शन घ्यावे असा हक्काचा माणूस. आपल्या मनात काय चालले आहे हे ज्याच्याशी मोकळेपणाने सांगावे असे ते होते. हे नाते फक्त माझ्याशी नाही तर त्यांच्या परिचयातील प्रत्येकाशी होते. हे करत असताना त्यांनी मैत्रीत लोचटगिरी कधीच केली नाही. अगदी व्यवस्थित घालून-पाडून बोलायला ते मागेपुढे कधीच पहायचे नाहीत. ‘नाम फाउंडेशन’चे काम सुरू झाले त्याच काळात महाराष्ट्रामधल्या दुष्काळावर मी असंख्य बातम्या केल्या. एका रात्री डबडबल्या स्वरात त्यांनी मला फोन केला आणि बराच वेळ माझ्याशी बोलले ‘…तू रडवलेस मला या स्टोरीमुळे’ अशी प्रतिक्रिया दिली. त्यावेळी त्यांनी ‘नाम फाउंडेशन’ची स्थापना करतो आहे,’ असे सांगत त्यांच्या संभाजीनगरच्या कार्यक्रमाला येण्याबाबत सांगितले. मला कार्यक्रमाला जायला जमले नाही; पण त्याचे रिपोर्टिंग आम्ही खूप सविस्तर केले होते ते त्यांना खूप आवडले होते.
त्यांनी सहा महिन्यांत मला सांगितले, ‘नाम फाउंडेशन’च्या सुरुवातीपासून तू आहेस, एवढी मदत करत आहेस तर याचा लाइफट्रस्टी तू व्हायला पाहिजे.’ मग त्या कार्याशी संबंधित काम सुरू झाले. सुरुवातीला शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींना मदत करणे सुरू झाले. नंतर त्यात एक एक गोष्ट समाविष्ट होते गेली. नुसती आर्थिक मदत देऊन काय करणार तर त्यांना आपल्या पायावर उभे करण्यासाठी शिवणयंत्र, शेळ्या-मेंढ्या दिल्या. गरजूंना सर्वोत्तम प्रशिक्षण देण्यासाठी ते फार आग्रही होते. गुणवत्तेची आणि स्वच्छतेची पराकोटीची आवड त्यांना होती. स्वत: हाताने बनवून जेवायला घालायची त्यांना फार हौस होती. त्यांच्या डोणजे येथील घरी गेल्यावर कधीही त्यांच्या हातचे पदार्थ मी खाल्ले नाही असे झाले नाही.
आज मी त्यांच्या अंत्यसंस्काराला मी डोणजेला जात आहे, ही माझी पहिली वेळ असेल की, त्यांच्या हातचे न खाता मी परत येणार आहे.
एखादे चांगले पुस्तक वाचले की दिवस आहे की रात्र आहे, याचा विचार न करता फोन करून ते त्याच्यावर माझे मत काय? मी वाचले आहे की नाही हे बघायचे. समाजसेवा आपले कर्तव्य आहे, त्याच्याविषयी कशाला एवढा गवगवा करायचा? असं त्यांचं म्हणणं असायचं. लहानपणी त्यांनी पराकोटीची गरिबी पाहिली होती. त्या गरिबीने त्यांना खूप शिकवले. माझे विद्यापीठ, माझी गरिबी आणि माझे कटू अनुभव असल्याचे ते सांगत. असंख्य लोकांनी त्यांना फसवले, अपमान केला आहे. फार क्वचित वेळा ते बोलले. ते दु:ख कुरवाळत बसले नाहीत. त्यांच्यावर खूप गलिच्छ आरोप एका नटीने केला होता, त्यावेळी मी त्यांना घेऊन एका वृत्तवाहिनीवर कार्यक्रम केला होता. त्या कार्यक्रमात त्यांची बाजू समोर आली. त्या कार्यक्रमानंतर उजळलेला त्यांचा चेहरा मला अजूनही आठवतो.
नाम फाउंडेशनचे काम त्यांनी पद्धतशीरपणे वाढवत नेले. ‘नाम’ला खूप देणग्या मिळाल्या. त्या मिळण्यामागे ‘नाम’ चोख काम करेल यांची लोकांना असलेली खात्री. नाना पाटेकर यांचा नि:स्पृहपणा आणि त्यांची विश्वासहर्ता. नाम फाउंडनेशनचा कारभार १०० टक्के पारदर्शी. कोणताही निर्णय घेताना ते सगळ्यांना विचारायचे. त्यांच्या आतापर्यंतच्या प्रतिमेशी ते विसंगत होते. एखाद्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित असले तरी तो कार्यक्रम उत्तम झाला पाहिजे याकडे त्यांचा कटाक्ष असायचा. एखादी वृद्ध, आजारी माणसे असली की त्यांच्या मृत्यूबाबत आपल्या मनाची तयारी झालेली असते; पण नाना पाटेकर यांचे जाणे अविश्वसनीय आहे. परवा भेटलो होतो तेव्हा जिममध्ये व्यायाम करत होते. हिंदी गाणी लावून जिममध्ये व्यायाम करणे त्यांना आवडत असे. त्यानंतर ते मला गाण्याचे रसग्रहण करायला लावायचे. बॅकस्टेज आर्टिस्टना त्यांनी मोठी मदत गाजावाजा न करता केली होती. वयाच्या ४४ वर्षी ते नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष झाले तेव्हा त्यांच्यावर टीका झाली होती. मात्र मी मुलाखतींदरम्यान इतर दिग्ग्ज कलाकारांना त्याबाबत विचारले. त्यापैकी कुणीही त्यांच्या या भूमिकेवर टीका केली नव्हती. नाना पाटेकर यांच्या जाण्याने घरातील व्यक्तीचे निधन झाले आहे अशीच भावना आज आहे.
उदय निरगुडकर
(विश्वस्त नाम फाउंडेशन)
Read About : Nana Patekar – नानात नाना पाटेकर नाना !
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.