CCTV Footage समोर; वर्कला पोलिसांकडून कार चालकाचा शोध सुरू
तिरुवनंतपुरम : Hit and Run in Kerala केरळमधील वर्कला येथील इडवा श्रीअय्यत एकेजी नगर भागात सकाळी नेहमीप्रमाणे रस्त्यावरून पायी जाणाऱ्या श्यामा नावाच्या महिलेला एका भरधाव कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की श्यामा रस्त्यावर गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडल्या.
दुर्घटना घडल्यानंतर कार चालक जखमी महिलेच्या मदतीसाठी थांबण्याऐवजी, घटनास्थळावरून वेगाने फरार झाला. तेथे उपस्थित असलेल्या स्थानिक नागरिकांनी आणि पादचाऱ्यांनी तातडीने धाव घेत श्यामा यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेत पांढऱ्या रंगाची कार दिसून येते. या हिट-अँड-रनचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त होत आहे. कारने ज्या पद्धतीने थेट महिलेला लक्ष्य केले, ते पाहता हा निव्वळ अपघात आहे की श्यामा यांच्यावर झालेला घातपाताचा (हत्येचा) प्रयत्न, याबाबत स्थानिक नागरिकांमध्ये विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.
याप्रकरणी वर्कला पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार क्रमांकाच्या आधारे मालकाचा शोध घेतला जात असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. कार चालकाचा माग काढण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. हा घातपाताचा कट होता की अनपेक्षित अपघात, हे चालकाच्या अटकेनंतर आणि चौकशीनंतरच स्पष्ट होईल.
Read About : Shrirampur Dumper Accident : भरधाव डंपरची स्कूटीला धडक; बोनेट पकडून तरुणीने वाचवला जीव
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.