Ad Advertisement Ad Advertisement

Antarctic polynya formation – अंटार्क्टिकामध्ये भगदाड कसे पडले?

भारतीय शास्त्रज्ञांनी शोधले कारण

नवी दिल्ली : Antarctic polynya formation – अंटार्क्टिकेतील बर्फाच्छादित समुद्रात २०२४ मध्ये अचानक पोर्तुगाल देशाएवढा मोठा बर्फमुक्त (मोकळा) भाग तयार झाला. कडाक्याच्या हिवाळ्यात, जेव्हा अंटार्क्टिका पूर्णपणे बर्फाने झाकलेला असतो, तेव्हा समुद्राचा एवढा मोठा भाग बर्फमुक्त कसा झाला? हा प्रश्न शास्त्रज्ञांना पडला होता. आता भारतीय शास्त्रज्ञांच्या संशोधनातून यामागील मुख्य कारण स्पष्ट झाले आहे.

बर्फाच्या समुद्रात तयार झाले ‘पोलिनिया’

पूर्व अंटार्क्टिकेतील ब्रेड उपसागरात ऑगस्ट २०२४ मध्ये हे महाकाय छिद्र तयार झाले. समुद्राच्या चारही बाजूंना बर्फ असताना, मध्यभागी मोकळे पाणी असलेल्या अशा भागाला ‘पोलिनिया’ (Polynya) म्हणतात. हा भाग केवळ बर्फ वितळल्यामुळे तयार होत नाही, तर वातावरणातील बदल आणि समुद्रातील अंतर्गत उष्णता यामुळेही अशी परिस्थिती निर्माण होते.

‘वायुमंडलीय नद्यां’मुळे वाढली उष्णता

पृथ्वीविज्ञान शास्त्रज्ञ जीवनज्योती स्वैन आणि त्यांच्या भारतीय सहकाऱ्यांनी केलेल्या अभ्यासानुसार, या घटनेमागे वायुमंडलीय नद्या (Atmospheric Rivers) आणि समुद्रातील उष्णतेच्या लाटा (Marine Heatwaves) हे प्रमुख कारण होते.
जुलै आणि ऑगस्ट २०२४ दरम्यान किमान सहा शक्तिशाली वायुमंडलीय नद्या अंटार्क्टिकेकडे वाहून आल्या. या नद्यांमुळे तिथे मोठ्या प्रमाणात उष्णता आणि ओलावा निर्माण झाला, ज्यामुळे वातावरणातील तापमान वाढले. उबदार पाऊस किंवा बर्फवृष्टी आणि उष्ण हवेमुळे समुद्रावर बर्फ तयार होण्याची नैसर्गिक प्रक्रिया मंदावली.

समुद्राखालचे गरम पाणी आले वर

या काळात सुटलेल्या जोरदार वाऱ्यांमुळे समुद्राच्या खोल भागातील उबदार पाणी पृष्ठभागावर आले. या शास्त्रीय प्रक्रियेला ‘एकमन सक्शन’ (Ekman Suction) म्हणतात. वर आलेल्या उबदार पाण्यामुळे समुद्राचे तापमान आणखी वाढले आणि पाण्याच्या पृष्ठभागावर पुन्हा बर्फ तयार होणे पूर्णपणे थांबले. त्यातच समुद्रातील उष्णतेच्या लाटांचीही भर पडली.

हवामान बदलाचा गंभीर इशारा

हे महत्त्वाचे संशोधन ‘जिओफिजिकल रिसर्च लेटर्स’ या प्रसिद्ध नियतकालिकात (Journal) प्रकाशित झाले आहे. शास्त्रज्ञांच्या मते, पृथ्वीचे तापमान अशीच वाढत राहिल्यास अंटार्क्टिकामध्ये अशा बर्फमुक्त भागांची निर्मिती भविष्यात अधिक वारंवार होऊ शकते.
विशेष म्हणजे, गेल्या चार वर्षांत अंटार्क्टिकेतील हिवाळी समुद्री बर्फाची पातळी विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचली आहे. त्यामुळे पोर्तुगाल देशाएवढ्या मोठ्या ‘पोलिनिया’ची निर्मिती ही केवळ एक आश्चर्यकारक नैसर्गिक घटना नसून, ती पृथ्वीच्या बदलत्या हवामानाचा एक गंभीर इशारा आहे, असे मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे.

Read About: Smart Shoes Technology : पावलांच्या ऊर्जेवर चालणारे स्मार्ट शूज विकसित; पार्किन्सन्स, पडण्याचा धोका ओळखण्यास मदत
E-Paper: Punyanagari E-Paper



Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.