Ad Advertisement Ad Advertisement

Meena Kumari and Dharmendra Relationship : निमित्त सापडलं…

Meena Kumari and Dharmendra Relationship : चित्रपट हा स्वप्नांचा खेळ आहे किंबहुना वास्तव आयुष्याचे प्रखर चटके काही क्षण विसरायला मदत करणारं पेन किलर म्हणजे सिनेमा. एकप्रकारे तो संसाराच्या तापानं त्रस्त झालेल्यांना मनोरंजक स्वप्न विकत असतो. तरीही कधी तरी गफलत होते आणि स्वप्नांचा डोळा चुकवून खऱ्याखुऱ्या जीवनाचे कवडसे कचकड्याच्या फिल्मवर पडतात, सहाव्या सातव्या दशकातल्या चित्रपट संगीतात ती किमया हमखास आढळते.

त्या काळातल्या बहुतेक गीतकारांनी तीन मिनिटांच्या गाण्यामध्ये गहन तत्त्वज्ञान सहजसुंदरपणे गुंफलं आहे. ‘बहारो की मंजील’मध्ये मजरूह सुल्तानपुरी या श्रेष्ठ गीतकाराच्या ‘ये दामन अब न छूटेगा…’ या गाण्यात वास्तव असचं पडद्यावर उतरलं आहे. मीनाकुमारी आणि धर्मंेद्र यांची जोडी लवकरच तुटणार आहे असे जणू संकेत या गाण्यामध्ये मिळाले. त्या गाण्यात व्याकूळ झालेली नायिका नायकाची विनवणी करत असते की-

‘ये दामन अब न छुटेगा कभी, चाहे खफ़ा तुम हो
कहां जाऊं कि मेरी जिंदगी का आसरा तुम हो’


अतीव सुंदर गझल मदन मोहन यांची वाटावी इतकी सुरेख लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी बांधली आहे. प्रत्यक्षात हा नायक रंगवणाऱ्या धर्मंद्रने मात्र या चित्रपटानंतर मीनाकुमारीचा हात अर्ध्या वाटेवर सोडून दिला. पडद्यावर मीनाकुमारी नायकाची आळवणी करताना त्याच्या खांद्यावर मान टेकवते. मीनाकुमारीकरिता ते पडद्यावरचं दृश्य नव्हते, वास्तव होते. मात्र, ज्या खांद्यावर तिनं विश्वास टाकला होता, तो नुसता दिसायला बळकट होता. वरून आश्वासक वाटला तरी आतून टिचलेला होता.

त्यावेळी धर्मंद्रच मीनाकुमारीच्या आधाराने उभा होता ना! ‘फूल और पत्थर’नं त्याची गरज संपवून टाकली. त्याच्या यशानं आत्मविश्वास मिळालेल्या धर्मंद्रनं व्यावहारीक विचार करून खांदा काढून घेतला, पण स्पष्ट बोलायचं आणि खरं सांगायचं तर खांदा अलगद काढून घेण्याऐवजी त्यानं जोरदार झटका देऊन तिनं विश्वासानं टाकलेली मान झटकून टाकली. ‘बहारो की मंजील’च्या त्या गाण्यात म्हटल्याप्रमाणं तो खरोखरच ‘खफा’ (नाराज) झाला होता, त्याच कारण काय हे आजवर कळलेले नाही. अशा गोष्टींबद्दल बोलणं हा मीनाकुमारीचा स्वभावच नव्हता, अमरोहीपासून विभक्त झाल्यानंतर तिनं ओठांच्या कडा शिवून घेतल्या, त्या अखेरपर्यंत तशाच मिटलेल्या राहिल्या.

धर्मंद्रच्या बाबतीतसुद्धा तिनं मौनमार्ग अनुसरला. त्या दोघांच्या नजीक समजल्या जाणाऱ्या एका व्यक्तीच्या सांगण्यानुसार, त्याच्या कामाच्या निमित्त झालेल्या गैरहजेरीत मीनाकुमारी अन्य कुणा पुरुषाकडे आकर्षित झाल्याचा संशय धर्मंद्रला आला होता. हे वर्तन हास्यास्पद होतं. हे निरोप देण्याचं कारण नव्हतं, ते दूर जाण्यासाठी शोधलेलं सोयीस्कर निमित्त होतं. त्या काळात मीनाकुमारी प्रामुख्याने अशोककुमार, प्रदीपकुमार आणि रहमान यांच्या बरोबरच काम करत होती.

हे पडद्यावर तिचे नायक आणि पडद्यामागे मित्र व सहकारी होते, त्यांच्याशी तेव्हा प्रेमसंबंध असण्याचा प्रश्नच नव्हता. कारण त्यांच्यापेक्षा जास्त चित्रपट ती धर्मंद्र बरोबर करत होती. तिचा गुलजार यांच्याशी नियमित संपर्क होता, पण तेव्हा गुलजार आणि राखी यांचे प्रेमसंबंध संसारमार्गी लागणार हे जवळपास निश्चित झाल होतं, त्यामुळे धर्मंेद्रला वाटणारा संशय निराधार होता. त्यात चुकूनही थोडेफार तथ्य आहे असं मानलं तरी धर्मेंद्रचं हे वर्तन अन्यायकारक होतं. मीनाकुमारीची बाजू समजून घेण्याची त्याची इच्छा नव्हती, ती समजून घेण्यासाठी तिच्याशी बोलायला हवं होतं, पण ते धर्मंद्रनं टाळलं आणि तिच्याबरोबरचे संबंध तोडण्याचा एकतर्फी निर्णय घेतला असं सांगितलं जातं.

तो आणि मीनाकुमारी ज्या कार्यक्षेत्रात होते, तिथे स्त्री-पुरुषांचं वागणं बोलणं मोकळेपणाचं होतं. त्यांच्या कामाचं स्वरूपही भावनांशी बांधलेलं होतं आणि कामाच्या निमित्तानं होणाऱ्या रोजच्या निकटच्या सहवासामुळे अशी मोकळीक निर्माण होणंदेखील स्वाभाविक होतं. स्वत: धर्मंद्र तर त्याच्या नायिकांशी ‘फ्लर्टिंग’ करण्याबद्दल प्रसिद्ध होता. जवळपास सर्वच नायिकांशी त्याची प्रेमप्रकरणं झाली हे देखील जगजाहीर आहे. अर्थात, त्याबद्दल धर्मंद्रला दोष देता येणार नाही, कारण सर्वच प्रकरणं तात्पुरती होती, निरुपद्रवी होती आणि तो दोघांच्या खुशीचा सौदा होता.

कुणाहीकडून तिथे जवबरदस्ती नव्हती. बॉलीवूडमध्ये अशी प्रकरणं नित्यनेमाने चालू असतात. कलाकारांचे कु टुंबीयसुद्धा ती गोष्ट समजून असतात., त्यामुळेच जराही चर्चा न होता त्यांच्याकडे कानाडोळा केला जातो. या प्रकरणांमध्ये गांभीर्य नसते, थोडीफार गंमत म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं आणि यापेक्षा मोठी गमंत म्हणजे ही प्रकरणं कामाचाच भाग आहेत असं सगळेच धरून चालतात. अशी प्रकरणं चित्रपटाची अफाट प्रसिद्धी करतात, चित्रपट चालवायला मदत करतात. कितीतरी निर्माते अशी प्रकरणं शिजवतात. चित्रपट प्रदर्शित झाला की ही प्रेमप्रकरणं आपोआप विरून जातात. संबंधितांच्या वैवाहिक आणि कौटुंबिक जीवनावर त्यांचा काहीही परिणाम होण्याचा धोका नसतो. राजक पूर आणि धर्मंद्र हे दोघेही आपल्या प्रत्येक चित्रपटाच्या नायिकेच्या प्रेमात असणार, हे सर्वमान्य आणि सर्वसामान्य गृहीतक होतं.

अरुणा अंतरकर
संपर्क : ९३७३५९६०२२

Read About : Trump Tariffs, Dollar Dominance and the Global Shift Toward Gold : डॉलर आणि अमेरिका, बायबाय?
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.