झोपेत असलेल्या पतीवर चाकूने १२ हून अधिक वार; पत्नी आणि जिम ट्रेनरला अटक
गाझियाबाद (उत्तर प्रदेश): Ghaziabad Crime उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील वसुंधरा परिसरात एका पत्नीने जिम ट्रेनरच्या मदतीने पतीच्या हत्येचा कट रचला. २६ ऑक्टोबर रोजी पहाटे घडलेल्या या थरारक घटनेचे सर्व पुरावे सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. पोलिसांनी तत्परता दाखवत मुख्य आरोपी पत्नी प्रिया शर्मा आणि तिचा जिम ट्रेनर प्रताप सिंग या दोघांनाही अटक केली आहे. पीडित पती शशांक कंथारिया यांच्यावर सुऱ्याने १२ पेक्षा जास्त वेळा वार करण्यात आले असून, सध्या रुग्णालयात त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
३ मिनिटांचा सीसीटीव्ही फुटेजवरील खळबळजनक घटनाक्रम
- पहाटे ५:१७ वाजता : प्रिया शर्मा वसुंधरा सेक्टर-१ मधील आपल्या सोसायटीतून गाडी घेऊन बाहेर पडताना दिसली. बाहेर पडण्यापूर्वी तिने घराचा मुख्य दरवाजा जाणीवपूर्वक उघडा ठेवला होता आणि जिम ट्रेनरला आत येण्यासाठी दरवाजा उघडा होता.
- पहाटे ५:२० वाजता: प्रिया निघून गेल्यानंतर अवघ्या ३ मिनिटांत जिम ट्रेनर प्रताप सिंग घरात शिरला आणि गाढ झोपेत असलेल्या शशांक यांच्यावर सुऱ्याने एकापाठोपाठ एक १२ वार केले.
शेजाऱ्यांचे धैर्य आणि आरोपीला अटक
शशांक यांच्या ओरडण्याचा आणि त्यांच्या ३ वर्षांच्या बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून शेजारी मदतीला धावले. त्याच वेळी आरोपी प्रताप सिंग दोन्ही हातांत रक्ताळलेला सुरा घेऊन पळताना दिसला. शेजारी, सुरक्षारक्षक आणि दोन बाईकस्वारांनी पाठलाग करून प्रतापला सोसायटीच्या मुख्य गेटवरच पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले.
जिममधील ओळख आणि अनैतिक संबंध
मूळचे झाशीचे असलेले शशांक आणि प्रिया यांचे ४ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. गेल्या ७-८ महिन्यांपासून प्रिया जिममध्ये जात होती, जिथे तिची ओळख ट्रेनर प्रतापशी झाली. दोघांमध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले आणि त्यांना लग्न करायचे होते. शशांक यांना या संबंधांची माहिती मिळाली होती आणि ते दिवाळीनंतर दुसरीकडे राहण्यासाठी जाणार होते. आपला भांडाफोड होईल या भीतीने प्रिया आणि प्रतापने २५ ऑक्टोबर रोजी सकाळीच शशांक यांच्या हत्येचा बेत आखला होता. सध्या शशांक यांच्या फुफ्फुसांना गंभीर इजा झाल्याने रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.