Ad Advertisement Ad Advertisement

Living Muscle Robot : जिवंत स्नायूंच्या जोरावर पोहणारा सूक्ष्म रोबोट; प्रकाशाच्या मदतीने नियंत्रित होणार हालचाली

एमआयटीच्या संशोधकांची अभिनव निर्मिती; जिवंत स्नायू पेशींच्या आकुंचनामुळे पाण्यात हालचाल, भविष्यात जलपर्यावरणाच्या निरीक्षणासाठी होऊ शकतो उपयोग

वॉशिंग्टन : Living Muscle Robot – रोबोट म्हटले की मोटर, बॅटरी आणि यांत्रिक भाग डोळ्यांसमोर येतात. मात्र, अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स तंत्रज्ञान संस्थेच्या (एमआयटी) संशोधकांनी जिवंत स्नायूंच्या पेशींच्या मदतीने पाण्यात पोहणारा अत्यंत सडपातळ रोबोट विकसित केला आहे. ‘ॲडव्हान्स्ड फंक्शनल मटेरियल्स’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, प्रकाशाच्या साहाय्याने या रोबोटच्या हालचाली नियंत्रित करता येतात.

या रोबोटची रचना लवचिक जेलपासून करण्यात आली असून त्याला दोन पंखांसारखे भाग आहेत. प्रत्येक पंखावर केसांपेक्षाही पातळ जिवंत स्नायू पेशींचा थर लावण्यात आला आहे. या पेशींमध्ये जनुकीय बदल करून प्रकाश पडल्यावर त्या आकुंचन पावतील, अशी व्यवस्था केली आहे. त्यामुळे पंखांची हालचाल होऊन रोबोट पाण्यात पुढे सरकतो. एका पंखावर प्रकाश टाकल्यास रोबोटची दिशा बदलता येते, तर दोन्ही पंख सक्रिय केल्यास त्याला पुढे पोहता येते. प्रयोगादरम्यान त्याने पाण्यातील छोट्या मार्गातील अडथळे पार केले. त्याचा कमाल वेग प्रति मिनिट शरीराच्या लांबीच्या सुमारे चौपट होता.

स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी विशेष रचना

एमआयटीच्या प्रा. रितू रमन यांच्या नेतृत्वाखालील पथकाने स्नायू पेशींना आधार देणाऱ्या जेलची रचना, कडकपणा आणि पृष्ठभागावरील खाचांचा अभ्यास केला. यासाठी ‘जिलेटिन मेथॅक्रिलेट’ या पदार्थाचा वापर करण्यात आला. योग्य आकाराच्या खाचांमुळे पेशी एकाच दिशेने वाढून मजबूत स्नायू तंतू तयार करतात. प्रकाशाच्या वारंवार उत्तेजनाने त्यांच्या आकुंचनक्षमतेतही सुधारणा करण्यात आली.

भविष्यातील उपयोग

Living Muscle Robot पारंपरिक बायोहायब्रिड रोबोट तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्नायू पेशी आणि त्रिमितीय रचना आवश्यक असतात. नव्या पद्धतीमुळे उत्पादन अधिक किफायतशीर आणि हालचाली अधिक कार्यक्षम होण्याची शक्यता आहे. भविष्यात अशा रोबोटचा वापर जलपर्यावरणाचे निरीक्षण, प्रदूषणाचा अभ्यास आणि नाजूक अधिवासांमध्ये संशोधनासाठी होऊ शकतो. मात्र, त्याचा वेग वाढवणे आणि प्रत्यक्ष वापरातील क्षमता तपासणे ही पुढील आव्हाने आहेत.

Read About: Science of Laughter – हसू आवरता आवरेना, मेंदूत नेमकं काय घडतं? अनावर हास्यामागचं गुपित उघड

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.