कांद्याच्या दराचे ए टू झेड गणित..!
नाशिक: Drought Onion Prices Farmers Profit or Loss – गेल्या दोन वर्षांपासून ज्या कांद्याने शेतकऱ्यांना रडवले, मातीमोल भावाने ज्याची विक्री करावी लागली, त्याच कांद्याने गेल्या दोन महिन्यांपासून अचानक उसळी घेतली आहे. बाजारात कांद्याला चांगला भाव मिळत आहे. ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आहे, तर शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर थोडा आनंद आहे.
पण थांबा! हा आनंद कायम राहणार का? कारण एकीकडे बाजारात तेजी आहे, तर दुसरीकडे निसर्गाने खेळ मांडला आहे. राज्यातील प्रमुख कांदा उत्पादक जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाऊस अत्यंत कमी झाला आहे.
अशा परिस्थितीत यंदा लाल कांद्याचे चित्र काय असेल? खरिपात लागवड किती झाली होती? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दुष्काळी परिस्थितीत कांदा भाव खाणार की पुन्हा एकदा शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आणणार? आजच्या रिपोर्टमध्ये आपण संपूर्ण वास्तव आकडेवारीसह पाहणार आहोत.
आधी आपण हे समजून घेऊ गेल्या दोन महिन्यांत कांद्याचे भाव अचानक का वाढले?
1 जून ते सप्टेंबर दरम्यान किरकोळ बाजारात कांदा ३० रुपयांवरून थेट ५५-६० रुपयांपर्यंत पोहोचला.याचे मुख्य कारण म्हणजे उन्हाळी कांद्याचा साठा आता संपत आला आहे. त्यातच, यावर्षी मान्सून उशिरा आल्यामुळे आणि अनेक भागात पाऊस कमी झाला. दुष्काळामुळे कांद्याची लागवड कमी, उत्पादन कमी झाले. जिथे पाणी आहे तेथील नवीन खरिपाचा कांदा बाजारात येण्यासही महिनाभर उशीर झाला आहे. दुसरीकडे बाजारात मागणी जास्त आणि पुरवठा कमी, यामुळे भाव वाढले. आता मुख्य मुद्द्यावर येऊ.
यंदा खरिपात लाल कांद्याची लागवड नेमकी किती झाली आहे?
महाराष्ट्रातील सर्वात मोठा कांदा उत्पादक जिल्हा म्हणजे नाशिक. पण यंदा नाशिक जिल्ह्यात खरिपाच्या कांदा लागवडीत तब्बल ३४ ते ३५ टक्क्यांची मोठी घट नोंदवली गेली आहे. जिथे सरासरी ३२ हजार हेक्टरवर लागवड होते, तिथे यंदा केवळ २१ हजार हेक्टरच्या आसपास लागवड झाली आहे.
अहिल्यानगर, धुळे आणि जळगाव या भागांतही दुष्काळ आहे.
या जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत केवळ ३५ ते ३९ टक्केच कांदा लागवड झाली आहे. त्यात कमी पाऊस आणि उष्ण हवामानामुळे यंदा कांद्याची उत्पादकता घटली आहे. दरवर्षी एका हेक्टरमध्ये १५ टन कांदा निघायचा, तिथे यंदा केवळ १० ते ११ टन कांदा निघण्याचा अंदाज आहे. म्हणजेच काय, तर यंदा शेतात कांदा कमी आहे!
आता या सर्व परिस्थितीचा दरावर कसा परिणाम होईल?
गणित अगदी सोपे आहे. नवीन लाल कांद्याची आवक बाजारात उशिरा म्हणजे नोव्हेंबरच्या शेवटी किंवा डिसेंबरमध्ये पूर्ण क्षमतेने सुरू होईल. तोपर्यंत बाजारात कांद्याची टंचाई जाणवणार आहे. त्यामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात कांद्याचे दर तेजीत राहतील, यात शंका नाही.लाल कांद्याची साठवणूक क्षमता केवळ २० ते ३० दिवसांची असते. त्यामुळे शेतकऱ्यांना तो बाजारात लगेच विकावा लागतो. पण इथे एक मोठा ट्विस्ट आहे. जेव्हा जेव्हा कांद्याचे दर वाढतात, तेव्हा सरकार आपल्या बफर स्टॉकमधून कांदा बाजारात आणते किंवा निर्यातबंदी सारखे निर्णय घेते. नुकताच सरकारने बफर स्टॉक बाजारात सोडायला सुरुवात केली आहे, ज्यामुळे काही शहरांत दर थोडे स्थिर झाले आहेत. मग सर्वात मोठा प्रश्न,
या सगळ्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल का? की पुन्हा नुकसान सोसावे लागेल?
वास्तविक पाहता, यंदा भाव नक्कीच चांगले मिळतील.अंदाजे २५०० ते ४५०० रुपये प्रति क्विंटल दरम्यान सरासरी भाव राहू शकतात. पण शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडण्याचे कारण म्हणजे ‘कमी उत्पादन’.दुष्काळामुळे लागवड कमी झाली, विहिरींना पाणी नाही, आणि एकरी उत्पादन घटले आहे. म्हणजेच, भाव जरी चांगले मिळाले, तरी शेतकऱ्यांकडे विकायला मालच कमी असणार आहे. त्यामुळे खर्च वजा जाता शेतकऱ्यांच्या पदरात फक्त ‘माफक’ नफा पडेल, अशी सध्याची परिस्थिती आहे.
लाल कांद्याची लागवड आणि दरवाढीचा अंदाज समजून घेतल्यानंतर आता रब्बी विषयी बोलूया..
स्वाभाविकपणे, खरीपातील लाल कांद्याच्या घसरलेल्या लागवडीनंतर आता सगळी भिस्त रब्बी (उन्हाळी) कांद्यावर आहे.महाराष्ट्रात एकूण कांदा उत्पादनापैकी ६0 ते ६५ टक्के उत्पादन एकट्या रब्बी हंगामात होते. कारण हा कांदा ६ महिने टिकणारा असतो. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीचा या लागवडीवर मोठा परिणाम होणार आहे.
यंदा रब्बी कांद्याची लागवड सरासरीच्या तुलनेत ७० ते ७५ टक्क्यांच्या आसपासच मर्यादित राहण्याचा अंदाज आहे.
रब्बी कांद्याचे रोप ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टाकले जाते आणि मुख्य लागवड डिसेंबर ते जानेवारी दरम्यान होते. पाण्याचे दुर्भिक्ष पाहता, ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत पाणी आहे तेच यंदा पूर्ण क्षेत्रावर कांदा लावतील, इतर शेतकरी पर्यायी पिकांकडे वळण्याची शक्यता जास्त आहे.
खरिपाची लागवड घटल्यामुळे आणि रब्बीची लागवडही मर्यादित राहण्याचा अंदाज असल्याने, बाजारपेठेत कांदा पुरवठ्याची टंचाई अटळ आहे.पुढील वर्षाच्या सुरुवातीला रब्बी कांदा जेव्हा बाजारात येईल, तेव्हा दर्जा आणि आवकनुसार शेतकर्यांना ३,००० रुपये ते ५,००० रुपये प्रति क्विंटल म्हणजे (३० ते ५० रुपये किलो) दरम्यान चांगला सरासरी दर मिळण्याची दाट शक्यता आहे. जर पाणी टंचाई जास्त जाणवली, तर हा दर अधिक वर जाऊ शकतो.
“शेतकरी मित्रांनो, खरिपाने हुलकावणी दिली असली तरी रब्बी कांदा बाजारात भाव खाणार हे नक्की. पण प्रश्न दराचा नाही, तर पाण्याचा आहे! ज्यांच्याकडे पाणी आहे आणि जो रब्बी कांदा पिकवू शकेल, त्याला यंदा नक्कीच सोन्याचे दिवस येतील.”
आजच्या व्हिडिओचा सारांश हाच आहे की, यंदा कांदा नक्कीच भाव खाणार आहे, पण निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्याला त्याचा १००% फायदा होणार नाही.म्हणूनच, तुमच्याकडे जर खरिपाचा कांदा असेल, तर बाजाराचा अंदाज घेऊन, टप्प्याटप्प्याने माल विका. एकदम सगळा कांदा बाजारात आणू नका. रब्बी कांदा लागवडीची तयारी करत असाल तर आधी पाण्याचा अंदाज घ्या. शेवटपर्यंत पाणी पुरेल का? किती क्षेत्राला पुरेल? हे लक्षात घेऊन लागवडीची तयारी करा.
Read About: दुष्काळात अमेरिका शेतकऱ्यांना करोडोंची मदत कशी करते?
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.