कॉलेजमध्ये राहायचे असेल तर आम्ही म्हणतो तसे वाग : धमकावत केला चाकूहल्ला, दोघे जखमी
छत्रपती संभाजीनगर : Beed Bypass Knife Attack Two Seriously Injured – कॉलेजमध्ये राहायचे असेल तर आम्ही म्हणतो तसे वाग नसता तुला बघून घेईन, अशी धमकी देत एमआयटी कॉलेजच्या एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर दोन गटात बीड बायपासवर तुफान राडा झाला. बाहेरून आलेल्या एकासह त्याच्या साथीदारांनी विद्यार्थी आणि त्याच्या नातेवाईकांवर चाकू हल्ला केला. यात दोघे गंभीर जखमी झाले. २७ ऑक्टोबरला दुपारी १ वाजता हा प्रकार घडला. या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमोल चव्हाण (२८), करण सरोदे (२२) आणि एका अनोळखीचा आरोपींमध्ये समावेश आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी दिली. प्रणव राम नरवडे (१८, रा. मिलिंदनगर, उस्मानपुरा) हा फिर्यादी आहे. तो बी.टेक मेकॅनिकलच्या प्रथम वर्षात शिकतो. २७ ऑक्टोबरला दुपारी १ वाजता कॉलेजमधील मंथन हॉलसमोरून तो मित्र मयूर दाभाडे आणि मानव नरवडे यांच्यासोबत घराकडे निघाला. तेव्हा आरोपी करण सरोदे याने त्यांना गाठले.
तिघांना उद्देशून तुम्ही कोणत्या डिपार्टमेंटला आहात. तुम्हाला काही माहिती आहे का, मी कोण आहे. तू जास्त शिल्लकचे कशाला बोलतो, तुम्हाला कॉलेजमध्ये राहायचे असेल तर आम्ही म्हणतो तसे वागावे लागेल, असे बोलून त्याने तिघांनाही शिवीगाळ करीत धमक्या दिल्या. तसेच, त्याचा मित्र अमोल चव्हाणला बोलून घेतले आणि दोघांनी प्रणव, मयूर आणि मानव या तिघांनाही मारहाण केली.
मामा अन् भावावर चाकूहल्ला
आरोपींनी मारहाण केल्यामुळे प्रणवने लगेचच मामा विकी सर्जेराव त्रिभूवन (३०, रा. छोटा मुरलीधरनगर) आणि मावसभावाला बोलावून घेतले. ते दोघे आल्यावर सर्वजण अमोल चव्हाण, करण सरोदे आणि त्याच्या साथीदारांना समजावून सांगू लागले. तेवढ्यात आरोपींनी चाकूहल्ला केला. त्यात प्रणवचा मामा विकी आणि मावसभाऊ हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यावर तिघे आरोपी पळून गेले. या प्रकरणी अधिक तपास हवालदार संतोष जाधव करीत आहेत.
Read About: प्रयागराजमध्ये घरात पुरलेल्या ३ निळ्या ड्रममध्ये सापडली कोट्यवधींची रोकड
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.