मुख्यमंत्री फडणवीसांची मिश्किल टिप्पणी | पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ठाकरे बंधूंसमोरच मुख्यमंत्र्यांची राजकीय टोलेबाजी; एकत्र येण्याने आश्चर्य वाटण्याचे कारण नसल्याचेही स्पष्टीकरण
Fadnavis Thackeray Remark : मुंबई : ”राज ठाकरेच नव्हे तर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा जेव्हा जेव्हा मला बोलावले तेव्हा तेव्हा मी गेलो. २०१९ पर्यंत उद्धवजींनी बोलावले तेव्हा मी गेलो, परंतु २०१९ नंतर मात्र त्यांनी मला बोलावलेच नाही. त्यांनी बोलावले असते तर मी गेलो असतो, पण मी वाटच पाहत बसलो,” अशी राजकीयदृष्ट्या अतिशय मार्मिक आणि मिश्किल टिप्पणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
प्रसिद्ध व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी यांनी संपादित केलेल्या ‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत गुरुवारी सायंकाळी दादर येथे पार पडला. मराठी व्यंगचित्रकलेचा गेल्या १०० वर्षांतील प्रवास मांडणारे हे पुस्तक एक महत्त्वपूर्ण अभ्यासग्रंथ आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते. या सोहळ्यात ठाकरे बंधूंच्या उपस्थितीतच फडणवीस यांनी ही फटकेबाजी केली. मराठी व्यंगचित्रकलेचा गेल्या १०० वर्षांतील प्रवास मांडणाऱ्या या कार्यक्रमात मंत्री आशिष शेलार यांनी केलेल्या वक्तव्याचा संदर्भ देत मुख्यमंत्री फडणवीस यांनी २०१९ च्या राजकीय घडामोडींवर थेट बोट ठेवले. राज ठाकरे यांनी बोलावले की मुख्यमंत्री येतात, असा उल्लेख शेलार यांनी केला होता. त्यावर बोलताना फडणवीस यांनी
स्पष्ट केले की, २०१९ पूर्वी उद्धव ठाकरे यांच्या एका हाकेवर आपण नेहमी जात होतो; मात्र २०१९ नंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्याला बोलावणेच पूर्णपणे बंद केले. आपण मात्र त्यांची वाट पाहत राहिलो, असा टोला त्यांनी मंचावर उपस्थित उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहत लगावला.
विरोधी विचारसरणीचे नेते एकाच व्यासपीठावर एकत्र आल्याने आश्चर्य व्यक्त करणाऱ्यांना उत्तर देताना ते म्हणाले की, आम्ही एकाच मंचावर एकत्र आलो याचे अनेकांना आश्चर्य वाटले, पण त्यात नवल वाटण्यासारखे काहीच नाही. आम्ही एकत्र येऊ शकतो, गप्पा मारू शकतो, चहा-पाणी पिऊ शकतो. मतभेद असले तरी कलेसाठी आणि महाराष्ट्राच्या समृद्ध राजकीय संस्कृतीसाठी एकत्र येण्याची हीच परंपरा राहिली आहे, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान ग्रंथालीच्या वतीने आयोजित या सोहळ्यास मंत्री आशिष शेलार, ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर, संपादक अरुण जोशी यांच्यासह अनेक नामवंत व्यंगचित्रकार आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मला राजकारण करू द्या- फडणवीसांचा ठाकरे बंधूंना मिश्किल टोला
या वेळी राजकीय मतभेदांवर मिश्किल भाष्य करताना मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ”प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी वेगळी हुशारी आणि कला असते. राज ठाकरे हे उत्तम व्यंगचित्रकार आहेत, तर उद्धव ठाकरे हे उत्तम छायाचित्रकार आहेत. मला राजकारण चांगले जमते. त्यामुळे त्यांनी त्यांची कला जोपासावी आणि मला राजकारण करू द्यावे.”
मुंबईत व्यंगचित्रांसाठी भव्य कलादालन उभे करणार : मुख्यमंत्री
मराठी व्यंगचित्रकलेच्या १०० वर्षांहून अधिक समृद्ध इतिहासाचा सन्मान करण्यासाठी आणि व्यंगचित्रकारांच्या ऐतिहासिक कलाकृतींचे संवर्धन करून त्या भावी पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने मुंबईत एक भव्य व्यंगचित्र दालन (गॅलरी) उभारण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. हे दालन उभे करताना स्वत: व्यंगचित्रकार असलेले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे या दोघांचीही मदत व सहकार्य घेतले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले. महाराष्ट्रातील व्यंगचित्रकलेला एक शतकाहून अधिक काळाची मोठी परंपरा आहे. या काळात व्यंगचित्रकारांनी समाजाला हसवण्यासोबतच डोळ्यात अंजन घालण्याचे आणि व्यवस्थेला आरसा दाखवण्याचे मोठे काम केले आहे. ही समृद्ध परंपरा नव्या पिढीसमोर यावी, यासाठी मुंबईत स्वतंत्र दालनाची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले.
फडणवीसांना २०२९ पर्यंत मुख्यमंत्री ठेवा म्हणजे झालं : राज ठाकरे यांचे फटकारे
भाषणाच्या सुरुवातीलाच मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मंत्री आशिष शेलार यांच्या वक्तव्याचा संदर्भ घेत जोरदार टोलेबाजी केली. शेलार यांनी ‘राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना बोलावले की ते येतात,’ असा उल्लेख केला होता. त्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, ”यापुढेही मी मुख्यमंत्र्यांना बोलवत जाईन आणि ते येत राहतील; पण फडणवीसांना २०२९ पर्यंत मुख्यमंत्री ठेवा म्हणजे झालं!” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रात जाऊ शकतात, अशी चर्चा सातत्याने रंगत असते; फडणवीस याचा वारंवार इन्कार करत राज्यातच काम करणार असल्याचे स्पष्ट करत असले, तरी राज यांनी याच चर्चेवर बोट ठेवत हा उपरोधिक टोला लगावला. त्यांच्या या विधानानंतर सभागृहात एकच हशा पिकला. दरम्यान, काही व्यासपीठांवर राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावे लागते, असे सांगत त्यांनी व्यंगचित्रकलेचे महत्त्व आणि कलाकारांच्या सन्मानावर भर दिला. यासाठी शासन आणि नागरिकांनीही पुढाकार घ्यायला हवा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तर, मंत्री आशिष शेलार यांनी व्यंगचित्र दालन उभारण्यासाठी सर्वांचे सहकार्य घेतले जाईल, असे स्पष्ट केले.
व्यंगचित्र आवडले नाही म्हणून त्यावर बंदी आणू नये – उद्धव ठाकरे
‘ग्रंथाली’ने प्रकाशित केलेल्या पुस्तकात १८८० पासूनच्या व्यंगचित्रकलेचा प्रवास मांडल्याबद्दल कौतुक करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, नव्या पिढीने या समृद्ध कलेचा वारसा पुढे नेला पाहिजे. व्यंगचित्र केवळ स्वत:च्या आनंदासाठी नसून त्यातून लोकांपर्यंत अचूक संदेश जायला हवा. केवळ वेड्यावाकड्या रेघा मारणे म्हणजे व्यंगचित्र नव्हे, असे सांगत त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्रकलेची आठवण सांगितली. ‘मार्मिक’साठी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री रामकृष्ण हेगडे यांचे चित्र हवे असताना फोटो उपलब्ध नव्हता; तेव्हा बाळासाहेबांनी कागद मागवून अवघ्या काही सेकंदांत हेगडेंचा अचूक चेहरा रेखाटला होता. बाळासाहेबांनी वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळावर ‘मेघदूत’ नावाचे एक प्रसिद्ध व्यंगचित्र काढले होते. त्या चित्रात नाईक यांच्याकडे अनेक खाती असल्यामुळे त्यांच्यावर मंत्रीपदांचा पाऊस (वर्षाव) पडत असल्याचे दाखवले होते आणि बंगल्यांच्या नावांसह प्रत्येक मंत्र्याचे कॅरेक्टर रेखाटले होते. त्या काळात व्यंगचित्रांचा कोणीही राग मानत नसे, याचा दाखला देत ठाकरे म्हणाले की, एखादे व्यंगचित्र आवडले नाही किंवा ते विरोधात आहे म्हणून त्यावर बंदी आणणे अथवा व्यंगचित्रकाराचा आवाज दाबणे अयोग्य आहे. नेत्यांमध्ये उपरोधिक टीका स्वीकारण्याची राजकीय सहिष्णुता हवी, असा संदेश त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर दिला.
फडणवीस आणि ठाकरे बंधूंमध्ये बंद दाराआड चर्चा
कार्यक्रमाच्या औपचारिक सुरुवातीपूर्वी सभागृहात दाखल झालेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात एका स्वतंत्र कक्षात बंद दाराआड चर्चा झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. बंद दाराआड या तिन्ही दिग्गज नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, हे स्पष्ट होऊ शकले नाही. गेल्या काही काळापासून ठाकरे बंधू केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर सातत्याने टीका करत असताना आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह सत्ताधारी पक्षाला लक्ष्य केले जात असतानाही हे तिन्ही नेते एकाच मंचावर आले. यावेळी तिघांनीही राजकीय मतभेद बाजूला ठेवत एकमेकांशी सहजतेने संवाद साधल्याचे पाहायला मिळाले.
Read About : Manoj Jarange audio clip controversy- जरांगेंचा ऑडिओ बॉम्ब
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.