Ad Advertisement Ad Advertisement

Thane MACT Compensation Order- अपघातात मृत्यू झालेल्या दोघांच्या कुटुंबीयांना 1.30 कोटींची भरपाई

ठाणे मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाचा निर्णय; विमा कंपनीला आधी भरपाई देऊन नंतर वाहनमालकाकडून वसुलीचे निर्देश

Thane MACT Compensation Order : ठाणे : २०२२ मध्ये पुणे जिल्ह्यात झालेल्या रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या दोन तरुणांच्या कुटुंबीयांना ठाणे मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने (एमएसीटी) एकूण १ कोटी ३० लाख ३१ हजार २०० रुपयांची भरपाई मंजूर केली आहे. बाबासाहेब गौतम साठे यांच्या कुटुंबीयांना ९५ लाख २७ हजार रुपये, तर रोहित देविदास शिंदे यांच्या कुटुंबीयांना ३५ लाख ४ हजार २०० रुपये भरपाई देण्याचे आदेश न्यायाधिकरणाचे सदस्य आर. व्ही. मोहिते यांनी दिले.


६ जुलै २०२२ रोजी पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात खुंटबाव ते पिंपळगावदरम्यान प्रवास करताना एका कारला अपघात झाला होता. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार उलटली. दुसरा अपघात टाळण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्याचे सांगण्यात आले. या अपघातात कारमधील बाबासाहेब साठे आणि रोहित शिंदे हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना पुणे येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात

या अपघाताला कारचालकाचा बेदरकारपणा आणि निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे न्यायाधिकरणाने आदेशात स्पष्ट केले. मृत व्यक्तींकडून अपघातास कारणीभूत ठरेल असे कोणतेही कृत्य झाल्याचे नोंदीवरून दिसत नसल्याचेही न्यायाधिकरणाने नमूद केले. अपघातग्रस्त वाहनाकडे अपघाताच्या वेळी वैध परमिट नव्हते, असा युक्तिवाद करत विमा कंपनीने भरपाईची जबाबदारी नाकारली होती. मात्र, न्यायाधिकरणाने विमा कंपनीला प्रथम भरपाईची रक्कम अदा करण्याचे आणि त्यानंतर वाहनमालकाकडून ती वसूल करण्याचे निर्देश दिले.

साठे यांच्या कुटुंबीयांना सर्वाधिक भरपाई

अपघातात मृत्यू झालेले बाबासाहेब साठे (३७) हे वाहतूक व्यवसायाचे मालक होते. त्यांचे मासिक उत्पन्न चार लाख रुपये होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि आई असा परिवार आहे. या अवलंबितांना न्यायाधिकरणाने ९५ लाख २७ हजार रुपयांची भरपाई मंजूर केली. दुसरे मृत रोहित शिंदे (२३) हे एका वाहतूक कंपनीत चालक म्हणून काम करत होते. त्यांना दरमहा २५ हजार रुपये वेतन मिळत होते. त्यांच्या कायदेशीर वारसांना आणि अवलंबितांना ३५ लाख ४ हजार २०० रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली.

Read About : Supreme Court on Digital Fraud- डिजिटल फसवणूक बळींना निष्काळजी बँकांनीच द्यावी भरपाई
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.