Ad Advertisement Ad Advertisement

Finals National Tennis – राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत महाराष्ट्राची मायरा शेख चमकली

एकेरीसह दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक | दुहेरी मुकुट पटकावण्याची सुवर्णसंधी

छत्रपती संभाजीनगर : Finals National Tennis- ईएमएमटीसीतर्फे आयोजित आणि ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (एआयटीए) व महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) यांच्या मान्यतेखाली सुरू असलेल्या ईएमएमटीसी १४ वर्षांखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या मायरा शेखने दमदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

एकेरी आणि दुहेरी अशा दोन्ही प्रकारांत अंतिम फेरीत प्रवेश करून तिने दुहेरी मुकुटाच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले आहे. विशेष म्हणजे, एकेरीच्या उपांत्य फेरीत महाराष्ट्राच्याच रिशिता यादववर मात करत मायराने अंतिम फेरी गाठली, तर दुहेरीत रिशितासोबतच खेळताना अव्वल मानांकित जोडीला पराभवाचा धक्का दिला.

ईएमएमटीसी टेनिस कॉम्प्लेक्स येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुलींच्या एकेरी उपांत्य फेरीत दुसऱ्या मानांकित मायरा शेखसमोर नवव्या मानांकित रिशिता यादवचे आव्हान होते. पहिला सेट २-६ असा गमावल्यानंतर मायराने विलक्षण जिद्द दाखवत सामन्यात पुनरागमन केले. दुसऱ्या सेटमध्ये टायब्रेकपर्यंत रंगलेल्या लढतीत तिने ७-६(७) अशी बाजी मारली. त्यानंतर निर्णायक तिसऱ्या सेटमध्ये ६-१ असा एकतर्फी विजय मिळवत अंतिम फेरीचे तिकीट निश्चित केले. प्रतिकूल परिस्थितीतही संयम आणि आक्रमक खेळाच्या जोरावर मिळवलेला हा विजय विशेष लक्षवेधी ठरला. अंतिम फेरीत मायरासमोर अव्वल मानांकित उत्तर प्रदेशच्या सिद्धी पांडेचे आव्हान असणार आहे. सिद्धीने उपांत्य फेरीत कर्नाटकच्या शर्वी गहलोटचा ६-३, ६-१ असा पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे.

दुहेरीच्या मैदानातही मायराने आपला ठसा उमटवला. तिसऱ्या मानांकित महाराष्ट्राच्या रिशिता यादव आणि मायरा शेख या जोडीने उपांत्य फेरीत अव्वल मानांकित हरियाणाच्या आराधना तेहलन आणि उत्तर प्रदेशच्या सिद्धी पांडे या जोडीशी सामना केला. पहिला सेट ०-६ असा गमावल्यानंतरही महाराष्ट्राच्या जोडीने हार न मानता जोरदार पुनरागमन केले. दुसऱ्या सेटमध्ये ५-७ अशी झुंज देत त्यांनी सुपर टायब्रेकमध्ये ११-९ असा थरारक विजय मिळवला. अव्वल मानांकित जोडीला पराभूत करत अंतिम फेरी गाठल्याने महाराष्ट्राच्या या जोडीकडून विजेतेपदाच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

मुलींच्या दुहेरीतील दुसऱ्या उपांत्य सामन्यात महाराष्ट्राच्या शौर्या पाटील आणि अस्मी पित्रे यांनीही प्रभावी खेळाचे प्रदर्शन केले. त्यांनी महाराष्ट्राच्या रायमा चव्हाण आणि कर्नाटकच्या शर्वी गहलोट यांचा ६-१, ६-२ असा सरळ सेटमध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यामुळे मुलींच्या दुहेरीत महाराष्ट्राच्या दोन खेळाडूंच्या जोड्यांनी आपली छाप पाडली आहे.

मुलांच्या एकेरीत तेलंगणाच्या खेळाडूंचे वर्चस्व

दरम्यान, मुलांच्या एकेरीत तेलंगणाच्या खेळाडूंनी वर्चस्व गाजवत अंतिम फेरीत प्रवेश केला. चौथ्या मानांकित सुजई पोथुला याने कर्नाटकच्या आदित्य कामतचा ७-६(८), ६-२ असा पराभव केला. दुसऱ्या मानांकित सत्या चिंतागुंता याने तामिळनाडूच्या सातव्या मानांकित जेगन सेंथिलवर ६-१, ६-१ असा सहज विजय मिळवला. त्यामुळे मुलांच्या एकेरीचे विजेतेपद तेलंगणाच्या दोन खेळाडूंपैकी एकाला मिळणार आहे.

Read About : India’s Historic 114-Medal Haul at the Asian Para Games – पॅरा खेळाडूंचा ‘पदकांचा शतकोत्सव’
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.