तब्बल ३६ तासांच्या शोधानंतर आढळला मजुराचा मृतदेह
छत्रपती संभाजीनगर : chikalthana-illegal-construction-slab-collapse-four-booked- चिकलठाण्यात विनापरवागनी धोकादायक स्थितीत बांधकाम करीत असताना अचानक स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्या चौघांविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भूखंडधारक मोहमद रजा खान गेसुदराज खान, बांधकाम ठेकेदार अशोक हरी राठोड, वास्तू विशारद मोहमद हरिस सिद्दीकी, खासगी अभियंता मोहमद फैजोद्दीन अशी आरोपींची नावे आहेत. दरम्यान, मलब्याखाली दबल्या गेलेल्या मजुराचा ३६ तासांच्या शोधानंतर मृतदेह आढळून आला आहे. ज्ञानेश्वर ऊर्फ खंडू तुळशीराम विटनोर, असे मृत मजुराचे नाव आहे.
महापालिकेच्या इमारत निरीक्षक प्राप्ती जाधव यांनी याबाबत पोलिसांत फिर्याद दिली. फिर्यादीनुसार, चिकलठाणा येथील गट नंबर ४०९/४१० चिकलठाणा येथे मोहम्मद रजा खान गेसूदराज खान (वय ७०) यांच्या भूखंडावर बांधकाम चालू असताना २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजताच्या दरम्यान अचानक स्लॅब कोसळून दुर्घटना घडली. या ठिकाणी अवैध बांधकामाचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत अंकुश शांताराम कांबळे, अश्फाक कडू शेख, बांधकाम ठेकेदार अशोक राठोड यांचा मुलगा गोरख राठोड असे स्लॅबच्या लोखंडी रॉड व मलब्याच्या खाली येऊन जखमी झाले. तर या मजुरांसोबत काम करणारा कामगार ज्ञानेश्वर ऊर्फ खंडू तुळशीराम विटनोर हा मलब्याखाली दबला होता. या घटनेस जमिनीचे मालक मोहम्मद रजा खान, बांधकाम ठेकेदार अशोक हरी राठोड, वास्तुविशारद मोहम्मद हरिस सिद्दीकी, खासगी अभियंता मोहम्मद फैजोद्दीन हे जबाबदार असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
नऊ हजार चौ.फुटांवर अवैध बांधकाम
मोहम्मद रजा खान यांनी आपल्या नऊ हजार चौरस फुट जागेवर महापालिकेची बांधकाम परवानगी न घेता अवैध बांधकाम सुरू केले. त्यासाठी खासगी वास्तुविशारद मोहम्मद हरीस सिद्दीकी, खासगी अभियंता मोहम्मद फैजोद्दीन, बांधकाम ठेकेदार अशोक हरी राठोड यांच्यासोबत जुलै २०२६ मध्ये अवैध बांधकाम करारनामा केल्याचे म्हटले आहे.
…तर टळली असती दुर्घटना
या भूखंडावर असलेल्या विहिरीचे योग्य नियोजन करण्यात आले नाही. काम सुरू करण्यापूर्वी विहिर पूर्णपणे बुजविणे आवश्यक होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. या विहिरीच्या काठावर निष्काळजीपणे लोखंडी रॉड टाकण्यात आले. या ठिकाणी लावलेला लोखंडी रॉड निसटून दुर्घटना घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. इमारतीचे बांधकाम सुरू करण्यापूर्वी मनपाकडून परवानगी घेतली असती तर अधिकाऱ्यांच्या पाहणीत ही बाब दिसून आली असती. विहिर बुजविल्याशिवाय मनपाने बांधकाम परवानगी दिली नसती. त्यामुळे ही दुर्घटना टळली असती, अशी चर्चाही होत आहे.
एसडीआरएफने घेतला शोध
इमारतीचा स्लॅब कोसळल्यानंतर त्याखाली ज्ञानेश्वर ऊर्फ खंडू तुळशीराम विटनोर हा मजूर दबला होता. अग्निशमन विभागाच्या पथकाने दबलेल्या मजुराचा शोध सुरू केला. मात्र, २४ तासानंतरही तो सापडला नाही. घटनेचे गांभीर्य ओळखून पुण्याहून राज्य आपत्ती प्रतिसाद बलास (एसडीआरएफ) पाचारण करण्यात आले. ३० जवानांचे हे पथक शुक्रवारी रात्री शहरात दाखल झाले. शनिवारी सकाळपासून पथकाकडून शोधकार्य सुरू करण्यात आले होते. तब्बल ३६ तासांच्या शोधानंतर मलब्याखाली दबलेल्या मजुराचा मृतदेह आढळून आला.
महत्त्वाचे मुद्दे
Read About : Teachers Diwali Holidays Extended – शिक्षकांच्या दिवाळीच्या सुट्या 21 नोव्हेंबरपर्यंत वाढल्या
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.