सव्वा लाख वर्षांपूर्वीचे अवशेष उलगडणार पृथ्वीच्या हवामानाचा इतिहास
कोलंबस (अमेरिका) : Ancient Ice in Tibet – शेवटचे हिमयुग संपून हजारो वर्षे लोटली, तरी त्या काळातला बर्फ आजही पृथ्वीवर टिकून आहे, असे एका नव्या संशोधनातून दिसून आले आहे. तिबेटच्या ‘गुलिया’ पठारावरील बर्फाच्या टोपीत (आइस कॅप) शेवटच्या हिमयुगातील बर्फाचे अवशेष जपले गेले असल्याचे आढळले आहे. यामुळे पृथ्वीच्या हिमनद्यांचा ज्ञात इतिहास एक लाख वर्षांहून अधिक मागे गेला असून, या प्रदेशातून आतापर्यंत मिळालेले हे सर्वात जुने बर्फाचे नमुने ठरले आहेत.
बर्फ म्हणजे हवामानाची डायरी
झाडाच्या खोडावरील वर्तुळांप्रमाणे बर्फाच्या थरांमध्येही त्या त्या काळातील हवामानाच्या नोंदी गोठलेल्या असतात. शास्त्रज्ञ खोलवर ड्रिल करून बर्फाचे लांब दंडगोल (आइस कोअर) बाहेर काढतात आणि त्यांचा अभ्यास करतात. पण त्यातील माहिती नीट उलगडण्यासाठी तो बर्फ नेमका किती जुना आहे, हे अचूक माहीत असणे गरजेचे असते.
२३ वर्षांच्या अंतराने तोच ठसा
संशोधकांनी गुलिया पठारावरून १९९२ आणि २०१५ मध्ये काढलेल्या बर्फाच्या नमुन्यांची तुलना केली. दोन्हींमध्ये आॅक्सिजनच्या समस्थानिकांचे (आयसोटोप्स) नमुने सारखेच आढळले. म्हणजे बर्फात साठलेल्या नोंदी विश्वासार्ह आहेत. पाव शतकानंतरही तीच नोंद मिळणे, यावरून बर्फाचे वर्तन काळानुसार कसे राहिले हे समजते, असे या अभ्यासाचे प्रमुख प्रा. लॉनी थॉम्पसन सांगतात. ते ओहायो स्टेट विद्यापीठाच्या ‘बर्ड पोलर रिसर्च सेंटर’मध्ये वरिष्ठ संशोधक आहेत.
वय कसे ठरवले?
बर्फाचे खरे वय शोधण्यासाठी संशोधकांनी बेरिलियम आणि क्लोरीन या दोन किरणोत्सारी घटकांचा वापर केला. सुमारे ४१ हजार वर्षांपूर्वी पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात मोठा उलटफेर झाला होता (‘लाशां घटना’). त्याचा रासायनिक ठसा बर्फात उमटला आहे, आणि या घटकांच्या मदतीने तो ठसा ओळखण्यात आला. त्यानंतर जवळच्या तिबेटी गुहांमधील नोंदींशी तुलना केल्यावर, गुलियाचा बर्फ १ लाख २८ हजार वर्षांहूनही जुना असू शकतो, असा अंदाज मांडला गेला. शिवाय, हिमनदीच्या कडेजवळील बर्फ सुमारे २४ हजार वर्षे जुना असल्याचे आढळले. शेवटचे हिमयुग सुमारे ११,७०० वर्षांपूर्वी संपले, त्यामुळे हा हिमयुगातीलच बर्फ असल्याचे सिद्ध होते.
गुलिया इतका खास का?
ध्रुवीय प्रदेश सोडले, तर पर्वतशिखरांवरून इतक्या जुन्या काळापर्यंत जाणारा हा एकमेव बर्फाचा नमुना आहे, असे थॉम्पसन यांनी सांगितले. दक्षिण अमेरिकेतील हुआस्कारान पर्वतावरील नोंदी फक्त ३० हजार वर्षांपर्यंतच मागे जातात. गुलियाच्या विशिष्ट भूरचनेमुळे इतका जुना बर्फ टिकून राहिला असावा.
जुना समज बदलला
याआधीच्या अभ्यासांनुसार गुलियाचा बर्फ सुमारे १२ हजार वर्षांपूर्वी सुरू झालेल्या ‘होलोसीन’ काळापुरताच मर्यादित असल्याचे मानले जात होते. नव्या पुराव्यांनी ही शंका दूर केली. तिबेटमध्ये फक्त होलोसीन काळातलाच बर्फ असता, तर हिमयुगातील मोठे बर्फाचे थर त्यापुढे टिकले नाहीत असा अर्थ झाला असता; पण पुरावे सांगतात की ते टिकले, असे थॉम्पसन म्हणतात.
हे संशोधन ३० सप्टेंबर २०२६ रोजी ‘सायन्स अॅडव्हान्सेस’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले. अमेरिका, स्वित्झर्लंड आणि चीनमधील संशोधकांनी यात सहभाग घेतला असून अमेरिकेच्या राष्ट्रीय विज्ञान प्रतिष्ठानने (एनएसएफ) निधी दिला होता.
Read About : Tibet Mega Dam – ब्रह्मपुत्रेवरील चीनच्या महाधरणामुळे भारत-बांगलादेशला पुराचा धोका?
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.