Ad Advertisement Ad Advertisement

Maharashtra Legislative Council Election Results – दिसतंय जसं; समजतंय तसं…

Maharashtra Legislative Council Election Results : खरं तर आपल्या देशात एखाद्या राज्यात विधान परिषदेच्या निवडणुका या केव्हा होऊन जातात, याचा थांगपत्ता शेजारच्या राज्यालाही लागत नाही. पण, गेल्या आठवड्यात काही राज्यांत झालेल्या या निवडणुकांचे पडसाद थेट देशभरात उमटले! त्याची कारणं अनेक आहेत. त्यावर दूरवरून दृष्टिक्षेप टाकण्याचा हा एक प्रयत्न. अर्थातच कोणत्याही टीकेविना.

या निवडणुकांत दारूण पराभव हा काँग्रेसचा झाला. काँग्रेसनं लढवलेल्या दोन डझनाहून अधिक जागांपैकी या पक्षाला केवळ एकाच जागेवर विजय संपादन करता आला. पण, नेमकी काँग्रेसनं ही बाजी मारली होती ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असलेल्या नागपूरात. शिवाय, नागपूर हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसंच केंद्रात मंत्री असलेले भारतीय जनता पक्षाचे एक बलदंड नेते नितीन गडकरी यांचा बालेकिल्ला; त्यामुळे नागपूरात झालेला हा पराभव हा भाजपच्या नाकाला मिरच्या झोंबणारा ठरला. मात्र, या विजयात काँग्रेसचं स्वत:चं म्हणून श्रेय काहीच नव्हतं. मतमोजणीच्या पहिल्या फेरीत कोणताही उमेदवार ‘कोटा’ पूर्ण करू शकला नाही, त्यामुळे दुसऱ्या पसंतीची मतं मोजावी लागली. त्या मतांच्या जोरावर अभिजित वंजारी हे काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले! देशभरातून वंजारी हे काँग्रेसचे एकमेव उमेदवार निवडून आले. अगदी काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकातही काँग्रेसचा एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही. मग भाजपनं आनंदोत्सव साजरा केला नसता तरच नवल.

पण, या आनंदोत्सवात खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघात मात्र भाजप उमेदवाराला अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीच्या उमेदवारानं धूळ चारली. मोदी तसंच भाजप यांनी त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करणं हे मग स्वाभाविकच म्हणावं लागेल.
पण, भाजपच्या नेतृत्वाखालील ‘महायुती’ किंवा एकनाथ शिंदे यांच्या भाषेत ‘महाशक्ती’ची अवस्था महाराष्ट्रात फारच केविलवाणी झाली. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या पाच जागा होत्या. त्या पाचही जागा आपण म्हणजेच ‘महायुती’ जिंकणार, अशा गर्जना सत्ताधारी महायुतीचे नेते करत होते. पण, प्रत्यक्षात त्या युतीतील सुंदोपसुंदी ही तिकीट वाटपाच्या वेळेपासूनच सुरू झाली होती. पुण्यात तर हातघाईवर येण्यापर्यंत प्रकरण गेले होते, अन्यत्रही फार काही वेगळी स्थिती नव्हती.

विधान परिषदेच्या महाराष्ट्रातील या निवडणुकीस आणखी दोन पदर ऐन निवडणुकीच्या तोंडावरच प्राप्त झाले. गोकूळ हा पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठेचा दूध संघ. या संघाच्या निवडणुकीत महायुतीचे बडे नेते जातीनं उतरले होते. पण, काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी एकहाती ही निवडणूक जिंकली, त्यामुळे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात आपण या तथाकथित महाशक्तीला हरवू शकतो असं वातावरण तयार झालं. हा झाला एक पदर. दुसरा पदर या निवडणुकीस प्राप्त झाला तो मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी जाहीर केलेल्या एका ऑडिओ टेपमुळे. या टेपमध्ये एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि लोकसभा सदस्य श्रीकांत यांच्या ५०० कोटींच्या कथित व्यवहाराच्या उल्लेखामुळे; त्यामुळे महाराष्ट्रात चॅनेलवाल्यांनी एकच गदारोळ माजवून दिला.

या पार्श्वभूमीवर झालेल्या निवडणुकीत महाशक्तीचे अवघे दोनच उमेदवार विजयी झाले. खरी लॉटरी लागली ती शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला. अत्यंत अनपेक्षितपणे या पक्षाचे दोन उमेदवार विधान परिषदेत जाऊन पोचले! तिसरा उमेदवार हा अर्थातच काँग्रेसचा आहे. मात्र, या नंतर बहुतेक सर्वच पक्षांचे नेते हे आपापल्या पक्षाला आत्मपरीक्षणाचा सल्ला देऊ लागले आहेत. ही अर्थात पश्चातबुद्धी आहे. महायुतीचे पाचही उमेदवार निवडून आले असते, तर आत्मपरीक्षणपर चिंतन बैठका आयोजित करण्याची वेळ ही महाविकास आघाडीवर आली असती हे उघड आहे. खरं तर महायुतीत जसा बेबनाव होता, तशीच बेदिली ही महाविकास आघाडीतही होती.

या आघाडीनेही जरा समन्वय साधला असता, उद्धव ठाकरे यांनी काही लवचिक भूमिका घेतली असती तर कदाचित महाविकास आघाडीचा आणखी एखादा उमेदवार निवडून येऊ शकला असता. हा विजय महाविकास आघाडीने बॅलेट पेपरवरील मतदानातून मिळवला आहे. हे या निवडणुकीचं आणखी एक वैशिष्ट्य. मात्र, त्या पलीकडले काही प्रश्न या निवडणुकीतील राजकीय रणधुमाळी तसंच त्यानंतर सत्ताधारी महायुतीत सुरू झालेला कलगीतुरा यामुळे उपस्थित झाले आहेत. त्यापैकी मुख्य प्रश्न आहे तो म्हणजे राजकीय पक्षांनी विधान परिषदेच्या निवडणुकांत इतक्या हिरिरीने सहभागी व्हावे का? खरं तर विधान परिषद निर्माण करण्यामागील मुख्य उद्देश हा राजकारणात नसलेले विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ विधिमंडळात यावेत हा होता, त्यामुळे विधिमंडळाचा बौद्धिक दर्जा उंचावेल अशी अपेक्षा घटनाकारांच्या मनात होती. प्रत्यक्षात गेल्या दोन दशकांत विपरित घडलं आणि राजकीय पक्ष या निवडणुका ‘हायजॅक’ करून मोकळे झाले. त्याची साक्ष या निवडणुकीत झालेल्या पैसेवाटपाच्या आरोपांनी मिळालीच आहे. खरं तर ज्येष्ठ राजकीय नेत्यांनी याचा गांभीर्यानं विचार करायला हवा.

या निकालांमुळे आता लगोलग राज्यातील राजकीय रंगमंचावरील वातावरण पालटेल असा समज निर्माण होऊ शकतो, पण त्यात फारसं तथ्य नाही. हा जनमनाचा कानोसा आहे का हे पडताळून बघावं लागेल. पण एक मात्र नक्की, या निकालांमुळे विरोधी पक्षांना पुढील लढ्यासाठी ऊर्जा मिळाली आहे आणि सत्ताधारी महायुतीतील आरोप प्रत्यारोपांमुळे महायुतीत सारेच काही आलबेल नाही, याची साक्ष मिळाली आहे.

प्रकाश अकोलकर
संपर्क : ९८९२७२७७००

Read About : El Nino Effects on India : एल-निनोचे ‘तापदायक’ प्रताप…
E-Paper: Punyanagari E-Paperस्पेशल फीचर

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.