Maratha Conquest of Attock : एप्रिल १७५८ मध्ये मराठे चिनाबपर्यंत पोहोचले होते आणि तेथे त्यांनी जहाँखान आणि तैमुरशाह यांचा पराभव करून अनेक अफगाण सैनिक कैद केले होते. इकडे लाहोरमध्ये अफगाण सत्ता उखडली गेल्याच्या आनंदात श्रीमंत रघुनाथराव पेशव्यांसाठी भव्य दीपोत्सव साजरा होत होता, इथपर्यंतचा भाग आपण पाहिलेला आहे.
भाग-3
चिनाब नदीशी काही काळ थबकलेल्या मराठा घोडदळाने आता जोर केला. मानाजी पायगुडे, साबाजी शिंदे आणि तुकोजी होळकर यांनी सड्या फौजेनिशी चिनाब ओलांडून अटकेच्या ठाण्यावर धडक मारली आणि २८ एप्रिल १७५८ रोजी अटकेचा किल्ला काबीज केला. तुकोजीराव होळकर आणि साबाजी शिंदे यांनी याहीपुढे मजल मारून मे १७५८ च्या सुरुवातीसच पेशावरवरती मराठ्यांचा जरीपटका फडकावला. अटकेच्या ठाण्यावर नरसोजी पंडित आणि मुलतानच्या सुभ्यावर बापूजी त्रिंबक या दोघांची नेमणूक करण्यात आली. मराठ्यांची वीस हजार फौज पंजाबच्या बंदोबस्तासाठी ठेवण्यात आली.
मराठा सत्तेच्या इतिहासात अटक-पेशावरपर्यंत मजल मारून एवढ्या दूरवरची ठाणी, अनोळखी मुलुखात घोडदौड करून जिंकून घेणे हा सर्वोच्च उच्चांक होता. महाराष्ट्रातील भीमथडीच्या घोड्यांनी सिंधू नदी ओलांडून काबूलपासून अवघ्या दीडशे मैलांवर धडक मारली होती. एवढे जबरदस्त यश एवढ्या झपाट्याने मिळवल्याने अफगाणांची सत्ता पंजाबमधून हद्दपार झाली होती आणि शीख, मराठे आणि मुघलांचा प्रतिनिधी म्हणून आदिनाबेग या तिघांचा अंमल इथे बसलेला होता. अब्दालीचा पुतण्या अब्दुर्रहमान आणि मराठ्यांच्या कैदेत यापूर्वी पडलेला अबुस्समदखान हे दोघे महत्त्वाचे मोहरे आता मराठ्यांचे अंकित होते. अब्दुर्रहमान याने अब्दालीविरुद्ध बंड पुकारून थेट पुणे गाठले होते व मदतीची याचना केली होती. नानासाहेब पेशव्यांनी त्याला दादासाहेबांकडे, लाहोरला पाठवले होते. या दोघांना अटकेपलीकडे ठेवावे म्हणजे हे दोघेही अब्दालीचा मुकाबला करून त्याला हिंदुस्तानातून बाहेरच ठेवतील असे राजकारण ठरत होते.
४ मे १७५८ रोजी लिहिलेल्या पत्रात रघुनाथराव लिहितात, ‘(अब्दालीचा) पुतण्या व दौलतेचा वारस स्वामींपाशी देशास आला तो स्वामींनी आम्हांकडे पाठविला होता. त्यास अटकेअलीकडे थोडीशी जागा बसावयास देऊन अटकेपलीकडे काबुल पिशावरचे सुभे देऊ. अब्दालीच्या फौजेवर अबुस्समदखान सरहिंदेत होता, तो सरकारात पाडाव आहे. तो आणि आणखी या प्रांतीची फौज, इराणी, मोगल देऊन मशारनिल्हेची रवानगी करतो. ते तिकडील पैरवी करतील, स्वामींचे पुण्यप्रतापें अब्दालीस जोरा पोचवून तंबी करतील, पारिपत्य उत्तम प्रकारे करून अटकेपार अंमल बसवितील.’ याचसुमारास इराणच्या शहाची पत्रेही रघुनाथराव व सुभेदार होळकरांना आली होती की, आम्ही आणि तुम्ही मिळून अब्दालीचे पारिपत्य करावे आणि इराण आणि हिंदुस्थान यांची सरहद्द अटक ही ठरवावी; परंतु रघुनाथराव त्यांच्या पत्रात म्हणतात, ‘काबुल व कंधार हे अटकेपारचे सुभे हिंदुस्थानकडे अकबरापासून आलमगिरापावेतो होते, ते आम्ही विलायतेत का द्यावे?’
अटकेच्या मोहिमेचा विचार करताना हा मुद्दा लक्षात घ्यायला हवा. कंदाहारपर्यंत धडक मारण्याची आकांक्षा मराठ्यांच्या मनात होती, तरी या प्रसंगी ती प्रत्यक्षात येणे अवघड होते. एवढ्या लांब ठाणी बसवून, छावणी करून, फौज उभी करून कारभार चालवण्याइतकी आर्थिक स्थितीही भरभक्कम नव्हती. महाराष्ट्रातून हजारो मैल लांबच्या मुलुखात शासन चालवणे हेही व्यवहार्य नव्हते. असे असले तरी अकबराच्या काळापासून हिंदुस्थानचा प्रदेश कुठवर होता आणि त्या प्रदेशात इराणी-अफगाणी सत्तेची मुळे रुजू देणे योग्य नाही याची जाणीव त्याकाळी मराठ्यांना होती, हे लक्षात घ्यावे लागेल. या स्थितीत व्यवहार्य मार्ग असा होता की, या पूर्ण मुलुखात जेवढे जमेल तेवढे शासन उभे करून घ्यावे, पंजाबच्या सुपीक प्रदेशातून अर्थप्राप्ती करून घ्यावी आणि अब्दाली परत आला तर त्याला प्रतिकार होईल अशी व्यवस्था लावून घ्यावी. या अनोळखी प्रदेशात खुद्द आपणच शासन गाजवण्यापेक्षा आपला प्रतिनिधी नेमून कारभाराची घडी बसवायचा प्रयत्न करावा.
असे असल्याने मराठ्यांच्या वतीने आदिनाबेग याने कारभार बघावा आणि त्याबद्दल दरसाल पंचाहत्तर लक्ष रुपये मराठ्यांना द्यावेत असा करार ठरला. आदिनाबेग याने मिर्झाजान खान याला आपला नायब सुभेदार म्हणून जालंदर दोआबात नेमले. १० मे १७५८ रोजी रघुनाथराव लाहोरमधून बाहेर पडून दिल्लीच्या दिशेने निघाले आणि ५ जून रोजी कुरुक्षेत्रात थांबून त्यांनी सोमवती अमावास्येच्या निमित्ताने स्नान-दान इत्यादी विधी पार पाडले.
आदिनाबेगला फार आयुष्य लाभले नाही आणि पंजाबचा सर्वाधिकारी झाल्यानंतर चार महिन्यातच, म्हणजे १५ सप्टेंबर १७५८ रोजी तो मरण पावला. या चार महिन्यांत त्याने शिखांवर दबाव आणण्याचे प्रत्यत्न केल्याने शीख चिडून गेले होते आणि ठिकठिकाणी नाराज शीख सैन्याशी मुघलांच्या चकमकी झडू लागल्या होत्या. मिर्झाजान खान याने आदिनाबेगच्या मृत्यूनंतर शिखांशी मिळतेजुळते घेऊन परिस्थिती आटोक्यात आणली. आदिनाबेग मरण पावल्यानंतर नवीन सुभेदार नेमण्याचा हक्क मराठ्यांचा होता, कारण आदिनाबेग हा त्यांचा प्रतिनिधी म्हणून कामकाज बघत होता. यामुळे ऑक्टोबर १७५८ मध्ये अंताजी माणकेश्वर, तुकोजी होळकर आणि नरसोजी पंडित हे तिघे सरदार परत एकदा पंजाबात प्रवेशले. अंताजी माणकेश्वर यांनी दिल्लीत राहून बादशहावर दबाव आणावा आणि तुकोजी होळकरांनी पंजाबमध्ये जाऊन तिथे माजलेल्या गोंधळावर नियंत्रण आणावे अशी मोहीम ठरली.
पुढे काय झाले? अटकेच्या मोहिमेचे सरदेसाई, राजवाडे, शेजवलकर यांसारख्या इतिहासकारांनी कसे विश्लेषण केले आहे हे आपण पुढील भागात बघू.
संदर्भ : G. Singh (1959)- Ahmad Shah Durrani: Father of Modern Afghanistan. Bombay: Asia Publishing House. मराठी रियासत- खंड ६- गो. स. सरदेसाई
अश्विन पुंडलिक
ashwin3009@gmail.com
Read About : India Poverty Reduction – तो सोन्याचा दिन येवो…
E-Paper : Punyanagari E-Paperस्पेशल फीचर


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.