Ad Advertisement Ad Advertisement

Ashti truck accident – 500 फूट खोल दरीत कोसळलेल्या ट्रकने घेतला पेट; चालकाचा दुर्देवी अंत

​ब्रह्मगाव येथील शृंगेरी घाटातील घटना

Ashti truck accident आष्टी : आष्टी शहरापासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या ब्रह्मगाव येथील शृंगेरी घाटात ऊस वाहतूक करणारा ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने तब्बल ५०० फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला. दरीत कोसळल्यानंतर ट्रकला अचानक आग लागल्याने संपूर्ण ट्रक जळून खाक झाला. या भीषण दुर्घटनेत तरुण ट्रकचालक सागर सोमनाथ इंदलकर (वय २३, रा.ब्रम्हगाव) यांचा जळून अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे आष्टी व ब्रह्मगाव परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

ब्रह्मगाव येथून ऊस भरण्यासाठी जाणारा ट्रक चालक सागर इंदलकर घेऊन मुगगावाकडे जात होते.सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्यांचा ट्रक शृंगेरी घाटाच्या माथ्यावर पोहोचला असता अचानक चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. यामुळे ट्रक मागील बाजूने (रिव्हर्स) थेट ५०० ते ६०० फूट खोल दरीत कोसळला. दरीत पडताच ट्रकमध्ये आग लागली आणि काही क्षणातच आगीने रौद्ररुप धारण केले. आगीच्या तीव्र ज्वाळांमुळे ट्रकासोबतच डोंगरावरील झाडाझुडपांनाही वेढा घातल्याने संपूर्ण डोंगराला आग लागली.

अवशेष डीएनए चाचणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी व गावकऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला अपघातग्रस्त ठिकाणी चालकाचा मोबाईल व काही वस्तू आढळल्या, परंतु आगीच्या तीव्रतेमुळे चालकाचा शोध घेणे कठीण झाले होते. दुसऱ्या दिवशी पोलीस व वनविभागाच्या संयुक्त पथकाने दरीच्या खोल भागात शोध मोहीम राबवली असता, चालकाचे जळालेले अवशेष व जळालेली कबीन सापडली. हे अवशेष डीएनए चाचणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत.

घटनास्थळी शोधमोहीम व अग्निशामक दलाची कारवाई

​डोंगराला लागलेली शृंगेरी आग विझवण्यासाठी आष्टी नगर पंचायतीच्या अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले. या भीषण अपघातामुळे घाट परिसरात भीतीचे व तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, एका तरुण चालकाचा अशा प्रकारे अघटित अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.अपघाताचे नेमके कारण काय, वाहनावरील नियंत्रण कसे सुटले याबाबत पोलीस प्रशासनाकडून अधिक तपास सुरू आहे.

Read About: Shraddha Kapoor Eetha Trailer – ‘नाचता नाचता मरेन, पण इतिहास घडवून जाईन’

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.