बीडच्या भूमाफियांचा संभाजीनगरात डल्ला : बोगस मालकासह बनावट आधारकार्ड बनवणारा गजाआड
छत्रपती संभाजीनगर : Beed Land Mafia Gang in CSN बीडच्या भूमाफियांच्या टोळीने संभाजीनगरातील पडेगाव-मिटमिट्यातील मुंबई महामार्गालगत असलेली दीड एकर (६० गुंठे) मोक्याची जमीन हडपल्याचा प्रकार समोर आला. धक्कादायक म्हणजे, या टोळीने तेथे बुलडोझर चालवित झाडांची कत्तल केली. स्वत:च्या नावाचा फलक लावून चक्क १४ कोटी रुपयांत परस्पर सौदा केला आणि इसारपावती करून देत तब्बल ६५ लाख रुपये उकळले. या प्रकरणी ३ नोव्हेंबरला छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ४ नोव्हेंबरला पोलिसांनी बोगस मालकासह त्याचे आधारकार्ड बनवून देणाऱ्याला बीडमधून बेड्या ठोकल्या आहेत.
बोगस मालक शेख हुसेन शेख मोहंमद फरदुस ऊर्फ शब्बीस गुलाम अब्बास युसुफ (८१, रा. सादोळा, ता. माजलगाव, जि. बीड) आणि बनावट आधारकार्ड बनवणारा इलियास फारुकी अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांनाही गुरुवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. तर या गुन्ह्यातील के. के. खान (रा. छत्रपती संभाजीनगर) आणि पठाण अन्वरखान जहीर खान (५२, रा. सय्यदनगर, पांगरी रोड, बीड) या दोघांचा शोध सुरु आहे. अल्पना सतीष मुंदडा (५९, रा. न्यू एसबीएच कॉलनी, ज्योतीनगर) या फिर्यादी असून त्या ब्युटीशियन आहेत. त्यांना त्यांचे भाऊ अमर काबरे यांनी २०२४ मध्ये मिटमिटा येथील गट क्र. १०९ मधील ६० गुंठे (दीड एकर) शेतजमीन बक्षीसपत्राने दिली होती. चार-पाच महिन्यांपूर्वी मुंबई हायवे रुंदीकरणात या शेताचे समोरील सिमेंट कंपाउंड तुटले. हीच संधी साधत के. के. खान याने ‘या जमिनीचे मालक व कब्जेदार के. के. खान आहेत’ असा फलक स्वत:च्या मोबाईल क्रमांकासह लावला. त्यानंतर ३० ऑक्टोबरला शेतात घुसून २० ते २५ वर्षे जुनी झाडे तोडली आणि बुलडोझर फिरवून जमीन सपाट केली आणि त्यावर कब्जा केला होता.
नागरिकांनी पोलिसांत तक्रार करावी
बीडच्या भूमाफियांच्या या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला. त्यांच्याविरुद्ध एक गुन्हा दाखल आहे. मात्र, या टोळीने अशाच प्रकारे आणखी कोणाची फसवणूक केली असल्यास नागरिकांनी छावणी पोलीस ठाण्यात तक्रार करावी, असे आवाहन ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक विवेक जाधव यांनी केले आहे.
असा रचला कागदोपत्री खेळ!
मुंदडा यांनी या प्रकरणाची खोलात जाऊन माहिती घेतली असता भूमाफियांचे बीड कनेक्शन समोर आले. माजलगाव तालुक्यातील शब्बीस युसुफ याने शेख हुसेन शेख महम्मद करदुस यांच्या आधार क्रमांकाचा वापर करून खोटे आधारकार्ड बनवले. मुंदडा यांच्या जमिनीचीच चर्तु:सीमा टाकून ही जमीन स्वत:ची असल्याचे भासवले आणि १६ सप्टेंबर २०२६ रोजी बीडचा व्यापारी पठाण अन्वरखान याला कायमस्वरूपी विक्री करण्यासाठी इसारपावती करून दिली. त्यावर अन्वरखान याने हीच जमीन अमजद खान सईद खान पठाण याला विकण्यासाठी चक्क एका वृत्तपत्रात जाहीर प्रगटनही दिले होते. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.
रेकी करून जमिनी लाटण्याची ‘मोडस ऑपरेंडी’!
१) महामार्गालगतच्या किंवा मोक्याच्या रिकाम्या जागांची आधी रेकी करून ती जमीन हेरायची.
२) त्या जागेवर रातोरात स्वत:च्या नावाचा आणि मोबाईल क्रमांकाचा मालकी दर्शवणारा फलक लावायचा.
३) विक्रीसाठी ग्राहक मिळाल्यावर त्याला प्रत्यक्षात तीच जमीन दाखवून विश्वास संपादन करायचा.
४) बोगस जीपीए (कुलमुखत्यारपत्र) आणि बनावट आधारकार्ड बनवून कोट्यवधी रुपयांत व्यवहार ठरवायचा.
५) खरेदीदाराकडून इसारपावतीच्या नावाखाली लाखो रुपये उकळायचे. खरेदीखत करून देण्याच्या आमिषाने दिवस पुढे ढकलायचे, अशी या टोळीची कार्यपद्धती असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक विवेक जाधव यांनी सांगितले.
Read About : Samruddhi Expressway robbery ‘समृद्धी’वर भरदिवसा दरोडा; बंदुकीचा धाक दाखवून अभियंत्याला लुटले -2026
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.