Ad Advertisement Ad Advertisement

Cultivated Meat – प्रयोगशाळेत तयार होणारे मांस पशुपालनाची जागा घेणार?

प्राण्यांची कत्तल थांबविण्यासाठी ‘कल्टीव्हेटेड मीट’ तंत्रज्ञानाचा पर्याय

नवी दिल्ली : Cultivated Meat – मांस खाण्यासाठी प्राण्यांची कत्तल करण्याची गरजच भासणार नाही, अशी कल्पना आता प्रत्यक्षात येत आहे. वैज्ञानिक प्रयोगशाळेत प्राण्यांच्या पेशींपासून मांस तयार करत आहेत. या तंत्रज्ञानाला ‘कल्टिवेटेड मीट’ किंवा प्रयोगशाळेत तयार केलेले मांस म्हणतात. मात्र, हे मांस भविष्यात पारंपरिक पशुपालनाची जागा घेऊ शकेल का, हा प्रश्न कायम आहे.

प्रयोगशाळेत मांस कसे तयार होते?

या प्रक्रियेत प्राण्यांच्या शरीरातून काही पेशी घेतल्या जातात. त्यानंतर त्या पेशी विशेष पोषक द्रव्यांच्या मदतीने मोठ्या टाक्यांमध्ये वाढवल्या जातात. काही आठवड्यांत त्यापासून मांस तयार होऊ शकते. योग्य पेशींचा साठा तयार झाल्यानंतर प्रत्येक वेळी प्राण्यांकडून नवीन पेशी घेण्याची गरजही भासत नाही.

२०१३ मध्ये नेदरलँड्समधील मास्ट्रख्टि विद्यापीठाचे संशोधक मार्क पोस्ट यांनी प्रयोगशाळेत तयार केलेल्या मांसापासून बनवलेले बर्गर जगासमोर सादर केले. २०२० मध्ये सिंगापूरने अशा मांसाच्या विक्रीला प्रथम परवानगी दिली. त्यानंतर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि इस्रायलमध्येही काही उत्पादनांना मंजुरी मिळाली.

भारतातही संशोधन सुरू

२०२५ मधील आकडेवारीनुसार, जगभरात १४२ कंपन्या प्रयोगशाळेत मांस आणि समुद्री खाद्य तयार करण्यावर काम करत आहेत. भारतातही सहा कंपन्या चिकन आणि शेळीच्या मांसावर संशोधन करत आहेत. केंद्र सरकारच्या ‘बायोई३’ धोरणातूनही या क्षेत्राला प्रोत्साहन दिले जात आहे.

खर्च आणि पर्यावरणाचे आव्हान

मात्र, हे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर वापरणे अजून शक्य झालेले नाही. पेशी वाढवण्यासाठी लागणारी पोषक द्रव्ये आणि मोठ्या यंत्रणांचा खर्च खूप जास्त आहे. तसेच प्रयोगशाळेतील तापमान आणि स्वच्छता राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात ऊर्जेची गरज असते.

या मांसामुळे जमीन आणि पाण्याचा वापर कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, वीज निर्मितीसाठी जीवाश्म इंधन वापरले जात असेल, तर प्रदूषण वाढू शकते. त्यामुळे हे मांस पारंपरिक मांसापेक्षा पर्यावरणासाठी नेहमीच चांगले असेल, असे ठामपणे सांगता येत नाही.

पशुपालनातून जगभरातील कोट्यवधी लोकांना रोजगार आणि उत्पन्न मिळते. त्यामुळे प्रयोगशाळेत तयार होणारे मांस लोकप्रिय झाले, तरी पारंपरिक पशुपालनाची जागा घेण्यासाठी त्याला मोठा पल्ला गाठावा लागणार आहे.

Read About: Lycurgus Cup Roman Glass : प्रकाशानुसार हिरवीची लाल होते काच, 1,600 वर्षांपूर्वीच्या रोमन काचेचे रहस्य उलगडले!
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.