Ad Advertisement Ad Advertisement

Mars Atmosphere Research – मंगळाचे वातावरण कसे नष्ट झाले, याचा उलगडा होणार

नासाचे दोन उपग्रह मंगळाच्या दिशेने रवाना

वॉशिंग्टन : Mars Atmosphere Research अमेरिकन अंतराळ संस्था नासाने अंतराळ संशोधनात दोन मोठी पावले उचलली आहेत. पृथ्वीभोवतीची गुरुत्वीय फेरी यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर नासाचे दोन लहान उपग्रह असलेले एस्कॅपेड हे यान आता मंगळ ग्रहाच्या दिशेने मार्गस्थ झाले आहे. यासोबतच, चंद्रावर कायमस्वरूपी मानवी तळ उभारण्यासाठी नासाने नवीन वाहतूक आणि विज्ञान प्रकल्पांची अधिकृत घोषणा केली आहे.

मंगळाच्या वातावरणाचा उलगडा होणार

एस्कॅपेड मोहिमेत ब्लू आणि गोल्ड या नावाच्या दोन जुळ्या उपग्रहांचा समावेश आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये प्रक्षेपित झाल्यानंतर ही याने पृथ्वीच्या जवळ एका विशिष्ट कक्षेत कार्यरत होती. नुकतीच या दोन्ही उपग्रहांनी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा वापर करत इंजिन प्रज्वलित केले आणि मंगळाच्या दिशेने यशस्वी झेप घेतली. मंगळावर जाण्यासाठी पृथ्वीच्या गुरुत्वीय शक्तीचा असा वापर नासाने पहिल्यांदाच केला आहे. ही दोन्ही याने सप्टेंबर २०२७ मध्ये मंगळाच्या कक्षेत पोहोचतील. तेथे ती सौर वारे आणि मंगळाच्या चुंबकीय क्षेत्राचा अभ्यास करून मंगळाचे वातावरण कसे नष्ट झाले, याचा शोध घेतील.

चंद्रावरील मानवी तळासाठी नवी यंत्रणा

दुसरीकडे, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर मानवी वस्ती आणि संशोधन तळ उभारण्याच्या दिशेने नासाने वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. या अंतर्गत प्रॉमिस नावाच्या अणुऊर्जेवर चालणाऱ्या रोव्हरच्या निर्मितीला चालना देण्यात आली आहे, जो चंद्रावरील अंधाऱ्या भागांत जाऊन बर्फ आणि खनिजांचा शोध घेईल. तसेच, पृथ्वीवरून चंद्रावर अवजड साहित्य व उपकरणे नेण्यासाठी व्यावसायिक लँडर्स आणि ऑर्बिटल ट्रान्सफर व्हेइकल्ससाठी खासगी कंपन्यांना नवीन कंत्राटे देण्यात आली आहेत. याशिवाय चंद्रावर अखंडित वीज आणि दळणवळण यंत्रणा उभारण्यासाठी सौर ऊर्जा मनोरेही विकसित केले जाणार आहेत. नासाच्या या दुहेरी यशामुळे भविष्यातील मानवी अंतराळ मोहिमांना मोठी गती मिळणार आहे.

Read About : Nuclear Explosion Asteroid Deflection – अणुस्फोट लघुग्रहाच्या धडकेपासून पृथ्वीला वाचवू शकतो, पण…
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.