नेपाळपासून आपण धडा शिकणार का? क्षणात होत्याचे नव्हते होणे म्हणजे काय याचा अनुभव निसर्ग आपल्याला अधूनमधून देत असतो. निसर्ग कूस बदलतो तेव्हा होणारी उलथापालथ ही मानवासाठी नेहमीच संहारक, प्रलयंकारी आणि विदारक असते, तरीही आपण धडा घेत नाही, पूर्वानुभवातून काही बोध घेत नाही, शिकत नाही. पुढच्या आपत्तीपर्यंत आपण तसेच चुकीचे वागणे सुरू ठेवतो. मानव खुळा आहे हे निसर्गाला पुन्हा पुन्हा दाखवून देतो. तिबेटला लागून असलेल्या मध्य नेपाळमधील दोन जिल्ह्यांत बुधवारी अचानक आलेला महापूर आणि नंतरचा जलविध्वंस यातून याचेच प्रत्यंतर पुन्हा एकदा समोर आले आहे. ३००हून अधिक बळी घेणाऱ्या या विध्वंसाने केवळ नेपाळचीच नव्हे तर भारताचीही हानी झाली आहे. या महापुरात बेपत्ता झालेल्या ८०१ जणांपैकी १३५ जण भारतीय आहेत. हिमालयातील निसर्ग आणि पर्यावरणाच्या संतुलनाची मानवाने योग्य ती काळजी न घेतल्यामुळेच या संकटाचे रूपांतर भीषण हानीत झाले आहे असे म्हणावे लागेल.
२७ ऑगस्टच्या बुधवारी नेपाळ-तिबेट सीमेवरील रसुवा जिल्ह्यातील टिमुरे आणि स्याफ्रुबेसीच्या बाजारात सकाळी ९ च्या सुमारास नेहमीची लगबग सुरू असताना पाण्याचे अफाट लोंढे सोबत चिखल, दगडमाती, बर्फ, झाडे घेऊन डोंगरदऱ्या फोडत, इमारती भिरकावून देत चालून आले. त्या वेळी याच परिसरातील इमिग्रेशन सेंटरमध्ये कैलास-मानसरोवर यात्रेला निघालेले भारतीय यात्रेकरू, कस्टमचे कर्मचारी, जलविद्युत प्रकल्पावर काम करणारे कामगार अशी सर्वांची वर्दळ होती. अचानक ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यागत गडगडाट झाला. हा आवाज होता तिबेटच्या बाजूने कोसळणाऱ्या हिमकड्याचा आणि त्यानंतर डोंगरांतून वाट फोडत, फुसांडत आलेल्या या पाण्याच्या लोंढ्यांमुळे इमिग्रेशन सेंटरसह सर्व काही क्षणांत नाहिसे झाले. भोटेकोशी नदीने रौद्ररूप धारण केले. या विध्वंसाची आकडेवारी हादरवणारी आहे – आतापर्यंत ३०० मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, ८०० हून अधिक लोक अजूनही बेपत्ता आहेत, त्यापैकी १३० भारतीय आहेत, ज्यात बहुतेक कैलास यात्रेकरू आहेत. काही मृतदेह तर १५० किमी खाली चितवनपर्यंत वाहत गेले आहेत. नदीकाठावरील गावे नष्ट झाली आहेत, मैत्री पुलासह १२ छोटेमोठे पूल वाहून गेले आहेत. लांगटांग खोला हायड्रोपॉवरसारखे काही प्रकल्प गायब झाले आहेत.
हा अपघात नाही, हा निसर्गाने पुन्हा दिलेला इशारा आहे. तिबेटमधील हिमस्खलनामुळे प्रारंभी भूकंपाचा अंदाज आला होता. पण, हा भूकंप नव्हताच तर ५.२ तीव्रतेचा हिमकडा कोसळण्याचा आघात होता. काठमांडू विद्यापिठातील एका अभ्यासकाच्या मते, नेपाळ बाजूकडे कोसळलेल्या हिमकड्याच्या ढिगाऱ्याने ल्हेंडे नदीचे पाणी अडवले गेले. ही नदी भोटेकोशीची उपनदी आहे. पाणी साचत गेले आणि मग तो दाब असह्य झाल्यावर ते धरण फुटले. यालाच शास्त्रीय भाषेत GLOF – Glacial Lake Outburst Flood किंवा हिमस्खलन-जन्य महापूर म्हणतात. गेल्यावर्षीही याच भोटेकोशीत हिमतलाव फुटून पूर आला होता, यंदा हिमकडा कोसळून आला. हिमालय ही जगातील सर्वात तरुण आणि सर्वात नाजूक पर्वतरांग आहे. पण, गेल्या काही दशकांत या हिमालयाला मानवाने वारंवार विद्ध केले आहे. नेपाळ असो वा उत्तराखंड, हिमाचल असो वा आपले जोशीमठ – सगळीकडे एकच पॅटर्न आहे. नदीच्या पात्रात सर्रास बांधकामे सुरू आहेत. भोटेकोशीच्या पात्रातही काही इमारती उभ्या होत्या. पूर आला तेव्हा त्या नाहिशा झाल्या. चीन-नेपाळला जोडणाऱ्या महामार्गासाठी डोंगरांचे कडे तोडले, त्यामुळे माती सैल झाली. जलविद्युत प्रकल्पांचा नको तितका सोसही नेपाळला नडला आहे. आपत्तीग्रस्त रसुवा जिल्ह्यातच असे किमान डझनभर छोटे-मोठे प्रकल्प आहेत. ठिकठिकाणी नदीचे पाणी अडवले गेले आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे हिमालयातील हिमनद्या जागतिक सरासरीपेक्षा दुप्पट वेगाने वितळू लागल्या आहेत हे आणखी एक कारण आहे, त्यामुळे हिमतलाव फुगत आहेत. एकट्या नेपाळ-तिबेट सीमेवर असे २०० पेक्षा जास्त धोकादायक हिमतलाव आहेत असा अभ्यास आहे. हे तलावही भविष्यातील संकटाचा इशारा देणारे आहेत.
नेपाळमध्ये गेल्या २० वर्षांत विकासाच्या नावाखाली हजारो हेक्टर जंगल तोडले गेले. रस्ते बांधण्यासाठी डोंगर फोडले गेले. नदीच्या पात्रात बेकायदेशीर वाळू उपसा झाला. काठमांडू खोऱ्यात तर नैसर्गिक पाणी जिरवणाऱ्या तलावांवरच इमारती उभ्या राहिल्या. जेव्हा निसर्गाला श्वास घ्यायला जागाच ठेवली नाही, तेव्हा तो उसासा टाकणारच – आणि तोच उसासा म्हणजे हा जलप्रलय. हेच चित्र आपण केदारनाथमध्ये २०१३ साली पाहिले, चमोली हिमाचलमध्ये २०२३ साली पाहिले आणि जोशीमठ २०२३ मध्ये खचताना पाहिले. नेपाळचा आजचा प्रलय हा त्या मालिकेतील पुढचा अध्याय आहे. नेपाळचा हा जलप्रलय आपल्यासाठीही धडा आहे. कारण नेपाळमध्ये हाहाकार उडवणारी भोटेकोशी पुढे त्रिशुली होते, त्रिशुली नारायणी होते आणि नारायणी बिहारमध्ये गंडक बनून प्रवेश करते. यासाठीच बिहार आणि उत्तर प्रदेशमधील पूर आणि बचाव यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. हिमालय राजकीय नकाशांबाहेरही आहे. तो अनेक देशांमध्ये विस्तारलेला आहे, म्हणूनच नेपाळमध्ये पूर आला की त्याचा परिणाम खाली बिहारच्या नद्यांवर होतो. उत्तराखंडात ढगफुटी झाली तर त्याचा परिणाम यमुनेच्या पाण्यावर होतो. कारण निसर्गाच्या नकाशात हिमालय एकच आहे. हिमालयातून विकासवाटा काढायच्या तर हिमालय, तिथला निसर्ग समजून घेऊनच पुढे जायला हवे. अन्यथा, दरवर्षी भोटेकोशीसारखी एखादी नदी हाहाकार उडवेल आणि आपण मात्र तीच तीच संतापजनक बेपर्वाई वारंवार दाखवत राहू.
नेपाळपासून आपण धडा शिकणार का?
