नांदेडमधील ४० लाखांच्या पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनांचा प्रयोगशाळा अहवाल धक्कादायक
नांदेड Mercury in Fairness Creams : गोरेपणाच्या मोहापायी वापरल्या जाणाऱ्या सौंदर्यप्रसाधनांमधून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये उघड झाला आहे. इतवारा पोलिसांनी जप्त केलेल्या पाकिस्तानी लेबलच्या सौंदर्यप्रसाधनांच्या शासकीय प्रयोगशाळेतील तपासणीत दोन क्रीममध्ये पाऱ्याचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा हजारो पट अधिक आढळले आहे.
नांदेड शहरातील इतवारा पोलिसांनी दि. ९ जुलै २०२६ रोजी मन्यार गल्ली, बर्फी चौक येथील अफरा कलेक्शन या दुकानावर छापा टाकून ३९ लाख ६९ हजार ९४० रुपयांची सौंदर्यप्रसाधने जप्त केली होती. दुकानचालक मोहम्मद जियाउद्दीन मोहम्मद वाजीद (वय २५) याच्याविरुद्ध इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता प्रयोगशाळेच्या अहवालातून गंभीर बाब समोर आली आहे. सौंदर्यप्रसाधनांमध्ये पाऱ्याची निर्धारित मर्यादा निकषाच्या तुलनेत ही प्रमाणे अत्यंत धोकादायक आहेत. पाऱ्याच्या संपर्कामुळे त्वचा, मूत्रपिंड आणि मज्जासंस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतात.
उत्पादने बाजारात आली कशी?
या क्रीमचा वापर करणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त होत आहे. गोरेपणाच्या जाहिरातींच्या आड आरोग्याशी असा जीवघेणा खेळ सुरू असेल, तर ही उत्पादने बाजारात आली कशी? किती क्रीमची विक्री झाली आणि ती वापरणाऱ्या ग्राहकांची जबाबदारी कोण घेणार? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची गरज आहे. अवैध सौंदर्यप्रसाधनांबाबत माहिती मिळाल्यास नागरिकांनी ०२४६२-२३४७२० किंवा ११२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे पोलिसांनी आवाहन केले आहे.
Read About : Mahadev Betting App Scam- महादेव बेटिंग ॲप घोटाळ्याचा सूत्रधार कोठडीत
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.