महावितरणचे संचालक धनंजय औंढेकर यांचे निर्देश
छत्रपती संभाजीनगर : Mahavitaran Abhay Yojana – वीजपुरवठा कायमस्वरूपी किंवा तात्पुरता खंडित झालेल्या ग्राहकांना थकबाकीमुक्त होण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी महावितरणने ‘अभय योजना’ सुरू केली आहे. या योजनेचे फायदे प्रत्येक पात्र ग्राहकापर्यंत पोहोचवून महसूलवाढीवर भर द्यावा. तसेच ग्राहकांना अचूक वीजबिल आणि दिवसा वीजवापरावरील सवलतीचा लाभ मिळण्यासाठी स्मार्ट मीटर बसवण्याच्या कामाला गती द्यावी, असे स्पष्ट निर्देश महावितरणचे संचालक (संचालन) धनंजय औंढेकर यांनी दिले.
‘मसिआ’च्या श्रीमती रत्नप्रभा बाळासाहेब पवार सभागृहात शनिवारी (१४ नोव्हेंबर) आयोजित छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. अभय योजनेअंतर्गत पात्र ग्राहकांच्या एकूण थकबाकीवरील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार १०० टक्के माफ करण्यात येणार आहे. याशिवाय उर्वरित मूळ थकबाकी एकरकमी भरल्यास त्यामध्ये आणखी २० टक्के सवलत दिली जाणार आहे. तसेच मागणीनुसार तातडीने वीजपुरवठा पुन्हा जोडून दिला जाणार आहे. वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांसाठी थकबाकीमुक्त होण्याची ही सुवर्णसंधी आहे. त्यामुळे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या योजनेचा व्यापक प्रचार-प्रसार करून अधिकाधिक ग्राहकांपर्यंत तिचे फायदे पोहोचवावेत आणि महसूलवाढीसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
ग्राहकांना अचूक वीजबिल मिळावे, यासाठी राज्यभर स्मार्ट मीटर बसवण्याचे काम जोमाने सुरू आहे. घरगुती ग्राहकांना दिवसा वीजवापरासाठी भरघोस सवलतीचा लाभ मिळवून देण्यासाठीही स्मार्ट मीटर आवश्यक आहेत. मराठवाड्यातील काही उपविभागांत स्मार्ट मीटर बसवण्याचे काम उत्कृष्टरीत्या सुरू आहे. मात्र, काही ठिकाणी या कामाचा वेग संथ असल्याबद्दल त्यांनी असमाधान व्यक्त केले. संबंधित एजन्सीच्या सहकार्याने या कामाला गती देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
दैनंदिन कामांचे सूक्ष्म नियोजन करावे
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत कृषी ग्राहकांना दिवसा वीजपुरवठा करण्याचे नियोजन, एसडीटी कार्यान्वित करणे, कॅपॅसिटर बँक, सिंगल फेज वीजपुरवठा, विद्युत रोहित्रांची देखभाल व दुरुस्ती, अभय योजना आणि वीजगळती कमी करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेतला. सर्व अभियंते व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहून दैनंदिन कामांचे सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. या बैठकीत सांघिक कार्यालयातील कार्यकारी संचालक भुजंग खंदारे आणि सुनील काकडे यांनीही उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे प्रभारी मुख्य अभियंता मनीष ठाकरे, लातूर परिमंडलाचे मुख्य अभियंता अरविंद बुलबुले, नांदेड परिमंडलाचे मुख्य अभियंता राजाराम माने यांच्यासह तिन्ही परिमंडलांतील अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते, उपविभागीय अभियंते तसेच वित्त व लेखा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. स्मार्ट मीटर बसवण्याच्या कामात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जाफ्राबाद आणि अंबाजोगाई उपविभागातील अधिकाऱ्यांचा संचालक धनंजय औंढेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
Read About : Mahavitaran Abhay Yojana 2026-27 – जुनी थकबाकी मिटवा, पुन्हा वीजजोडणी मिळवा
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.