Ad Advertisement Ad Advertisement

Mahavitaran Abhay Yojana 2026-27 – जुनी थकबाकी मिटवा, पुन्हा वीजजोडणी मिळवा

थकबाकीदार वीजग्राहकांना मोठा दिलासा!

छत्रपती संभाजीनगर :Mahavitaran Abhay Yojana 2026-27 – वीजबिलांच्या थकबाकीमुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांना पुन्हा एकदा दिलासा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महावितरणने सुरू केलेली ‘अभय योजना २०२६-२७’ थकबाकीदार ग्राहकांसाठी आर्थिक दिलासादायक ठरत आहे. योजनेच्या पहिल्या दोन दिवसांतच छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील १४ ग्राहकांनी मूळ थकबाकी भरून व्याज व विलंब आकाराच्या १०० टक्के माफीचा लाभ घेतला आहे.

या योजनेत एकूण थकबाकीमधील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार १०० टक्के माफ करण्यात येणार आहे. उर्वरित मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा केल्यास त्यात आणखी २० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जात आहे. यासह मागणीनुसार पुनर्जोडणी तात्काळ मिळणार आहे. ३१ मार्च २०२६ पर्यंत ज्या उच्च व लघुदाब वर्गवारीमधील थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित झाला आहे असे घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर बिगरकृषी (शेती व सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजना वगळून) ग्राहक तसेच ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत तात्पुरता वीजपुरवठा खंडित झालेले ग्राहक ‘अभय योजना २०२६-२७’ साठी पात्र आहेत.

योजनेअंतर्गत थकबाकीवरील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार माफ करण्यात येणार आहे. तसेच १५ डिसेंबरपर्यंत मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा करणाऱ्या ग्राहकांना ‘अर्ली बर्ड रिबेट’चाही लाभ मिळणार आहे. लघुदाब घरगुती व व्यावसायिक ग्राहकांना वीजजोडणी खंडित असलेल्या कालावधीनुसार १० ते २० टक्के, तर इतर पात्र लघु व उच्चदाब ग्राहकांना १० ते १५ टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येणार आहे. ज्या ग्राहकांना एकरकमी रक्कम भरणे शक्य नाही, त्यांच्यासाठीही महावितरणने हप्त्यांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. लघुदाब ग्राहकांना ५० टक्के डाउन पेमेंट भरून उर्वरित रक्कम सहा समान व्याजमुक्त मासिक हप्त्यांत भरता येणार आहे. उच्चदाब ग्राहकांनाही थकबाकीनुसार तीन ते सहा व्याजमुक्त हप्त्यांचा पर्याय देण्यात आला आहे.

योजनेचे आणखी एक महत्त्वाचे विैशष्टय म्हणजे, मंजूर भार २० किलोवॅटपर्यंत असलेल्या ग्राहकांनी पुनर्जोडणीच्या वेळी प्रीपेड स्मार्ट मीटरचा पर्याय स्वीकारल्यास मूळ थकबाकीत अतिरक्ति पाच टक्के सवलत मिळणार आहे. याशिवाय सर्व पात्र ग्राहकांचे पुनर्जोडणी शुल्क आणि लघुदाब ग्राहकांचे सर्व्हिस कनेक्शन शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे.

दोन दिवसांत १४ ग्राहकांनी घेतला लाभ

छत्रपती संभाजीनगर परिमंडलात योजनेला सुरुवातीपासूनच सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या दोन दिवसांत लाभ घेतलेल्या १४ ग्राहकांमध्ये छत्रपती संभाजीनगर शहर मंडलातील सहा, ग्रामीण मंडलातील तीन आणि जालना मंडलातील पाच ग्राहकांचा समावेश आहे. थकबाकी भरलेल्या या ग्राहकांना मागणीनुसार तात्काळ वीजजोडणी पुन्हा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या योजनेसाठी पात्र ग्राहकांना महावितरणच्या ऑनलाइन पोर्टल किंवा मोबाईल ॲपद्वारे सहज अर्ज करता येणार आहे. थकबाकीमुळे अंधारात गेलेल्या घरांमध्ये पुन्हा प्रकाश आणण्याची आणि बंद पडलेले व्यवसाय सुरू करण्याची संधी या योजनेतून मिळत आहे. त्यामुळे पात्र ग्राहकांनी या संधीचा लाभ घेऊन थकबाकीमुक्त होण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

Read About : Diwali Celebration Away from Home – घरापासून दूर, पण मायेच्या घासाने दिवाळी गोड!
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.