Ad Advertisement Ad Advertisement

Paithan canal children incident – कालव्यात फेकलेल्या एका चिमुरड्याचा सापडला मृतदेह

पैठण : पाच वर्षीय मुलाचा शोध सुरू

पाचोड Paithan canal children incident : पोटच्या मुलांना प्रेमाने सांभाळण्याची जबाबदारी असलेल्या जन्मदात्या पित्यानेच आपल्या दोन चिमुकल्या मुलांना जिवे मारण्याच्या उद्देशाने जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यात फेकल्याची धक्कादायक घटना पैठण तालुक्यातील नांदर येथे दि. १७ रोजी उघडकीस आली होती. वडापाव खाण्याचे आमिष दाखवून दोन्ही मुलांना दुचाकीवरून सोबत नेल्यानंतर पित्याने त्यांना कालव्याच्या वाहत्या पाण्यात सोडल्याचा आरोप मुलांच्या आईने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत केला आहे. या घटनेत सात वर्षीय आरुष रोडगेचा मृतदेह बुधवारी (दि. १८) सकाळी आढळून आला असून, पाच वर्षीय कार्तिकचा शोध अद्याप सुरू आहे.

पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, सुषमा रोडगे (२७, रा. नांदर, ता. पैठण) यांचा विवाह २०१८ मध्ये परमेश्वर दामोदर रोडगे याच्यासोबत झाला होता. त्यांना आरुष (७) आणि कार्तिक (५) अशी दोन मुले होती. पती परमेश्वर हा रागीट व चिडखोर स्वभावाचा असून, तो किरकोळ कारणांवरून पत्नीला मारहाण व शिवीगाळ करीत असे. तसेच मुलांनी हट्ट केला किंवा मस्ती केली तर त्यांच्यावरही राग काढत असे. ‘मी या पोरांना मारून टाकीन,’ असे तो वारंवार म्हणत असल्याचेही पत्नीने तक्रारीत नमूद केले आहे.

दि. १६ नोव्हेंबर रोजी सकाळी सुषमा या दोन्ही मुलांना सासूकडे ठेवून शेतात कामासाठी गेल्या होत्या. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास परमेश्वर हा नवीन स्कूटीवरून घरी आला. काही वेळाने लहान मुलगा कार्तिक याने वडापाव खाण्याचा हट्ट केला. वडापाव खायला मिळणार आणि नवीन स्कूटीवर बसायला मिळणार या आनंदात दोन्ही मुले पित्याच्या स्कूटीवर बसली. दरम्यान सायंकाळी साडेसातच्या सुमारास गावातील ईश्वर कपटी यांनी रामेश्वर यांना फोन करून परमेश्वर हा कालव्याजवळ भिजलेल्या अवस्थेत असून, त्याने दोन्ही मुलांना कालव्याच्या पाण्यात टाकल्याचे सांगितले.

काही वेळानंतर परमेश्वर घरी आला. मुलांबाबत विचारणा केली असता त्याने सुरुवातीला संताप व्यक्त केला. त्यानंतर कुटुंबीयांनी जाब विचारल्यावर आपण दोन्ही मुलांना पकडून नांदर शिवारातील कालव्याच्या पाण्यात उडी मारली होती. मात्र, नाका-तोंडात पाणी गेल्याने आपण पोहत बाहेर आल्याचे त्याने सांगितल्याचे तक्रारीत नमूद आहे.

दोन दिवसांपासून शोधमोहीम

घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी कालव्यावर धाव घेत दोन्ही मुलांचा शोध सुरू केला. पोलीस आणि ग्रामस्थांच्या मदतीने गेल्या दोन दिवसांपासून शोधमोहीम सुरू होती. अखेर बुधवारी, दि. १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास सात वर्षीय आरुषचा मृतदेह कालव्याच्या पाण्यात आढळून आला. मात्र, पाच वर्षीय कार्तिक अद्याप बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे

आईची पोलिसांत तक्रार

या घटनेप्रकरणी आई सुषमा परमेश्वर रोडगे यांनी बुधवारी पाचोड पोलीस ठाण्यात हजर राहून पती परमेश्वर दामोदर रोडगे (वय ३०) याच्याविरुद्ध तक्रार दिली आहे. वडापावचे आमिष दाखवून दोन्ही मुलांना घरातून घेऊन जात जायकवाडीच्या डाव्या कालव्याच्या वाहत्या पाण्यात फेकून जिवे मारल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे. तसेच मुलांचे मृतदेह मिळू नयेत या उद्देशाने हा प्रकार केल्याचा संशयही व्यक्त केला आहे. एका पित्याच्या कथित क्रूर कृत्यामुळे सात वर्षांच्या निष्पाप बालकाचा जीव गेला असून, दुसऱ्या चिमुकल्याचा शोध अद्याप सुरू आहे. आईच्या डोळ्यांसमोरून दोन लेकरांचे बालपण हिरावून घेणाऱ्या या घटनेने नांदर गावासह पैठण तालुक्यात शोककळा पसरली आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोड पोलीस करत आहेत.

Read About : Drought in Maharashtra 2026 – आणखी 13 तालुक्यांत दुष्काळ जाहीर होणार?

E-paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.