वाढती महागाई आणि कमकुवत चलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय, मासिक ११० लिटरपेक्षा अधिक पेट्रोल खरेदी केल्यास अतिरिक्त दर लागू
तेहरान : Iran Petrol Price अमेरिकेसोबतच्या प्रदीर्घ संघर्षामुळे निर्माण झालेल्या आर्थिक टंचाईचा फटका आता इराणमधील सर्वसामान्य नागरिकांना बसू लागला आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे वाढलेल्या आर्थिक दबावाचा सामना करण्यासाठी इराण सरकारने मंगळवारपासून पेट्रोलच्या दरात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या डिसेंबर महिन्यानंतर इराणने पेट्रोलचे दर वाढवण्याची ही दुसरी वेळ आहे.
नवीन नियम आणि किंमत
इराणच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील वाढती महागाई आणि कमकुवत होत चाललेल्या चलनामुळे सरकारने हे पाऊल उचलले आहे. नव्या नियमांनुसार, ग्राहकांसाठी पेट्रोल खरेदीची मासिक मर्यादा ११० लीटर (सुमारे २९ गॅलन) निश्चित करण्यात आली आहे. जर एखाद्या ग्राहकाने या ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त पेट्रोल खरेदी केले, तर त्याला प्रति लीटर १००,००० रियाल (सुमारे ७ सेंट्स) या दराने अधिक रक्कम चुकवावी लागेल.
इराणने आपल्या अधिकृत सरकारी घोषणेमध्ये थेट युद्धाचा किंवा अमेरिकेचा उल्लेख टाळला असला, तरी सध्याच्या असाधारण परिस्थितीचा हवाला देत हा निर्णय लागू केला आहे. या दरवाढीचा थेट फटका देशातील सुमारे १५ टक्के अति-इंधन वापरणाऱ्या ग्राहकांना बसेल, असा अंदाज तेल वितरण कंपनीने वर्तवला आहे. दरम्यान, मासिक ११० लीटरपर्यंतच्या पहिल्या आणि दुसऱ्या कोट्यातील पेट्रोलचे दर मात्र पूर्वीप्रमाणेच कायम ठेवण्यात आले आहेत
